शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

..आखिर इस दर्दकी दवा क्या है?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 08:42 IST

खरेदी असो, खाणं असो, पोर्न साइट्स असो की ड्रग्ज; काहीही करा, समाधान नाही, हा तारुण्याच्या डोक्यातला केऑस होऊन बसला आहे!

- प्रणव सखदेव

२००० साल उजाडलं, अवघं जग वायटूके समस्येचा विचार करत असताना मी १३-१४ वर्षांचा होतो. म्हणजे वयात आलो होतो, जग थोडं थोडं समजू लागलं आणि आपला आपण विचार करायला हवा, याचं किंचित भान येऊ लागलं. या काळात थोडं पुढे ऑर्कुटरूपाने आभासी जगाचं एक लहानसं बीज पेरलं गेलं, ज्याचं नंतर जगड्व्याळ अशा महावृक्षात रूपांतर झालं. तेव्हा इंटरनेटच्या जादूई जिनीचा वावर सर्वत्र नसला, तरी पर्सनल कॉम्प्युटर विकत घ्यायला सुरुवात झाली होती. (मी आठवीत असताना घरी कॉम्प्युटर आला होता, कारण त्यासाठी बाबांना शून्य टक्के व्याजाने कर्ज मिळालं होतं!) ऑर्कुट किंवा चॅटिंग रूम्स अथवा साइट्सच्या रूपाने आभासी जगाच्या एका अदृश्य हाताने आयुष्यावर दाब टाकायला सुरुवात केली. या हाताने तोपर्यंत फार महाग असलेलं खासगीपण बहाल केलं. नाही तर आधीच्या पिढीतल्या लोकांना खासगीपणासाठी फार मोठी किंमत मोजावी लागायची! आपण कोणाशी मैत्री करतो, आपण कोणाशी बोलतो, आपण काय बोलतो यावर घरातल्या व समाजातल्या कोणाचंही लक्ष जाऊ शकत नाही, यातलं सुख निव्वळ वेगळं होतं. नंतर टिंडरसारख्या  डेटिंग ॲप्समुळे नातेसंबंध जोडण्याच्या प्रक्रियेवर वेगळाच दाब निर्माण झाला आणि त्यामुळे सामाजिक नियमांत करकचलेल्या एलजीबीटीक्यूसह सर्वच समूहांना थोडा मोकळा श्वास मिळाला. 

सोशल मीडियाने शोषितांच्या, वंचितांच्या आवाजाला एक मंचही दिला. आपण व्यक्ती म्हणून कोणीतरी आहोत आणि केवळ सामाजिक सामूहिकतेतले एक घटक नाही, याची तीव्र जाणीव झाली आणि ती वाढीस लागली. ऑर्कुट वगैरे साइट्स केवळ एक सुरुवात होती, त्याच्यानंतर आलेल्या अपग्रेडेड अवतारांनी म्हणजे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी सोशल साइट्सनी तर प्रत्यक्ष जगण्याला समांतर असं आभासी जग तयार केलं. ‘प्रत्यक्ष मी’ आणि ‘सोशल साइट्स’वरचा मी - असं जगणं दुभंगलं आणि ही प्रक्रिया त्सुनामीसारखी झाली.

नेमकं काय घडतंय, हे कुणालाही समजायच्या आत या आभासी जगाच्या हाताने केवळ तरुण नव्हे, तर मध्यमवयीन आणि वयस्कर व्यक्तींनाही आपल्या कह्यात घेतलं. आणि आता हा हात नुसता हात राहिलेला नाही, त्याला डोळे फुटले आहेत, कान उगवले आहेत. तो सगळ्यांवर लक्ष ठेवून आहे. ज्याने खासगीपण दिलं, तोच आता त्याच्या मुळावर उठलाय. तुम्ही काय खाता-पिता, बोलता-करता, कुठे जाता हे सगळं त्याला माहिती आहे. किंबहुना तो तुम्ही काय खायला हवं, काय बोलायला हवं, कुठे जायला हवं, आणि कोणाला मत द्यायला हवं, हेही ठरवू लागला आहे. तो नुसता आपल्यावर वॉच ठेवणारा ‘बिग ब्रदर’ राहिलेला नाही! 

