पेंडॉल ठोकायचा तरी कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 06:46 AM2018-08-21T06:46:09+5:302018-08-21T06:46:36+5:30

यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याचे बेत आखले जात असतानाच रस्त्यांवर मंडप ठोकण्यास मनपानं मनाई केल्याची बातमी आली.

Where did the pandol knock? | पेंडॉल ठोकायचा तरी कुठे?

पेंडॉल ठोकायचा तरी कुठे?

Next

यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याचे बेत आखले जात असतानाच रस्त्यांवर मंडप ठोकण्यास मनपानं मनाई केल्याची बातमी आली. एरवी हिंदुत्वाच्या नावानं शिमगा (सामना नव्हे!) करणाऱ्यांची सत्ता मनपात असताना, असा निर्णय झालाच कसा? हा लाख मोलाचा (अर्थात, देणगीचा) प्रश्न असल्याने ‘राज’गडावरील एका शिष्टमंडळानं ‘वर्षा’वर धडक दिली. रविवारची सुटी असल्याने सीएम घरीच होते. कुटुंबीयांसमवेत टीव्हीवरील कार्यक्रम पाहण्यात दंग असतानाच, मनसैनिकांनी दार ठोठावलं. ‘कोण आहेऽऽ?’ सीएमच्या गृहमंत्र्यांनी आतूनच जरा रागानं विचारलं. बाहेरून उत्तर न येता दारावर पुन्हा नुसतीच टकटक झाली. ‘कोण आहे रे तिकडेऽऽ?’ सीएमचा त्रासिक स्वर ऐकून माजघरातून एक शिपाई धावत-पळत आला. ‘बघ जरा कोण आलंय बाहेर’ साहेबांचा आदेश शिरसावंद्य मानून मागच्या दारानं शिपाई बाहेर पडला आणि गेल्या पावली परत आला. ‘साहेब, मनसेचं शिष्टमंडळ आलंय!’ शिपायाने माहिती पुरवली. ‘काय काम आहे?’ सीएमच्या या उपप्रश्नाचं शिपायाकडे उत्तर नव्हतं त्यामुळे ‘विचारून येतो’ म्हणत ते परत मागच्या दाराकडे निघाले. ‘आधीच का नाही विचारलंत?’-सीएम. ‘सरकारी काम असंच असतं साहेब. जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. पाय धुवा म्हंटलं की फक्त पायचं धुवायचे...!’ शिपायाच्या या उत्तराने वैतागलेल्या सीएमनी रागारागानं रिमोट आपटला, सोफ्यावर टाकलेले पाय बाजूला केले आणि बाजूच्या टेबलावर ठेवलेले जॅकेट अंगात चढविले. तेवढ्यात शिपाई आला. ‘साहेब ते गणपतीची...’ शिपायाचं बोलणं पूर्ण होण्यापूर्वीच सीएम ओरडले, ‘अरे गणपतीची वर्गणी मागायला हेच ठिकाण सापडलं का त्यांना? लोकांना हल्ली काळ, वेळ, स्थळाचं काही भानच राहिलेलं नाही. कामधंदा काही करायचा नाही अन् ऊठसूठ वर्गणी...वर्गणी...!’
संडेमूडचा असा पार विचका झाल्यामुळे सीएमचा चांगलाच मूडआॅफ झाला होता. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून शिपायानं फ्रीजमधल्या थंडगार पाण्याचा ग्लास त्यांच्या पुढ्यात ठेवला. गटागट पिऊन सीएमंनी तो एका दमात संपविला आणि दार उघडण्याची सूचना केली. ‘वर्षा’चं दार किलकिलं होताच ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ’चा गजर करत मनसैनिकांचं शिष्टमंडळ आत घुसलं. ‘हे कोण?’ शिष्टमंडळाचं नेतृत्व करणाºया केस वाढविलेल्या एका तरण्याबांड पोराकडं बघून सीएमंनी विचारलं. ‘ज्युनिअर राज!’ एकानं ओळख करून दिली. ‘बोला, काय काम काढलंत?’ सीएमनी मुद्याला हात घातला. ‘साहेब, यंदा आम्ही पेंडॉल कुठे ठोकायचा?’ शिष्टमंडळाच्या म्होरक्यानं मोठ्या ठेचात विचारलं. ‘काय प्रॉब्लेम आहे? कुठेही ठोका...म्हणजे जागा मिळेल तिथे ठोका!’ त्यावर मनपातील एक मनसैनिक पुढे सरसावत म्हणाला, ‘पण साहेब, जागोजागी मेट्रोची कामं सुरू आहेत. सगळे रस्ते उखडलेत...जागा उरलीय कुठे?’
थोडा वेळ शांतता पसरली. ‘हे बघा, हा मनपाचा प्रश्न आहे. सगळे सणवार उत्साहात साजरे झाले पाहिजेत ही राज्य सरकारची भूमिका आहे’-सीएमंनी खुलासा केला.‘आम्हीही तेच म्हणतोय; पण पेंडॉल ठोकायचा कुठे?’-मनसैनिकांचा समूहसूर.
‘या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बांद्र्यात मिळेल तिकडे जा!’ सीएमचं उत्तर ऐकून शिष्टमंडळानं काढता पाय घेतला म्हणे!
- नंदकिशोर पाटील

Web Title: Where did the pandol knock?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.