शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

गुजरातच्या यशाचा महाराष्ट्राशी काय संबंध?; सरकारला अस्मितेचे भान ठेवावे लागेल

By यदू जोशी | Updated: December 9, 2022 10:04 IST

गुजरातेत भाजपला भारीभक्कम यश मिळाले म्हणून महाराष्ट्रात या पक्षाला लगेच मोठा फायदा होईल, असे म्हणणे चुकीचे ठरेल.

यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

महाराष्ट्रातील भाजपचे बरेचसे नेते गुजरातमधील प्रचारात गेले होते. एक-दोन जण मिळून एकेका विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. प्रत्यक्ष प्रचारापेक्षा ते समन्वयाचे काम करत होते. साडेतीन दशके पक्षाचे काम करणारे प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर आणि मुंबईतील आमदार योगेश सागर यांच्या नेतृत्वात टीम महाराष्ट्र तिकडे फिरत होती. ज्या दक्षिण गुजरातमध्ये ते तैनात होते तिकडेही चांगलेच यश मिळाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झालेल्या मतदारसंघांमध्ये चांगले यश मिळाले. विजयामागे अनेक फॅक्टर असतात; पण या दोघांच्या सभा झाल्या तिथे भाजपचा पराभव झाला असता तर ओढूनताणून या दोघांशी संबंध लावलाच असता ना?  

राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना बडोदा, छोटे उदयपूरमध्ये जिथे भाजपला बंडखोरीने ग्रासले होते तिकडे मुद्दाम तळ ठोकून बसायला सांगितले होते. तावडेंनी मोहीम फत्ते केली. हिमाचल प्रदेशमध्ये बहुमतासाठी दोनचार जागा कमी पडतील; अशावेळी फोडाफोडी, अपक्षांना सोबत घेणे यासाठी तावडेंना तिकडे बुधवारीच पाठविले खरे, पण काँग्रेसने दमदार यश मिळविल्याने मोहिमेचे काम पडलेच नाही. गुजरात आपला शेजारी. आपल्याकडील प्रकल्प तिकडे पळवून नेण्यावरून बरेच आरोप-प्रत्यारोप अलीकडे झाले. गुजरातबद्दल एक प्रकारची असुया आपल्याकडे आहे. कोणाला ती मोदी-शहांचा गुजरात असल्याने आहे तर कोणाला मुंबईवरील वाढत्या गुजराती वर्चस्वामुळेदेखील आहे. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन हा दोन संपन्न राज्यांना जोडणारा अत्यंत उपयुक्त असा प्रकल्प आहे, जो गतिमान विकासासाठी साहाय्यभूत ठरणार आहे. पण त्यालाही आपल्याकडे काही जण विरोध करतात.

विकासाला विरोध करायचा आणि मग पुढे उभ्या राहिलेल्या प्रकल्पांचे पहिले लाभार्थीही बनायचे, हे अनेक ठिकाणी घडते. बुलेट ट्रेन प्रकल्पाला आता अधिक गती येईल. गुजरात-महाराष्ट्र आंतरराज्य नदीजोड प्रकल्पालादेखील गती येईल. सुरतमध्ये जो अतिभव्यदिव्य डायमंड हब उभा राहिला आहे, तो दोन-तीन महिन्यांत सुरू  होईल. तेव्हा मुंबईतील चाळीस टक्के  हिरे व्यापार सुरतमध्ये जाण्याची शक्यता आहे. गुजरातेत पुन्हा एकदा भाजपच जिंकल्याने महाराष्ट्रातून ते आणखी काही पळवून नेणार नाहीत याची काळजी शिंदे-फडणवीस सरकारला करावी लागेल. गुजरातशी सख्य राखताना अस्मितेचे भानही ठेवावे लागेल. इकडे कर्नाटक, तिकडे गुजरात अशा स्थितीत अस्मिता राखण्याचे मोठे आव्हान आहे. साडेपाच दशकांच्या राजकीय कारकिर्दीत सीमाप्रश्न न सोडविणारे मोठे साहेब ४८ तासांचा अल्टिमेटम देतात, तेव्हा हसू मात्र नक्कीच येते.