दोन हजारोत्तरी काळात मोबाईल फोन हे उपकरण आयुष्यात आलं आणि त्याने जगणं पार बदललं. आधी केवळ फोन करण्यासाठी किंवा संदेश पाठवण्यासाठी असलेला हा ‘प्राणी’ पाहता पाहता अन्न-वस्त्र-निवाऱ्याप्रमाणे गरजेची वस्तू झाला. त्याने पाहता पाहता कॅमेऱ्यांना जवळपास हद्दपार केलं. पूर्वी फोटो काढताना असलेलं एक अवघडलेपण सहज केलं. त्याने स्व-प्रतिमेवर प्रेम करायला शिकवलं. मी कोणीतरी महत्त्वाचा आहे, असं फिलिंग दिलं आणि त्याचबरोबर आपल्या प्रतिमेला ‘ब्यूटिफाय’ करण्याचा पर्याय देऊन मनात एक सुप्त न्यूनगंडही सोडला. मोबाईलपूर्व जग शब्दांनी व्यापलेलं होतं, मोबाईलोत्तर जग प्रतिमांनी गजबजलेलं, प्रतिमांच्या समुद्रात बुडालेलं झालं.

जिथे जाऊ तिथे, पाहू तिथे प्रतिमाच प्रतिमा. आज आपण प्रतिमा जगतो, प्रतिमेत राहतो, प्रतिमा खातो आणि उपभोगतो त्याही प्रतिमाच!लहान असताना मी शिंप्याकडे शर्ट-पँट शिवायला जायचो. सणवार आले की, कापड विकत आणून मापं द्यायला शिंपीकाकांकडे जायचं हा नित्यक्रम असे; पण जसजशी रेडिमेड कपड्यांची दुकानं वाढली, अनेक ब्रँड्स आले आणि नंतर शॉपिंग साइट्स वाढल्या तसं कपडे, किंबहुना कोणतीही वस्तू घेण्याची सवयच बदलली. वर्षातून होणारे सेल्स हे खरेदीचे ‘सण’ झाले. तिथली डील्स मिळावीत म्हणून जिवाची घालमेल व्हायला लागली.

कोणतीही वस्तू घेण्यासाठी असलेले पर्याय कित्येक पटींनी वाढले. लहान असताना वाढदिवस किंवा तशा काही प्रसंगी हॉटेलमध्ये जाणं होई. त्यातही हॉटेलमध्ये गेलं की, क्यूझिनचे दोनेक पर्याय असत. आता ते थाई, कॉन्टिनेंटल, चायनीज, इटालियन, अमेरिकन, मेक्सिकन, भारतीय, असे कित्येक आहेत. चीझ हा मुख्य अन्नपदार्थ झाल्यासारखा सगळ्याच पदार्थांत घुसखोरी करतो आहे! कपडे, शूज, मोबाईल, घड्याळ, अंडरवेअर्स, रेस्तरां, दुकानं किंवा शॉपिंग साइट्स अशा सगळ्याचबाबतीत बहुपर्यायांची मुबलकता आली आहे. पण त्यामुळे नक्की काय, कुठून आणि चांगलं डील मिळवून कसं घ्यायचं हे पाहून दमछाक होते आणि त्यात नवी वस्तू घेण्याचा आनंद विरून जातो.

परिणामी समाधान न मिळाल्याने (पोर्न साइट्स किंवा ड्रग्ज यांची व्यसनं असलेल्यांप्रमाणे), ‘आणखी हवं’चा हव्यास वाढत जातो. हळूहळू वस्तू कोणती आहे आणि तिचा उपभोक्ता कोण आहे, यामधल्या सीमारेषाच धूसर होताहेत! यातून ‘मी कोण’पेक्षा ‘मी काय आहे’ - वस्तू आहे का? हा आजचा ज्वलंत प्रश्न झाला आहे... आणि तेच आजच्या तरुणाचं व्यक्तिमत्त्व होऊन बसलं आहे. या शतखंडित झालेल्या तथाकथित ‘चंगळवादी ‘ तरुण पिढीच्या  मनात किती कोलाहल असेल? त्यांच्या मनात किती खळबळ माजलेली असेल? एखादी गोष्ट मिळविण्यासाठी प्रचंड धडपड करणं आणि ती मिळाल्यावर तिचा नीट आनंदच घेता न येणं, यामुळे येणारा फटिग ते कसा मॅनेज करत असतील? त्यांना किती मानसिक रिकामेपण येत असेल? -  असे अनेक प्रश्न आहेत, ज्यांना ठोस उत्तरं नाहीत. गालिबने विचारला होताच की तो सनातन प्रश्न - आखिर इस दर्द की दवा है...?