- राजदीप सरदेसाई(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)खेलोगे कुदोगे तो होंगे खराब,पढोगे लिखोगे तो बनोगे नवाब हिन्दीतील वरील म्हण कित्येक वर्षे चलनात आहे, कारण ती खेळांकडे बघण्याचा भारतीयांचा दृष्टिकोन दर्शविणारी आहे. मुलगा शाळेतील धावण्याच्या स्पर्धेत पहिला आला तर आपल्याला बरे वाटते, परंतु त्याने आयआयटी वा मेडिकलला प्रवेश घेतला तर आपल्याला आनंद होतो. उसेन बोल्टने आॅलिम्पिकमध्ये सलग तिसरे सुवर्णपदक जिंकणे किंवा मायकल फेल्प्सने पोहण्याच्या स्पर्धेत इतिहास रचणे बघायला आपल्याला नक्कीच आवडते पण आपल्या मुलाला व्यावसायिक क्रीडापटू बनविण्याचा विचारही आपण करु शकत नाही. नाही म्हणायला क्रिकेटकडे त्या दृष्टीने पाहिले जाते, पण अॅथलेटिक्स, मुष्टियुद्ध, फुटबॉल आणि तितकेच नव्हे तर राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीकडे साफ दुर्लक्षच केले जाते. कारण शहरी मध्यमवर्गाला अन्य कोणत्याही गोष्टींपेक्षा सुरक्षित नोकरीपेशाचे अधिक आकर्षण असते. रिओ आॅलिम्पिकमध्ये आपल्या पदरी निराशाच पडली असली तरी वातावरण बदलते आहे, हे नक्की. प्रत्येक स्पर्धेनंतर वाढत जाणाऱ्या अपेक्षांचा तो परिणाम आहे. बिजींग आॅलिम्पिकमध्ये तीन तर लंडनमध्ये आपल्याला सहा पदके मिळाल्याने साहजिकच रिओमध्ये डझनभर पदकांची अपेक्षा निर्माण झाली होती. २००८च्या बिजींग आॅलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने सुवर्ण पदक मिळविले तो क्षण अविस्मरणीय होता, कारण तोवर हॉकीशिवाय अन्य कोणत्याही खेळात आपण पदकांची अपेक्षा करीत नव्हतो. २००४मध्ये राज्यवर्धन राठोडने नेमबाजीत रजत पदक मिळवून ज्या अपेक्षा वाढवून ठेवल्या, त्यात अभिनव बिंद्राने भर घातली होती. तोवर यशाच्या इतक्या नजीक एकही भारतीय पोहोचला नव्हता. बहुधा त्यामुळेच देशाच्या क्रीडा क्षेत्रात धीम्या गतीने क्रांती पर्व सुरु झाल्याचे मानण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे आणि रिओ आॅलिम्पिकमध्ये तब्बल १२० खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व करावे हा त्याचाच एक परिणाम आहे.महानगरांमधील उच्चभ्रू लोक केवळ क्रीडा-प्रेक्षक म्हणूनच वावरत असताना आज खेळाने भौगोलिक आणि वर्ग मर्यादा ओलांडून सर्वदूर प्रवेश केला आहे. देशाच्या क्रीडाक्षेत्रात आजवर कोणतेही योगदान नसलेल्या त्रिपुरातील दीपा कर्माकरने सारा भेदच नष्ट करुन टाकला आहे. क्रिकेटमधील मुंबईची मक्तेदारी मोडून काढल्यानंतर आपण विश्वविजेते झालो, त्याच प्रमाणे आता आॅलिम्पिकच्या माध्यमातून हेही स्पष्ट झाले आहे की खेळातले कौशल्य शहरांच्या सीमांच्या पलीकडेही अस्तित्वात आहे. जुनी पिढी क्रीडा क्षेत्राकडे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून बघत आली असली तरी नव्या पिढीच्या नजरेत मात्र ते विविध अपेक्षांनी भारलेले क्षेत्र ठरते आहे. बिजींग आॅलिम्पिकमध्ये मुष्टियुद्धात कांस्यपदक मिळवणाऱ्या विजेंदर सिंगला भेटले की याची खात्री पटते. तो आता एक व्यावसायिक मुष्टियोद्धा झाला असून हरयाणातील भिवानीत वाढलेला हा तरुण सध्या मँचेस्टर शहरात राहतो आहे. तिथल्या थंड आणि आर्द्र वातावरणात सराव करतो आहे. इंग्रजीची अडचण येते, घरच्यासारखे जेवण मिळत