नियोजित वेळेपेक्षा नऊ महिने अधिक काळ आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात (आयएसएस) व्यतीत केल्यानंतर, भारतीय वंशाच्या ज्येष्ठ अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स बुधवारी त्यांचे सहकारी बुच विल्मोर, निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोरबुनोव्ह यांच्यासह, भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ३:२७ वाजता सुरक्षितपणे पृथ्वीवर परतल्या. त्यांच्या स्पेसएक्स क्रू ड्रॅगन कॅप्सूलने फ्लोरिडाच्या किनारपट्टीजवळ, मेक्सिकोच्या आखातात अचूक 'स्प्लॅशडाऊन' केले आणि एका असाधारणरीत्या वाढलेल्या मोहिमेचा सुखद शेवट झाला.
जून २०२४ मध्ये चाचणी उड्डाण म्हणून नियोजित केलेली अवघ्या आठ दिवसांची मोहीम, अंतराळयानात उद्भवलेल्या अनपेक्षित तांत्रिक अडचणींमुळे तब्बल २८६ दिवसांपर्यंत वाढली. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी बोईंग कंपनीद्वारा विकसित स्टारलाइनर यानातून ‘आयएसएस’कडे प्रस्थान केले होते. स्टारलाइनरची ही पहिलीच मानवी मोहीम होती. ‘नासा’च्या व्यावसायिक क्रू कार्यक्रमात स्पेसएक्ससोबतच बोईंगला एक विश्वासार्ह भागीदार म्हणून स्थापित करणे आणि अंतराळवीरांच्या वाहतुकीसाठीच्या पर्यायांत विविधता आणणे हा या चाचणी उड्डाणाचा उद्देश होता. पृथ्वीवरून आयएसएसपर्यंत आणि परत अंतराळवीरांची ने-आण करण्याची क्षमता स्टारलाइनरने सिद्ध करणे अपेक्षित होते; मात्र स्थानकात पोहोचल्यानंतर लवकरच यानातील इंधन गळती, थ्रस्टर यंत्रणेतील दोष आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे ते परतीच्या प्रवासासाठी अपयशी ठरू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली. परिणामी `नासा’ने विल्यम्स आणि विल्मोर यांना स्थानकातच ठेवण्याचा आणि स्टारलाइनरला चालकविरहित अवस्थेत पृथ्वीवर परत आणण्याचा निर्णय घेतला. या अनपेक्षित संकटाने अंतराळवीरांच्या शारीरिक व मानसिक कणखरतेची परीक्षा घेतली आणि मानवी अंतराळ उड्डाणातील अंतर्निहित आव्हाने व गुंतागुंत अधोरेखित केली.
मोहीम अनपेक्षितरीत्या लांबूनही, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी मात्र त्यांच्या नवीन दिनचर्येशी सहजपणे जुळवून घेतले होते. निष्क्रिय दर्शक होण्याऐवजी, त्यांनी दीडशेहून अधिक प्रयोगांमध्ये योगदान दिले. त्यामध्ये अंतराळ शेती, मानवी आरोग्यावरील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचे परिणाम आणि अंतराळात द्रवांचे वर्तन, इत्यादी वैज्ञानिक विषयांचा समावेश होता. वैज्ञानिक योगदानांव्यतिरिक्त, विल्यम्स आणि विल्मोर यांनी आयएसएसच्या देखभालीमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, आवश्यक दुरुस्ती केली आणि `स्पेस वॉक’देखील केले.
या विस्तारित कालावधीत, सुनीता विल्यम्स यांनी कारकिर्दीत दुसऱ्यांदा आयएसएसच्या नेतृत्वाची धुराही सांभाळली. त्यांनी माजी नासा अंतराळवीर पेगी व्हिटसन यांचा, महिला अंतराळवीराद्वारे सर्वाधिक एकत्रित ‘स्पेस वॉक’चा विक्रमही मोडला. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत आयएसएसबाहेर एकूण ६२ तास आणि ६ मिनिटे घालवली आहेत. सुनीता विल्यम्स भारतीय वंशाच्या असल्याने संपूर्ण भारत त्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात चिंताक्रांत होता. बुधवारची रात्र अनेक भारतीयांनी वृत्तवाहिन्यांकडे डोळे लावून जागून काढली आणि सुनीता विल्यम्स यांच्या सुरक्षित आगमनासाठी प्रार्थना केली. अंतराळयान सुरक्षितपणे समुद्रात उतरल्याचे स्पष्ट होताच, अमेरिकेप्रमाणेच भारतातही जल्लोष झाला.
सुनीता विल्यम्स यांचे मूळ गाव असलेल्या गुजरातमधील झुलासनमध्ये तर विशेष जल्लोष झाला. सुनीता विल्यम्स यांचे यश संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा विषय ठरले आहे. अशाच एका अंतराळ मोहिमेदरम्यान पृथ्वीवर परतताना अंतराळयानात स्फोट झाल्याने निधन झालेल्या भारतीय वंशाच्या महिला अंतराळवीर कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स या दोघींनी अनेक भारतीय तरुण-तरुणींना विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रात ‘करिअर’ करण्याची प्रेरणा दिली आहे.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा वाढीव अंतराळ मुक्काम, अंतराळ प्रवासातील अनिश्चितता आणि आव्हानांकडे लक्ष वेधतो. भविष्यातील मोहिमांसाठी दीर्घकालीन अंतराळ प्रवासाची तयारी, विश्वासार्ह अंतराळयानांची उपलब्धता आणि नव्याने विकसित यंत्रणांची काटेकोर चाचणी घेण्याचे महत्त्वच त्यातून अधोरेखित झाले आहे. लवकरच ‘गगनयान’ मोहीम हाती घेणार असलेल्या भारतासाठीही हा मोठा धडा आहे. परतीला अनिश्चित विलंब होऊनही सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय संयम आणि धैर्याने परिस्थिती हाताळली. त्यांच्या यशस्वी परतीने अंतराळ संशोधनातील एक नवा अध्याय लिहिला गेला आहे !