डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, महाराष्ट्र विधान परिषद -
जगाच्या पाठीवर राजकीय सिद्धांत आणि सत्तासंघर्षाचे खेळ सुरू असताना, या संघर्षाच्या पडद्यामागे एक अशी भीषण शोकांतिका घडत असते, ज्याची नोंद इतिहासाच्या पानांवर क्वचितच होते. जागतिक स्तरावर शांततेचे समर्थन करणारे अनेक गट आहेत. यात प्रामुख्याने अशा छोट्या देशांचा समावेश असतो, ज्यांच्यावर मोठ्या राष्ट्रांनी आक्रमण केले आहे किंवा जिथे देशांतर्गत फुटीरतावाद आणि यादवी सुरू आहे. परंतु, या सर्व राजकीय उलथापालथीत सर्वाधिक होरपळली जाते ती म्हणजे ‘स्त्री’.
नुकत्याच एका जागतिक व्यासपीठावर मला काही अशा महिला भेटल्या, ज्यांच्या डोळ्यांतील अश्रू आता आटले होते; पण त्यांच्या मनातील आक्रोश आजही तितकाच जिवंत होता. त्या व्यासपीठावर ‘मदर्स ऑफ डिसअपिअर्ड’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मातांची एक मानवी साखळी उभी होती. ही केवळ एक साखळी नव्हती, तर ती एक ‘निशब्द’ आंदोलनाची गाथा होती.
या मातांच्या कहाण्या ऐकल्या की अंगावर काटा येतो. एखाद्या दिवशी घरातील तरुण मुलगा, पती किंवा भाऊ कामासाठी किंवा सैन्यातील कर्तव्यासाठी बाहेर पडतो. त्याला पोलिस किंवा सरकारी यंत्रणेद्वारे चौकशीसाठी बोलावले जाते. तो जातो; पण पुन्हा कधीच परत येत नाही. लोकशाही देशांमध्ये एखादी व्यक्ती बेपत्ता झाली तर ‘मिसिंग’ची तक्रार घेतली जाते, तपास होतो आणि बहुतांश वेळा त्या व्यक्तीचा थांगपत्ता लागतो. दुर्दैवाने मृत्यू झाला असेल तर तसे तरी कळते. परंतु, हुकूमशाही किंवा टोकाच्या राजकीय अस्थिरतेच्या देशांमध्ये चित्र वेगळे आहे. तिथे सरकारी यंत्रणाच माणसांना ‘गायब’ करतात. कुटुंबाने विचारणा केली तर यंत्रणा उलट विचारतात, ‘तो घरी परत आला नाही का?’ १५-२० वर्षे उलटतात, मुले मोठी होतात; पण त्या माणसाचे स्टेटस ‘अदृश्य’ हेच राहते. तो जिवंत आहे की मृत, तो कोणत्या तुरुंगात आहे की त्याला संपवण्यात आले आहे, याचे उत्तर ना सरकार देते, ना कायदा.
आज अफगाणिस्तान, पाकिस्तान यांसारख्या देशांमध्ये गुप्तहेर यंत्रणांच्या संघर्षात सामान्य नागरिक भरडला जात आहे. विकासाच्या संधी न मिळाल्यामुळे आंदोलने उग्र बनतात, तेव्हा तिथेही अशा प्रकारच्या अदृश्य होण्याच्या घटनांच्या चर्चा कानावर येतात. रशिया, युक्रेन किंवा अफगाणिस्तान, आफ्रिकेतील काही देशांमधील यादवीत अशा ‘गायब’ झालेल्या लोकांची संख्या मोठी आहे.
या छळाला कंटाळून अनेक स्त्रिया दुसऱ्या देशात आश्रय घेतात. परदेशात राहून त्या आपल्या मायदेशातील लोकांशी संपर्क साधून पुराव्यांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे आंदोलन ‘निशब्द’ असते, कारण जगाच्या भिंती ओलांडून त्यांचा आवाज त्यांच्या स्वदेशातील सत्ताधीशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता धूसर असते.
भारतामध्ये लोकशाहीची पाळेमुळे घट्ट असल्याने अशा घटनांचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे, ही जमेची बाजू. परंतु, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जेव्हा एखादी माता आपल्या मुलाची वाट पाहत ‘अदृश्य’ भिंतींशी संवाद साधते, तेव्हा तो केवळ एका कुटुंबाचा प्रश्न राहत नाही, तर तो मानवी सभ्यतेपुढील प्रश्न ठरतो. राजकीय राजवटी येतात आणि जातात; पण या मातांच्या डोळ्यांतील ‘नि:शब्द कहाणी’ कायमची कोरली जाते.neeilamgorhe@gmail.com
Web Summary : Women worldwide seek disappeared loved ones amidst conflict. Political instability leads to forced disappearances, leaving families in agony. While India fares better, such tragedies are a global humanitarian crisis, etching silent stories of loss.
Web Summary : दुनिया भर में महिलाएँ संघर्ष के बीच गायब हुए प्रियजनों की तलाश करती हैं। राजनीतिक अस्थिरता के कारण जबरन गायब किया जाता है, जिससे परिवार पीड़ा में हैं। भारत में स्थिति बेहतर है, फिर भी ऐसी त्रासदी वैश्विक मानवीय संकट है, जो नुकसान की मौन कहानियाँ लिखती है।