स्त्रियांच्या व आपल्याही अधिकारांबाबत देशातील नागरिक जेव्हा एवढे सावध असतात तेव्हाच अमेरिकेसारख्या देशातील लोकशाही सुरक्षित राहते. जगाचे व विशेषत: भारताचे चित्र याच्या नेमके उलट आहे. येथील स्त्रियांनाच काय, अनेक पुरुषांनाही त्यांच्या मूलभूत अधिकारांची जाण नाही.बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष असताना जो बायडेन हे उपाध्यक्ष होते. २०२०मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत त्यांनी डेमोक्रेटिक पक्षाची उमेदवारी मागितली आहे. त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचा वर्गही त्या पक्षात मोठा असून, तशी उमेदवारी मागणा-यांमध्ये त्यांच्या पाठीशी असणा-यांची संख्या सर्वात मोठी आहे. निष्कलंक चारित्र्य, पारदर्शी वर्तमान आणि स्वच्छ प्रतिमा असलेले बायडेन हे अध्यक्षपदी येतीलही. परंतु फार पूर्वी सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी त्यांनी केलेली एक लहानशी चूक त्यांच्या मार्गात उभी झाली आहे. त्या वेळी राज्याचे सिनेटर असताना त्यांनी सरकारी बसेसमधून जाणा-या विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थिनींनी जाऊ नये, अशी भूमिका घेतली होती. मुलामुलींच्या बसमध्ये एकत्र बसण्याच्या अधिकारालाच तेव्हा त्यांचा विरोध होता. आताच्या त्यांच्या निवडणुकीत तोच मुद्दा ऐनवेळी त्यांच्या एक प्रतिस्पर्धी कमला हॅरिसन यांनी पुढे केला आहे. तेव्हाच्या तुमच्या त्या विरोधाची मी बळी आहे. मलाच त्यामुळे त्या बसमध्ये प्रवेश नाकारला गेला, असा ठाम आरोप त्यांनी केला आहे. तेवढ्या एका आरोपामुळे बायडेन यांची पहिल्या क्रमांकाची उमेदवारी घसरून पाचव्या अथवा सातव्या क्रमांकावर गेली आहे. बायडेन यांनी स्वत:चा केलेला बचाव लोकांना व मतदारांना आवडलेला नाही. ही सारी घटना एवढ्या विस्ताराने येथे सांगण्याचे कारण अमेरिकेतील स्त्रिया व एकूणच मतदार त्यांच्या मूलभूत अधिकारांबाबत केवढे जागरूक व सतर्क आहेत हे दर्शविणे आहे. स्त्रियांच्या व आपल्याही अधिकारांबाबत देशातील नागरिक जेव्हा एवढे सावध असतात तेव्हाच (ट्रम्पसारखे अध्यक्ष असतानाही) देशातील लोकशाही सुरक्षित राहते. जगाचे व विशेषत: भारताचे चित्र याच्या नेमके उलट आहे. येथील स्त्रियांनाच काय, अनेक पुरुषांनाही त्यांच्या मूलभूत अधिकारांची जाण नाही, त्यामुळे ते आहेत काय, नाहीत काय किंवा ते चिरडले गेले काय, कुणी त्यांचा फारसा विचार वा चिंता करीत नाही. परिणामी, सरकारचे फावते व ते संविधानात अनेक नागरिकविरोधी बदल करू शकते. राजकारणात व प्रशासनात तर त्या अधिकारांची पायमल्ली नित्याचीच झालेली आहे.
भारतातल्या स्त्रियांनाच काय, अनेक पुरुषांनाही त्यांच्या मूलभूत अधिकारांची जाण नाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 04:48 IST