केन्द्र सरकारने आणि त्याहून महत्वाचे म्हणजे संरक्षण मंत्र्यानी केलेल्या विधानास छेद देऊन मंत्री आणि सरकार या दोहोंना जाहीररीत्या खोटे पाडण्याचा प्रयत्न केल्याची शिक्षा म्हणून तटरक्षक दलाचे उप महानिरीक्षक बी.के. लोशाली यांना सेवेतून बडतर्फ करण्याची व त्यांचे सेवा समाप्तीनंतरचे सारे लाभदेखील रद्द करण्याची सजा जरा जास्तीच कठोर असल्याचे कोणालाही वाटू शकेल. अर्थात सरकारमधील गणवेषधारी यंत्रणांना अत्यंत कठोर प्रशिक्षण दिले जात असल्याने त्यांच्याकडून तितक्याच कठोर शिस्तपालनाचीही अपेक्षा ठेवली जात असते आणि म्हणून लोशाली यांचे वर्तन शिक्षेस पात्र होते याबाबत मात्र कोणाच्याही मनात शंका उत्पन्न होऊ नये. पाच अधिकाऱ्यांमार्फत तीन महिने चौकशी केल्यानंतर मगच लोशाली यांच्यावर लष्करी न्यायालयाने (कोर्ट मार्शल) सदर कारवाई केली असली तरी ज्या प्रकरणामधून हे सारे उद्भवले त्या प्रकरणातील सत्य मात्र गुलदस्त्यातच राहिले आहे. गेल्या वर्षी नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला तटरक्षक दलाला गुजरातमधील पोरबंदरनजीक देशाच्या सागरी हद्दीत एक संशयास्पद मासेमारी बोट आढळून आली. तटरक्षक दलाने तिचा पाठलाग सुरु केला आणि काही वेळात त्या बोटीतील स्फोटकांनी पेट घेतला व ती जळून खाक झाली असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी जाहीरपणे सांगितले. बोटीत आत्मघातकी अतिरेकी होते व पकडले जाण्याच्या भीतीने तिच्यातील अतिरेक्यांनी आत्मघात करुन घेतला असेही पर्रीकर म्हणाले होते. त्याच सुमारास पाकिस्तानातील कराची येथून अशा काही बोट (तिचे नाव कलंदर) भारताच्या दिशेने निघाली होती का याची चौकशी केली गेली असता तिचे उत्तर नकारार्थी आले. तो नेहमीसारखा पाकचा खोटारडेपणा असल्याचे साऱ्यांनीच गृहीत धरले. त्यानंतर पुढच्याच महिन्यात लोशाली यांनी गांधीनगरमध्ये आयोजित एका जाहीर समारंभात बोलताना, ती संशयास्पद बोट नष्ट करण्याचे आदेश आपणच दिले होते असे सांगितले. मंत्र्याचे कथन आणि लोशाली यांचे हे उद्गार यात विसंगती आढळून आल्यावर आपण जे बोललो त्याचा विपर्यास केला गेल्याचा खुलासा लोशाली यांनी करुन पाहिला पण त्यांनी केलेल्या भाषणाची ध्वनिफीतच हजर केली गेली. कोर्ट मार्शलमध्ये ते दोषी आढळणार हे तिथेच स्पष्ट झाली. त्याची शिक्षाही आता त्यांना दिला गेली. या शिक्षेला ते आव्हान देऊ शकतात वगैरे सारे ठीक असले तरी त्यांना झालेली शिक्षा नेमकी शिस्तभंग केल्याबद्दल नसून एका मंत्र्याला खोटे पाडले म्हणून केली गेली आहे. परंतु तसे असले तरी नेमके खोटे कोण बोलले, मंत्री की लोशाली हा संभ्रम मात्र तसाच राहिला आहे.
नेमके सत्य काय?
By admin | Updated: December 16, 2015 04:16 IST