नाही, तरीही तो मोठ्या अपेक्षेने व्यावसायिक मुष्टियुद्धाच्या वर्तुळात अस्तित्वाचा झगडा देतो आहे. ‘मला जगज्जेता मुष्टियोद्धा व्हायचे आहे’, असे तो हरयाणवी-इंग्रजीत सांगत असतो. तो यशस्वी होईल, न होईल पण त्याची महत्वाकांक्षा यातून प्रतीत होते. आॅलिम्पिक स्पर्धांबाबत आता भारतात काही मानबिंदूदेखील तयार झाले आहेत. जागतिक स्तरावर प्रथम क्रमांक मिळवणारी सायना नेहवाल देशातील बॅडमिंटनच्या उदयाची कारक ठरली आहे. हैदराबादेतील गोपीचंद बॅडमिंटन अॅकॅडमी बघितली तर हे सहज लक्षात येईल. गत काळातील जागतिक दर्जाचे खेळाडू गीत सेठी, प्रकाश पदुकोण, विश्वनाथन आनंद यांनी एकत्र येऊन आॅलिम्पिक गोल्ड क्वेस्ट अभियान सुरु केले असून भारताला आॅलिम्पिक क्रीडा राष्ट्र बनविण्याचे त्यांचे स्वप्न आहे. माध्यमेदेखील आता क्रिकेटच्या पलीकडे जाऊन सर्व खेळांना प्रसिद्धी देत आहेत. चोवीस तास क्रीडा स्पर्धांचे प्रक्षेपण करणाऱ्या वाहिन्यांमध्येही स्पर्धा आहे. त्याचा परिणाम म्हणून प्रेक्षकदेखील अन्य खेळांना पसंती देऊ लागले आहेत. ‘स्टार स्पोर्ट्स’ने पारंपरिक कबड्डीला इतक्या आकर्षकपणे सादर केले आहे की या खेळातही सुपरस्टार निर्माण झाले आहेत. हा खेळ आॅलिम्पिकमध्ये समाविष्ट झाला तर नक्कीच भारताला पदके मिळतील. असाच प्रयोग हॉकीमध्ये अवलंबण्यात आल्याने जगभरातले प्रतिभावान हॉकीपटू हॉकी लीगमध्ये सहभागी होण्यासाठी दाखल होत असतात. त्यामुळे स्थानिक संघांच्या खेळाचा दर्जा वाढतच चालला आहे. रिओ मध्ये भारतीय हॉकी संघाने उपांत्यपूर्व सामान्यांपर्यंत मारलेली धडक त्याचाच परिणाम आहे. भारतीय संघाच्या मनातील युरोपातील संघांविषयीची भीती केव्हाच नष्ट झाली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे देशातील मोठे उद्योग समूह आणि क्रीडा अधिकारी अजूनही आॅलिम्पिकबाबतचा त्यांचा दृष्टिकोन बदलायला तयार नाहीत. अजूनही अनेक उद्योग समूह क्रिकेटच्याच प्रसिद्धीला शरण जात असतात. आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याची क्षमता असणाऱ्या खेळांना एकही उद्योग पुरस्कृत करीत नाही. रिओ येथील आॅलिम्पिक व्हिलेज मध्ये भारतीय पद्धतीचे जेवण मिळण्याची पंतप्रधानांची शाश्वती पुरेशीे नाही. नोकरशहांची मानसिकता बदलायला हवी. वेगवान धावपटू द्युती चंद सामान्य श्रेणीतून प्रवास करीत असताना अधिकारी मात्र पहिल्या वर्गातून प्रवास करतात. दीपा कर्माकरने वैद्यकीय सहाय्यकाला सोबत नेण्याची विनंती केली, पण ती अव्हेरली गेली. विजेता होण्यासाठी खेळाडूला किती आणि कोणते कष्ट घ्यावे लागतात, याची आपल्या नेत्यांना व अधिकाऱ्यांना कल्पना तरी आहे? पदकांची अपेक्षा वाढत असताना अशी मनोवृत्ती काय कामाची? ताजा कलम- शोभा डे यांनी रिओत दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंवर सेल्फी घेण्यासाठी ते गेले असल्याचा दावा केला होता. पण आता डाव उलटला आहे. क्रीडा मंत्री विजय गोयल यांना रिओत जाऊन सेल्फी काढण्याची उबळ दाबता आली नाही. पण त्यांना तरी कसा दोष द्यायचा, कारण तेही एक राष्ट्रीय खेळच खेळत होते. नेत्यांच्या मागे मागे पळायला लावण्याचा!
क्रीडा क्षेत्रात धीमेपणाने का होईना क्रांतीपर्व सुरू
By admin | Updated: August 19, 2016 04:24 IST