मुंबई, ठाणे या गुजराती मतांचा मोठा टक्का असलेल्या शहरांमध्ये गुजरातमधील एकतर्फी निकालाचा फायदा भाजपला निश्चितच होईल.  या दोन शहरांमधील गुजराती मतदार हा पैसेवाला आणि भाजपनिष्ठ आहे. मात्र, भाजपची गुजरातमधील सत्ता गेली असती तर त्याचा मोठा फटका मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाला बसला असता. काँग्रेसचे मनोबल वाढले असते. आम आदमी पार्टीला गुजरातमध्ये कमी जागा मिळाल्या असल्या तरी उल्लेखनीय असा मतटक्का त्यांच्या झोळीत पडला आहे. त्यामुळे मुंबईच्या दरवाजावर आप धडकू शकतो.  प्रस्थापित सर्वच पक्षांसाठी ही धोक्याची घंटा आहे. दिल्ली महापालिकेतील विजय, गुजरातमधील शहरी मतदारांनी दिलेली पसंती हे फॅक्टर लक्षात घेता आपला पांढरपेशा वर्ग पसंती देऊ शकेल, ही भाजपसाठी वॉर्निंग आहे. ‘आप’ला मुंबईत गांभीर्याने लढायचे असेल तर इथले सध्याचे कुचकामी नेते बदलावे लागतील. ते स्वत:ची ओळखही निर्माण करू शकलेले नाहीत तर पक्षाची ओळख काय निर्माण करणार?  

गुजरातेत भाजपला भारीभक्कम यश मिळाले म्हणून महाराष्ट्रात या पक्षाला लगेच मोठा फायदा होईल, असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण, आपल्याकडचे राजकारण, राजकारणातील संदर्भ आणि समीकरणे अत्यंत वेगळी आहेत. मात्र, गेले काही महिने अनेक मुद्द्यांवरून महाराष्ट्रात घेरले गेलेल्या भाजपला गुजरातमधील विजयाने निश्चितच हायसे वाटले असेल. गुजरातमध्ये प्रचारकाळात फिरताना आलेले चांगले अनुभव नमूद केलेच पाहिजेत. आदर्श निवडणूक आचारसंहितेचे पालन त्या ठिकाणी होते. मोठमोठे तर सोडाच, लहान होर्डिंगही लावलेले नाहीत, असे अनेक चौक दिसत होते. कुठेही भोंग्यांवरून कर्कश्श आवाज येत नव्हते. प्रचाराच्या गाड्या भरधाव जाताना दिसत नव्हत्या. सोन्याचे कडे, पाच बोटात सहा अंगठ्या, शर्टाची दोनतीन बटणं उघडी ठेवून श्रीमंतीचा माज दाखविणारे कार्यकर्ते कोणत्याही पक्षात दिसले नाहीत. 

अनेक श्रीमंत उमेदवार रिंगणात होते; पण श्रीमंतीचा बडेजाव नव्हता. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी गुजरातकडून हे सगळे खूप शिकण्यासारखे आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असलेली भाजपची भव्य कार्यालये, प्रचार यंत्रणेचे आणि पाचही वर्षे पक्ष विस्तारासाठी जी मेहनत गुजरातमधील नेते, कार्यकर्ते घेतात त्याच्या पन्नास टक्केही मेहनत आपल्याकडे दिसत नाही. जाता जाता - हा योगायोग समजा की काही महिन्यांपासून आपल्या मंत्रालयाच्या कँटिनमध्ये ढोकळादेखील मिळू लागला आहे. प्रकल्प बाहेर अन् पदार्थ आत येत आहेत!

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपाAAPआप