विश्वस्तवृत्तीचा अभाव का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 06:08 AM2018-08-20T06:08:37+5:302018-08-20T06:10:03+5:30

पाच-पाच हजार कोटींच्या आलिशान राजवाड्यामध्ये राहणारे हे देशाचे ‘राजे’ नागरिक, असलेले लोक आपत्तींच्यावेळी काय करतात?

what business mans are not helping flood affected peoples of kerala | विश्वस्तवृत्तीचा अभाव का?

विश्वस्तवृत्तीचा अभाव का?

googlenewsNext

केरळला आपल्या प्राचीन ग्रंथांनी देवभूमी म्हटले आहे. या भूमीवरच आता नियतीचा कोप प्रलयाच्या रूपाने कोसळला असून त्यातली लाखो माणसे बेघर, हजारो बेपत्ता आणि तेवढ्याच घरांची, रस्त्यांची, पुलांची व रेल्वे मार्गाची हानी झाली आहे. आपत्तीने केलेल्या एकूण उत्पाताचा प्राथमिक अंदाज १९ हजार कोटींवर जाणारा आहे. केरळ ही ज्ञानवंतांची, अभ्यासकांची, लेखकांची आणि कर्तृत्वसंपन्नांचीही भूमी आहे. मात्र निसर्गाचा कोप अशा माणसांना व त्यांच्या भूमीला वेगळे करीत नाही हा जगाचा अनुभव आहे. अशा आपत्तीच्या काळात सारा देश एक होतो व आपत्ग्रस्तांना मदतीचा हात देतो हाही आपला इतिहास आहे. केरळचे पिनारायी सरकार त्याच्या सर्वशक्तिनिशी या संकटाशी झुंजत असतानाच त्याला केंद्र सरकारने ६०० कोटींची मदत तत्काळ पुरविली आहे. शिवाय लष्कर, हवाई दल व नौसेना यांचेही साहाय्य त्या राज्यात रवाना केले आहे. महाराष्ट्र सरकारने २५ कोटींचे साहाय्य जाहीर केले व आता काँग्रेससह अनेक पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी त्यांचे वेतन या मदत कार्याला पाठविले आहे. मात्र फाटलेले आकाश शिवायला ही मदत पुरेशी नाही. केरळमधील अनेक तरूण व तरूणी युनायटेड, अरब गणराज्यात त्यांची सेवा देत आहेत. त्या देशानेही आपले साहाय्यतेविषयीचे कर्तव्य बजावले आहे. देशातील इतर राज्ये, संघटना आणि सामान्य लोकही या भीषण संकटाने हेलावले आहेत. त्यांच्याकडूनही केरळच्या दिशेने मदतीचा ओघ वाहू लागला आहे. तसा तो राज्याराज्यातून वाहूही लागला आहे. ज्या देशाची वार्षिक योजना काही लक्ष कोटींची असते त्याला १९ हजार कोटींचे नुकसान भरून काढता येणे जमणारेही आहे. मात्र प्रत्येकच नैसर्गिक वा अन्य कोपासाठी केवळ सरकारनेच पुढे येणे व लोकांनीही सरकारवरच अवलंबून राहणे ही वृत्ती फारशी चांगली नाही. सरकार जनतेचे असल्याने ते आपली जबाबदारी पार पाडतच असते. मात्र एवढे सारे नुकसान एकट्याने भरून काढण्याएवढी ऐपत असणारे धनवंत उद्योगपती या देशात फार आहेत. एका आर्थिक सर्वेक्षणात देशातील एक टक्का लोकांकडे त्यातील ७९ टक्के संपत्तीचा संचय असल्याचे आढळले आहे. उरलेली माणसे बाकीच्यात समाधान मानणारी वा कसेबसे जगणारी आहेत. यासंदर्भात देशातील बड्या धनवंतांना गांधीजींचे शब्द आठवत नसतील तर ते देशाचे दुर्दैव आणि या धनवंतांचे करंटेपण आहे. आपली संपत्ती आपली नसून आपण तिचे केवळ विश्वस्त आहोत असे समजण्यात व ती समाजाच्या गरजेच्या वेळी कामी आणता येणे ही विश्वस्तबुद्धी आहे़ गांधींजी वर्गसंघर्षाऐवजी वर्गसमन्वयावरच विश्वास ठेवीत़ केरळातील आपत्तीने सामान्य माणसे द्रवलेली दिसत असली तरी देशातील कोणत्याही मोठ्या उद्योगपतीला तिने अजून पाझर फोडल्याचे दिसत नाही. तीन-तीन अन् चार- चार लक्ष कोटींच्या उद्योगाचे मालक असणारे, दरदिवशी कित्येक लाखांचा खर्च स्वत:वर व आपल्या कुटुुंबावर करणारे आणि पाच-पाच हजार कोटींच्या आलिशान राजवाड्यामध्ये राहणारे हे देशाचे ‘राजे’ नागरिक, असलेले लोक अशावेळी काय करतात? स्वातंत्र्याच्या लढ्याला साहाय्य करणारे सगळेच उद्योगपती व धनवंत आता इतिहासजमा झाले काय? एखादा बिल गेट्स आपल्या संपत्तीचा निम्मा वाटा जगाच्या कामासाठी देतो़ तो गांधींचा खरा अनुयायी असतो त्याला तशी मानसिकता लाभत असते. आपल्या समाजातील अशा वर्गात ही वृत्ती आली तर केवळ केरळसारख्या संकटग्रस्त भागाचेच कल्याण होणार नाही, तर गांधींचा वर्गसमन्वय प्रत्यक्षात येऊन या धनवंताचे भवितव्यही सुरक्षित होईल़

Web Title: what business mans are not helping flood affected peoples of kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.