शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

बा मार्कंडेया, काय हे ?

By admin | Updated: March 12, 2015 23:11 IST

प्रेस कौन्सिलचे माजी अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती डॉ. मार्कंडेय काटजू यांचे डोके फिरले असावे. काही महिन्यांपूर्वी लोकमतने आयोजित केलेल्या

प्रेस कौन्सिलचे माजी अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती डॉ. मार्कंडेय काटजू यांचे डोके फिरले असावे. काही महिन्यांपूर्वी लोकमतने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला आले तेव्हा ते बरे होते. तरी त्याही वेळी आपल्या भाषणात वादंग उभी करणारी काही वाक्ये त्यांनी पेरलीच होती. त्याआधीही त्यांची काही विधाने लहानमोठी वादळे उठविताना देशाने पाहिली होती. आता ते न्यायमूर्ती नाहीत आणि प्रेस कौन्सिलच्या अध्यक्षपदावरूनही त्यांना काढले आहे. परिणामी ते बेकार व भरपूर फुरसत असलेले गृहस्थ आहेत. त्याखेरीज म. गांधींना ब्रिटिशांचे व नेताजी सुभाषचंद्रांना जपानचे हस्तक म्हणून त्यांनी आपले जवळपास अंधारात गेलेले नाव पुन्हा उजेडात आणले नसते. ‘मी सनातनी हिंदू आहे आणि भगवत्गीता हा माझा प्राणप्रिय ग्रंथ आहे’ असे गांधीजी नेहमीच म्हणत. त्यांच्या जुन्या भूमिकांमध्ये नंतरच्या काळात बदल झालेलेही देशाने पाहिले आहेत. एकेकाळी वर्णाश्रम धर्माचा पुरस्कार करणारे गांधीजी पुढे आपल्या आश्रमात फक्त विजातीय विवाहांना परवानगी मिळेल असे म्हणू लागले. एकेकाळी गोखल्यांचे अनुयायी असलेले गांधीजी स्वत:ला ब्रिटिश साम्राज्याचे नागरिक समजत. बोअर युद्धात जखमी झालेल्या ब्रिटिश सैनिकांवर त्यांनी ज्या सेवाभावनेने उपचार केले त्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना हिंदकेसरी हा किताबही दिला होता. पण जालियनवाला बागेचे हत्त्याकांड झाल्यानंतर व त्याचा सविस्तर वृत्तांत त्यांनी काँग्रेससाठी लिहिल्यानंतर गोखल्यांप्रमाणेच ब्रिटिश राजवटीला वरदान मानणारे गांधीजी त्या राजवटीला सैतानाची राजवट म्हणू लागले आणि त्यांनी त्यांचा हिंदकेसरी हा किताब परतही केला. येथपासून त्यांनी घेतलेली ब्रिटिशविरोधी व स्वातंत्र्यवादी भूमिका देशाला स्वराज्यापर्यंत पोहचविणारी ठरली आणि ज्या साम्राज्यावर कधी सूर्य मावळत नव्हता ते साम्राज्यच मोडकळीला आलेले जगाला दिसले. नेताजींनी जपानची घेतलेली मदत भारतीय स्वातंत्र्याचा लढा तीव्र करण्यासाठी होती हेही असेच साऱ्यांना ज्ञातआहे. हा इतिहास काटजूंनाही ठाऊक आहे. ते ज्या कैलासनाथजी काटजू या ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सैनिकाचे व पं. नेहरूंच्या सरकारातील ज्येष्ठ मंत्र्याचे सुपुत्र म्हणवितात ते कैलासनाथजी दीर्घकाळ गांधीजींसोबत त्यांच्या लढ्यात राहिलेही आहेत. गांधीजींच्या कालमानानुसार