लालूंचे काय होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 02:45 AM2017-12-25T02:45:36+5:302017-12-25T02:45:45+5:30

डोळे मिटून किती दिवस दूध प्यायचे, हे त्या त्या मांजरानेच ठरवायचे असते. मालक बदलला किंवा मालकाची नियत बदलली की धपाटा ठरलेला असतो.

What will happen to Lalu? | लालूंचे काय होणार?

लालूंचे काय होणार?

Next

डोळे मिटून किती दिवस दूध प्यायचे, हे त्या त्या मांजरानेच ठरवायचे असते. मालक बदलला किंवा मालकाची नियत बदलली की धपाटा ठरलेला असतो. त्यामुळे दूध पीत असतानाच हा सारा भवतालही पाहता यावा लागतो. राजकारण्यांचेही असेच असते. सत्ता ताब्यात आली रे आली की, डोळे मिटून दूध न पिणारा राजकारणी सध्या अपवादानेच सापडतो; मात्र हे करीत असतानाच ज्याची नजर भवतालही टिपत असते तो यशस्वी राजकारणी ठरतो. नाही तर त्याचा लालूप्रसाद यादव होतो. चारा घोटाळ्याशी संबंधित २१ वर्षांपूर्वी दाखल केल्या गेलेल्या फौजदारी खटल्यात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्टÑीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरविले. पोलिसांनी तातडीने त्यांना तुरुंगातही टाकले. न्यायालय ३ जानेवारी रोजी त्यांना शिक्षा सुनावेल. शासकीय तिजोरीतून १९९१ ते १९९७ या काळात खोटी बिले दाखवून ८९.२७ लाख रुपये काढून अपहार केल्याचा हा खटला होता. चारा न पुरवताच कंत्राटदारांच्या नावे पैसे काढले जात असल्याचे माहीत असूनही त्याकडे कानाडोळा केला हा लालूंवरील आरोप सिद्ध झाला. यात त्यांना सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. सीबीआय अधिकारी जोगिंदरसिंग, अमित खरे, राकेश अस्थाना, यू. एन. बिश्वास असे जिगरबाज अधिकारी लाभले म्हणून या घोटाळ्याचा असा निकाल समोर आला. या घोटाळ्याच्या ३३ पैकी सहा खटल्यांमध्ये लालू आरोपी होते. त्यापैकी दोन खटल्यांमध्ये ते दोषी ठरले आहेत. अन्य चार खटल्यांचे कामकाज अजून सुरूच आहे. बिहारच्या राजकारणात या निकालामुळे फारसा फरक पडेल असे अजिबात वाटत नाही. लालूंचे तुरुंगात जाणे बिहारला नवे नाही. चैबासा तिजोरीतून ३७.५ कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी लालूंना पाच वर्षांची कैद झाली होती. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत लालूंनी बिहार विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या म्हणजे राष्टÑीय जनता दलाच्या सर्वाधिक जागा निवडून आणल्या होत्या. लालूंवर कितीही आरोप झाले आणि ते सिद्ध झाले तरी बिहारमधील यादव आणि मुस्लीम समाज पाठीशी आहे तोपर्यंत लालूंना चिंता नाही. मुलगा तेजस्वी यादव यांना राजकीय वारस जाहीर करून याआधीच लालूंनी राज्यातील भविष्याची चिंता मिटविली आहे. हे दोन्ही समाज नितीशकुमार वा मोदींच्या भाजपला मतदान करतील, अशी अलीकडच्या काळात तीळमात्रही शक्यता नाही, त्यामुळे बिहारमध्ये लालूंच्या पक्षाला मरण नाही. राहिला प्रश्न केंद्राचा. घोटाळ्यांच्या मालिकेची ही शर्यत पूर्ण करता करता केंद्रात पोहोचणे तसे त्यांना सोपे नाही. लालू आणि एकूणच मोदी विरोधकांना हाच मोठा फटका असणार आहे. अलीकडेच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष बाजीगर ठरला. मोदींच्या विजयापेक्षा राहुल गांधी यांचा निसटता पराभव अधिक चर्चेचा ठरला. पुढे २-जी घोटाळ्यातून ए. राजा आणि कनिमोळी सुटले. इकडे महाराष्टÑात ‘आदर्श’मधून अशोक चव्हाण यांना दिलासा मिळाला. मोदी विरोधकांची मोट अशी घट्ट होत असतानाच लालूंचा हा निकाल आला. गुजरात-हिमाचल प्रदेशची निवडणूक झाली. आता पाच महिन्यांत कर्नाटक निवडणुकीचे धूमशान आहे. कर्नाटकनंतर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये निवडणुकीचा फड रंगणार आहे. हे होता होता २०१९ साली लोकसभेचा महासंग्राम होणार आहे. या महासंग्रामात मोदींशी टक्कर देण्यासाठी विरोधकांनी आतापासून मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. चारा घोटाळ्यात लालूंच्या तुरुंगात जाण्यामुळे या मोटीचे बळ काहीसे कमी झाले आहे.

Web Title: What will happen to Lalu?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.