शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गर्जन शाळेच्या वाटेवर...! रविवार - विशेष जागर

By वसंत भोसले | Updated: December 23, 2018 00:16 IST

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापर्यंत त्या त्या काळाची आव्हाने ओळखून पावले टाकली. आता बदललेली आव्हाने आपण ओळखूया! गर्जनसारखी अवस्था प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळांच्या भोवती कमी-अधिक प्रमाणात आहे. ‘गर्जन शैक्षणिक उठाव मोहीम’ आता नवी वाट दाखविणार आहे.

ठळक मुद्देगर्जनचे मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ आणि मदतीला धावणाऱ्या सर्व संवेदनशील व्यक्तींना नवी वाट दाखविल्याबद्दल सलाम!गर्जन शाळेची वाट आपण सर्वांनी मिळून चालली पाहिजे.

- वसंत भोसले

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापर्यंत त्या त्या काळाची आव्हाने ओळखून पावले टाकली. आता बदललेली आव्हाने आपण ओळखूया! गर्जनसारखी अवस्था प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळांच्या भोवती कमी-अधिक प्रमाणात आहे. ‘गर्जन शैक्षणिक उठाव मोहीम’ आता नवी वाट दाखविणार आहे. गर्जन शाळेची वाट आपण सर्वांनी मिळून चालली पाहिजे...!कोल्हापूरच्या दक्षिणेला केवळ पंचवीस किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वतरांगेत आणि तुळसी नदीच्या किनाऱ्यावर निसर्गसंपन्नतेचा वारसा लाभलेले गर्जन (ता. करवीर) एक छोटेसे गाव आहे. लोकसंख्या जेमतेम हजार-बाराशे आहे. सभोवार डोंगराच्या रांगा. शेतजमीन मर्यादितच. बहुसंख्य गावकरी मोलमजुरी करूनच उदरनिर्वाह करतात. त्यामुळे गावची आर्थिक परिस्थिती बेताचीच. या छोट्या गावात कोल्हापूर जिल्हा परिषदेची विद्यामंदिर नावाने प्राथमिक शाळा आहे. शाळेचे मुख्याध्यापक मारुती लांबोरे आणि त्यांचे सर्व शिक्षक एकजुटीने काम करीत अनेक शैक्षणिक प्रयोग करीत राहिले; मात्र शाळेच्या दुरवस्थेमुळे त्यांना त्यांच्या कामाचे मानसिक समाधान मिळत नव्हते. खूप संवेदनशील मनाचा हा शिक्षकवर्ग धडपड करीत होता; पण हाती काही लागत नव्हते.

शाळेचे छत खराब झालेले, पावसाळ्यात सर्वत्र गळतीच, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाही, संरक्षण भिंत नाही, वर्गखोल्यांमध्ये फरशा नाहीत, पिण्याचे पाणी साठवणुकीची सोय नाही, मैदान सपाट नाही, ई-लर्निंग संच, संगणक कक्ष, डिजिटल क्लास रूम, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय, वाचन स्टँड, फर्निचर, कशाचाही पत्ता नाही. अशा शाळेत शिक्षकांच्या धडपडीची उर्मी तरी कशी टिकून राहणार होती? श्री. लांबोरे सरांनी आपल्या मनातील खदखद एकदा शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विनायक देसाई यांना बोलून दाखविली. श्री. देसाई यांनी ही बाब कोल्हापुरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांच्या कानावर घातली. धडपडणाºया शिक्षकांच्या मनातील खदखद ऐकून सुरेश शिपूरकर अस्वस्थ झाले. त्यांनी गेल्या जानेवारीत शाळेला भेट दिली. सायंकाळची वेळ होती. ओबडधोबड मैदानावर मुले खेळाचा सराव करीत होती. दुसरीकडे जादा तासाचा अभ्यास सुरू होता. त्यांनी संपूर्ण शाळेची अवस्था पाहिली.

एका बाजूला संवेदनशील मनाचे, धडपडणारे शिक्षक, दुसºया बाजूला अत्यंत दीनवान अवस्थेतील शाळा, मैदान आणि परिसर! त्यांनी एक मेसेज तयार केला आणि व्हॉटस्अ‍ॅपवर मित्रमंडळींकडे आपल्या भावना कळविण्यासाठी पाठवून दिला. ‘लोकमत’लाही पाठविला. शिवाय फोन करून सांगितले की, त्या शाळेसाठी काहीतरी केले पाहिजे. ‘लोकमत’ने हा सर्व प्रकार बातमी स्वरूपात मांडला. कोल्हापुरातील असंख्य संवेदनशील माणसांनी पुढाकार घ्यायचे ठरविले. त्यामध्ये ज्येष्ठ वास्तूरचनाकार शिरीष बेरी, डॉ. संजय डी. पाटील, अविनाश शिरगावकर, अ‍ॅड़ अभय नेवगी, डॉ. सुभाष आठल्ये, अनिल चौगुले, दीपा शिपूरकर, नितीन कराडे, संजय बुटाले, सोपान पाटील, दयाराम पटेल, खासदार धनंजय महाडिक अशी ज्ञात-अज्ञात मंडळींचा समावेश होता.