बदलत गेलेल्या भूमिका व कैलासनाथजींचे त्यांच्याशी असलेले सख्य हे सारे लक्षात घेतले की त्या थोर स्वातंत्र्यसैनिकाच्या या दिवट्या चिरंजीवाचे आताचे वागणे व बरळणे हा वेडेपणाचा भाग वाटू लागतो. इंग्रजांनी ‘फोडा आणि झोडा’ या धोरणाने भारतात हिंदू व मुसलमानात वैर उभे केले. गांधीजींच्या सनातनत्वाच्या ग्वाहीने त्याला खतपाणी मिळाले असे या मार्कंडेयांचे म्हणणे आहे. हिंदू-मुसलमानांचे ऐक्य राखण्यासाठी गांधीजींनी आपल्या प्राणांची आहुती दिली हे देदीप्यमान सत्य मात्र सूर्याचे नाव सांगणाऱ्या या मार्कंडेयाला दिसू नये या गोष्टीचा संबंध वेडसरपणाखेरीज आणखी कशाशी जोडता येईल? मार्कंडेय काटजू हे गंभीर विचारवंत वा अभ्यासू वक्ते म्हणून तसेही फारसे परिचित नव्हते. वडिलांच्या नावाने मोठे होणाऱ्या व मोठी पदे मिळविणाऱ्या पोरांमध्ये जे अहंमन्यपण येते ते त्यांच्यात भरपूर होते. त्यांच्या साध्या वागण्याबोलण्यातही ते दिसत होते. त्यांच्या नावावर असलेली पुस्तकेही कोणी फारशी गंभीरपणे घेतल्याचे आजवर दिसले नाही. आपल्याभोवती खुषमस्कऱ्यांचा एक वर्ग बाळगणे आणि त्याच्या तोंडून आपले कौतुक ऐकत राहणे हाही त्यांचा एक स्वभावविशेष होता. तशीही आपल्या राजकारणात काहीएक चांगले न करता नुसते बोलून बिघडविणाऱ्या माणसांची संख्या मोठी आहे. कोणत्याही थोर वा मोठ्या माणसावर आपल्या थुंकीचे शिंतोडे उडविले की आपल्याला प्रसिद्धी मिळते हे त्यांना कळत असते. सुब्रह्मण्यम स्वामी हा त्यातलाच एक नमुना आहे. अशा माणसांत आता साक्षी महाराज, आदित्यनाथ, प्राची, निरंजना, सिंघल, तोगडिया अशा आणखी डझनभर माणसांची भर पडली आहे. आपल्या मागे कोणी नाही आणि आपली दखल घेऊन आपल्याला जाब विचारण्याची सवडही कुणाला नाही याची एकदा खात्री पटली की माणसे काहीबाही बरळू लागतात. मार्कंडेय काटजू यांचा आताचा म्हातारचळ त्या प्रकारातला आहे. त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून त्यांचे पूज्य पिताजी कैलासनाथजी आज हयात नाहीत. नाहीतर असे बरळल्यावरून त्यांनीच या मार्कंडेयबाळाच्या कानशिलात दोन लगावून त्याची अक्कल ठिकाणावर आणली असती... प्रश्न अशा उठवळांच्या बोलण्या-वागण्याचा नाही. त्यांच्या तशा लीलांना प्रसिद्धी देऊन देशातील वंदनीय विभूतींविषयी अकारण व खोटे भ्रम निर्माण करण्याच्या प्रवृत्तीचा हा प्रश्न आहे. तसेही या मार्कंडेयांना आता कोणी विचारीत नाही. आपल्या आताच्या वक्तव्याने यापुढेही आपली कोणी दखल घेणार नाही याची व्यवस्थाच त्यांनी करून घेतली आहे. एकेकाळी या माणसाने समाजातील अनेकांच्या मनात स्वत:विषयीच्या ज्ञानाचा एक भ्रम उभा केला होता. त्याचा निरास असा होताना त्यांना पहावा लागणे हे या साऱ्या प्रकारातले दु:ख आहे. मुळात खोट्या असलेल्या माणसांना भ्रमही जपता येत नाहीत हा याचा अर्थ.