- शर्मिला फडके, ख्यातनाम कला समीक्षक, लेखिका
भिंतीला टेकून बसलेल्या तीन मुली. भविष्यात जे काही वाढून ठेवलं आहे ते स्वीकारण्याची वाट पाहात बसलेल्या. कपड्यांच्या लाल, हिरव्या, केशरी आकर्षक छटांशी पूर्ण विसंगत चेहऱ्यावरील चिंतेच्या काळसर छटा. भिंतींवर रेंगाळत्या सावल्याशी मेळ घेणाऱ्या. गोलसर, तारुण्याचा गोडवा असलेले चेहरे, मोहक सौष्ठव या कशाहीपेक्षा त्यांच्या चेहऱ्यावरील म्लान, उदास, परिस्थितीशरण मौन भाव सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारा आहे. वयाला साजेसा आनंद, उत्फुल्लतेची एकही छटा तिघींच्या आविर्भावात नाही. अनामिक दडपण चेहऱ्यावर स्पष्ट उमटलं आहे.
नेमकी कसली चिंता सतावत असेल या तीनही मुलींना? वैवाहिक आयुष्यही अजून सुरू झालेलं नाही. कदाचित द्यावा लागणारा हुंडा, सुटलेली शाळा, चेहराही न बघितलेला आयुष्यभराचा जोडीदार, अनोळखी सासर, भविष्याची अनिश्चितता..?थ्री गर्ल्स हे अमृता शेरगीलने १९३४ साली युरोपातून कला शिक्षण घेऊन भारतात परतल्यावर रंगवलेलं पहिलं चित्र. कलेचं तंत्र आधुनिक, जगण्याची शैली पाश्चात्य असली तरी तिच्या चित्रांचा आत्मा पूर्णपणे भारतीय होता. रंग स्थानिक मातीचे. असं असूनही अमृता शेरगीलमुळेच भारतीय चित्रकलेतील परंपरा, पावित्र्याच्या कल्पनेत जखडलेल्या स्त्रीची सांकेतिक प्रतिमा मुक्त होऊ शकली. अमृता स्वतंत्र विचारांची, धाडसी, स्त्रीवादी विचारसरणीची चित्रकार होती. नग्नता, लैंगिकतेचा मुक्त उच्चार तिच्या चित्रभाषेत होता. अजून स्वतंत्र, मुक्त न झालेल्या भारतात तिने उन्मुक्तपणे चित्रं रंगवली. भारतीय ग्रामीण स्त्रियांच्या आयुष्यातले खरे रंग तिच्या चित्रांमध्ये उमटले. पॅरिसहून परतल्यावर भारतीय लोकजीवनाला अमृताने कॅनव्हास बनवलं. उबदार ज्वालाफुलांच्या लाल-केशरी अम्लान हिरव्या छटांमध्ये लपेटलेल्या सामान्य स्त्रियांच्या समूहांनी भरलेले ते कॅनव्हास. सण-समारंभात मग्न असलेल्या तरुण स्त्रिया किंवा एकाकी अबोल मुली. झुल्यावर बसणाऱ्या, सहेलीच्या लग्नात तिचा साजशृंगार करणाऱ्या किंवा लाल व्हरांड्यात चारपाईवर फुलकारीची चादर अंथरून गप्पा करणाऱ्या. एखादी एकटी केशरी पडद्याआड संकोचाने नहात असलेली. एखादी नखशिखांत जर्द गुलाबी नवी नवरी..
अंगावरच्या पेहेरावातील झळाळत्या रंगछटांच्या आड आपल्या चेहऱ्यावरची उदासी, अस्वस्थ मौन दडवू पहाणाऱ्या स्त्रिया आणि मुली. त्यांची दबलेली लैंगिकता आणि एक अनामिक घुसमट त्या गडद रंगसंगतीच्या थरांआड कुठेतरी लपून आहे. समवयस्कांसोबत असतानाही आपापल्या वाट्याचं दु:ख एकेकट्यानी, मुकाट भोगणाऱ्या. अमृताच्या चित्रांत स्त्री केवळ ‘सुंदर वस्तू’ नाही. ती विचार करणारी आहे. कधी एकटी, कधी अंतर्मुख, कधी थकलेली. अमृताला सामान्य भारतीय स्त्रियांची दैवाधीन विवशतेची आंतरिक सहसंवेदना जाणवली होती. चित्रकार जेव्हा स्त्री असते तेव्हा आपल्या भोवतालच्या स्त्रियांकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन किती वास्तववादी आणि सहानुभावाचा असतो याचा प्रत्यय अमृताच्या चित्रांमधून येतो.
शिमला आर्ट अकॅडमीने ‘उत्कृष्ट स्त्री-चित्रकार’ म्हणून केलेला गौरव ‘मी चित्रकार आहे त्याचा गौरव करा, स्त्री म्हणून नको’, असं सांगून नाकारणारी अमृता. तिच्या चित्रांचं पहिलं प्रदर्शन शिमल्याला होतं. त्याकरता शेवटचं एक चित्र रंगवण्यात ती मग्न होती, पण ते पूर्ण व्हायच्या आतच, वयाच्या केवळ २८व्या वर्षी अमृता हे जग सोडून गेली. केवळ सात वर्षांची चित्रकला कारकीर्द पदरात पडलेल्या अमृता शेरगीलच्या कला कर्तृत्वाला आजही तुलना नाही. sharmilaphadke@gmail.com
Web Summary : Amrita Sher-Gil's painting 'Three Girls' reflects the anxieties of young Indian women in a patriarchal society. It portrays their suppressed emotions, uncertain futures, and the weight of societal expectations, capturing their silent suffering and inner turmoil.
Web Summary : अमृता शेरगिल की पेंटिंग 'तीन लड़कियाँ' पितृसत्तात्मक समाज में युवा भारतीय महिलाओं की चिंताओं को दर्शाती है। यह उनकी दमित भावनाओं, अनिश्चित भविष्य और सामाजिक अपेक्षाओं के बोझ को चित्रित करता है, जो उनके मौन दुख और आंतरिक अशांति को दर्शाता है।