शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वी आर सॉरी, सशीन लीटलफेदर! तुझे बरोबर होते!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2022 07:38 IST

‘ऑस्कर’ने तब्बल पन्नास वर्षांनंतर तिची जाहीर माफी मागितली आहे. तत्त्वासाठी तिने आयुष्यभराची किंमत मोजली खरी; पण अखेर सत्याचाच विजय झाला!

- संजय आवटे, संपादक, लोकमत, पुणे

तिनं जगासमोर भूमिका मांडली, तेव्हा ती अवघ्या पंचवीस वर्षांची होती. भूमिका करणं सोपं असतं. भूमिका घेणं कठीण. घेतलेल्या भूमिकेची किंमत चुकवावी लागते. व्यवस्थेला जाब विचारण्याची किंमत मोठी असते. तिनं मांडलेल्या या भूमिकेमुळे तिला अवमानित केलं गेलं. त्यानंतर तिच्यावर बहिष्कार घातला गेला. नंतरची पाच दशकं तिनं एकाकी झुंज दिली. प्रकाशाच्या झगमगाटात असलेली ही अभिनेत्री अंधाराच्या गर्तेत फेकली गेली. मात्र, ती हरली नाही. काम करत राहिली. पन्नास वर्षांनंतर तिला ‘न्याय’ मिळाला. ज्यांनी तिला अवमानित केलं, त्यांनीच तिची लेखी माफी मागितली. येत्या १७ सप्टेंबरला तिच्या अमृतमहोत्सवी वाढदिवशी ही माफी जाहीरपणे मागितली जाणार आहे! -हे समजल्यावर ती फक्त निरागस हसली. कर्करोगाने ग्रासलेली ७५ वर्षांची ही योद्धा म्हणाली, ‘फक्त ५० वर्षे! आम्ही आहोतच सहिष्णू. आम्हाला ठाऊक आहे, लढा मोठा आहे आणि पल्ला लांबचा आहे!’

सशीन लीटलफेदर ही अमेरिकेतली अभिनेत्री. रेड इंडियन वडील आणि युरोपियन-अमेरिकन आई यांची ही मुलगी. अभिनेत्री आणि त्याचवेळी मानवी हक्कांसाठी लढणारी झुंजार कार्यकर्ती. अमेरिकेत कृष्णवर्णीयांना, स्थानिक अमेरिकी नागरिकांना जी दुय्यम वागणूक मिळते, त्याच्याविरोधात सशीनने सत्याग्रह सुरू केला.

ही गोष्ट १९७३ मधील. ‘द गॉडफादर’ या जागतिक ख्यातीच्या चित्रपटासाठी मार्लन ब्रॅंडो या अभिनेत्याला सर्वोत्तम अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. मार्लन ब्रॅंडो या सोहळ्याला आला नाही. त्याने आपल्यावतीने पाठविले समविचारी सशीनला. जेम्स बाॅण्डचा ब्रॅण्ड ज्याने आणखी लोकप्रिय केला, तो राॅजर मूर आणि जगाची लाडकी लिव्ह उलमन यांनी या पुरस्काराची बाहुली घेण्यासाठी सशीनचे गोड हसून स्वागत केले. याच सोहळ्यात सशीनने पुरस्काराची बाहुली घेण्याचे नाकारले आणि अवघं एक मिनिट ती बोलली. त्यात तिने सामाजिक न्यायाची भूमिका मांडली. नेटिव्ह अमेरिकी नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारांवर ती बोललीच. पण, मुख्य म्हणजे, हॉलिवूड आणि माध्यमातून या संदर्भात जे विपर्यस्त चित्रण होते, त्यावरही तिने कोरडे ओढले. 

ती हे बोलत असताना, भले-भले सेलिब्रिटी तिची अवहेलना करत होते. तिच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला. सोहळा संपला, पण सशीनवरचा बहिष्कार कायम राहिला. तिच्या चारित्र्यहननाचे प्रयत्न झाले. तिला कोणी महत्त्वाच्या भूमिका दिल्या नाहीत. काम दिले नाही. पण ती बोलत राहिली. लढत राहिली. सशीन आज ७५ वर्षांची आहे. तिला अवमानित करणाऱ्या ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स ॲण्ड सायन्सेस’ने अर्थात ‘ऑस्कर’ने आता तिची लेखी माफी मागितली आहे. तिचा अमृतमहोत्सवी वाढदिवसही जल्लोषात साजरा करत, जाहीर माफी मागण्याचं ‘ऑस्कर’नं ठरवलं आहे. सामाजिक न्यायासाठीचा लढा सोपा नसतो. काही पिढ्यांना झुंज द्यावी लागते. पण, अखेर विजय होतो तो सत्याचाच. अलीकडच्या कमालीच्या व्यावहारिक जगात भाबडे वाटावे, असं हे आहे. पण, काळ कोणताही असो. अखेर न्यायाचा विजय होतो. 

हेच बघा. १९०१मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रुझवेल्ट यांनी आपले अधिकृत सल्लागार बुकर टी वॉशिंग्टन यांना ‘व्हाईट हाऊस’वर डिनरला बोलावले. वॉशिंग्टन हे प्रख्यात विचारवंत आणि अभ्यासक. पण, ते कृष्णवर्णीय. मग काय! ‘व्हाईट हाऊस’मध्ये ‘ब्लॅक’ माणूस गेलाच कसा, असा प्रश्न विचारत अमेरिकेतले कडवे गोरे आक्रमक झाले आणि त्यांनी ‘व्हाईट हाऊस’ धुवून काढले. त्यानंतर पुढची तीस वर्षे ‘व्हाईट हाऊस’कडे कोणी ‘ब्लॅक’ फिरकू शकला नाही. पुढे २००८मध्ये त्याच देशात बराक हुसेन ओबामा अध्यक्ष झाले आणि ब्लॅक प्रेसिडेंट ‘व्हाईट हाऊस’मध्ये गेल्याचा जगभर जल्लोष झाला. ऑस्करच्या झगमगाटी जगाने आज पुन्हा तेच आश्वासन अधोरेखित केले आहे : हे असे आहे तरी पण  हे असे असणार नाही दिवस आमुचा येत आहे  तो घरी बसणार नाही!sanjay.awate@lokmat.com

टॅग्स :HollywoodहॉलिवूडOscarऑस्कर