Where 'Vacancy' Moru misses 'Frequency' | जिकडे तिकडे 'व्हॅकन्सी' मोरूची चुकली 'फ्रिक्वेंसी'
जिकडे तिकडे 'व्हॅकन्सी' मोरूची चुकली 'फ्रिक्वेंसी'

- सुधीर महाजन

थंडगार पाण्याचा तांब्या डोक्यावर ओतताच मोरूच्या अंगातून शिराशिरी बाहेर पडली. आपल्या ईडा-पिंगळा जागृत झाल्याचे हे लक्षण समजून त्याच्यात अन्तर्बाह्य उत्साहाचा लोट उसळून आला. भडाभडा पाणी अंगावर ओतून तो ओल्या कपड्यानिशी देवघरात पाटावर येऊन बसला. उदबत्ती पेटवताच धूम्रवल्यासह सुगंधाने वातावरण व्यापले आणि मोरूने नासिकाग्रावर नजर स्थिर करीत डोळे मिटले. सभोवताली प्रचंड शांतता सुस्त होऊन पडली होती. पहाटेचे पावणेचार वाजलेले. घरातही सगळेच साखरझोपेत त्यामुळे मोरूची चाहूल कोणाला येणे शक्यच नव्हते.

तासाभराने दुधाची रिक्षा दुकानासमोर थांबल्याचा नित्याचा आवाज आला रस्त्याने छोट्या वाहनांची, फिरायला जाणाऱ्यांची तुरळक वाहतूक सुरू झाली. सहाच्या ठोक्याला नमाजच्या आवाजाने आसमंत व्यापले. ते सरते न सरते तोच मंदिरात भीमसेनांचा रियाज सुरू झाला. पाठोपाठ बुद्धवंदनेने उरलेल्यांना जागे केले. मोरूची बायको बालीला जाग आली. पलंगावर मोरू नसल्याचे तिच्या लक्षात आले; पण असेल घरात किंवा अधून मधून येणारा ‘मॉर्निंग वॉक’चा ‘अटॅक’ आला असावा, असे समजून ती स्वयंपाकघराकडे वळली तो पर्यंत रस्त्यावरची वर्दळ वाढली होती.

मोरू त्राटक लावून बसलेलाच; पण मन एकाग्र होत नव्हते. दोन तास उलटूनही त्याला काही गवसत नव्हते. हळूहळू तो अस्वस्थ झाला आकलुजच्या ‘शिवरत्न’ बंगल्यातून निघालेल्या ध्वनिलहरींनी अख्खा महाराष्ट्र व्यापला होता. या ध्वनी कंपनांनी लोणीतला राधाकृष्ण विखेच्या वाड्याला वेढा दिला, अकोल्यात पिचडांच्या बंगल्याचा अँटिना काबीज केला. नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर आणि बापूसाहेब गोरठेकरांनाही कवेत घेतले. नंदुरबारमध्ये भरत गावितांच्या ‘सुमाणिक’ बंगल्याला वेटोळा घातला. उस्मानाबादेत राणांच्या कवेत घेत या लहरी साताऱ्यात छत्रपतींच्या जलमहालातून निघून थेट शिवेंद्रच्या ‘सुरुचि’पर्यंत पोहोचल्या. धनंजय महाडिकांच्या वास्तूला स्पर्श करीत फलटणच्या राजवाड्यावर धडका मारू लागल्या, अशा ‘नेटवर्कने’ ध्वनिलहरींनी महाराष्ट्र काबीज केला. 

या लहरी नेमक्या काय होत्या हे मोरूला कळत, उमजत नव्हते. उलगडा होत नव्हता. परवा तो भगवा सदरा घालून कलानगरात गेला त्यावेळी भास्कर जाधवांच्या सोबतच्या लोंढ्यात तो सरळ ‘मातोश्री’तच आपसूक पोहोचला. तिथले मंतरलेले वातावरण पाहून भारावून गेला आणि आतून काहीतरी उचंबळून येत आहे, धडका मारत आहेत याची जाणीव त्याला झाली. मंत्रवत त्याने हात पुढे करताच त्याच्याही हातावर शिवबंधन बांधले गेले आणि अंगात वीज संचारण्याचा भास झाला. तशा भारावलेल्या अवस्थेत तो घरी पोहोचला; पण मनाला स्वस्थता नव्हती. काही तरी आहे पण ते सापडत नाही. अशी लंबक अवस्था झाली होती. मध्यरात्रीनंतर अंथरुणात तळमळत असताना भास्कर जाधवांचा खोलवर दडलेला आवाज त्याच्या कानावर आला. ‘अंतरात्म्याचा आवाज’ असे काही शब्द होते. मोरू लगेच उठला आणि त्राटक लावून कानात प्राण आणून बसला; पण अंतरात्म्याचा आवाज येत नव्हता. महाराष्ट्राच्या घराघरातला आवाज आपल्याला ऐकू येत नाही म्हणून त्याची बेचैनी वाढत होती. तिकडे घरात मोरूच्या बापाने रेडिओ लावला; पण बातम्यांचा आवाज नीट येत नव्हता. स्वयंपाकघरातून चहाचा कप आणत बाली म्हणाली बाबा फ्रिक्वेंसी अ‍ॅडजस्ट करा. अन् मोरू ताडकन उठला आणि बाहेर पळाला फ्रिक्वेंसीच्या शोधात.


Web Title: Where 'Vacancy' Moru misses 'Frequency'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.