प्रत्येकाने निर्धार केला की, गर्जन शाळेच्या शिक्षकांना सक्रिय साथ द्यायची. ‘लोकमत’ने पुन्हा बातमी दिली की, ‘सामाजिक संस्थांच्या दातृत्वाने बहरेल गर्जनची शाळा!’ प्रत्येकाने शाळेची दुरवस्था दूर करण्याचा निर्धार केला. डॉ. संजय डी. पाटील यांनी त्याचदरम्यान आलेला आपला वाढदिवस या शाळेला एक लाख रुपयाचे साहित्य देऊन साजरा केला. सुरुवात उत्तम झाली. दिवसाआड लोकांच्या भेटी सुरू झाल्या.

सुरेश शिपूरकरांचा न थकता समन्वय चालू होता. शिरीष बेरी यांनी शाळेला भेट देऊन मुलींसाठी १ लाख ७० हजार रुपये खर्चून एक मॉडेल स्वच्छतागृह बांधून काढले. कराडे सिरॅमिक्सचे नितीन कराडे यांनी ९० हजार रुपये खर्चून मुलांसाठी स्वच्छतागृह उभे करून दिले. संजय बुटाले आणि सोपान पाटील यांनी शाळेचे एका बाजूचे कंपौंड पूर्ण केले. गर्जनची ग्रामपंचायतही पुढे आली. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच, तरीही एका खोलीचे छत पूर्ण बदलून दिले आणि टीव्ही संच दिला. त्यासाठी ऐंशी हजार रुपये खर्च केले. शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी मैदान सपाटीकरण आणि व्यासपीठ बांधण्याचे काम हाती घेतले. त्यासाठी पन्नास हजार रुपये खर्च केले. कोल्हापूरचे चार्टर्ड अकौंटंट दयाराम पटेल यांनी साठ हजाराचे पत्रे आणि पाईप्स दिल्या.

कणेरी मठाने संगणक संच आणि एक नियमित शिक्षकच नेमून दिला. खासदार धनंजय महाडिक यांनी संगणक आणि प्रिंटर दिला. याशिवाय वैयक्तिकरीत्या पाच-दहा हजार रुपयांची मदत करणारे अनेकजण पुढे आले. त्यातून जवळपास पावणेदोन लाख रुपये उभे राहिले. लोकसहभागातून हा एक शैक्षणिक उठाव झाला. सुमारे दहा लाख रुपयांचे काम झाले, त्यापैकी काही कामे अजून चालू आहेत.विशेष म्हणजे लोकसहभागाचे कौतुक करीत कोल्हापूर जिल्हा परिषदेने दोन खोल्यांची दुरुस्ती करण्यासाठी दोन लाख वीस हजार रुपये निधी मंजूर केला.एका छोट्या गावच्या शाळेसाठी हा एक शैक्षणिक उठावच होता.

कोल्हापूरपासून केवळ पंचवीस किलोमीटरवर असलेल्या या गावच्या शाळेतील शिक्षकांच्या कामाला मिळालेली दाद होती. पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण देणारी ही शाळा एक नवी पद्धती, नवी वाट निर्माण करू पाहते आहे. अभ्यासात उत्तम, मैदानावरील खेळात उत्तम आणि मुला-मुलींची सर्वंकष तयारी करून घेणारा उत्तम शिक्षकवर्ग यामुळेच हे सर्व घडले. गेल्या चार वर्षांपासून त्यांची धडपड चालू होती. परिणामी पटसंख्या ७१ वरून ११० पर्यंत वाढली. उन्हाळी सुट्टीत सर्व मुला-मुलींना सायकल चालविणे, नदीत पोहण्याचे प्रशिक्षणदेखील हा शिक्षकवर्ग देतो आहे. लोकांच्या सहभागाने एका नव्या शाळेचा उदय होतो आहे. तिचे रुपडे पूर्ण पालटून जाते आहे. जिल्हा परिषदांच्या शाळा खेड्या-पाड्यांतील अर्धपोटी मुला-मुलींना शिक्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठीच अनेक वर्षे प्रयत्न करून शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी काम करण्यात आले; मात्र त्यात खंड पडू लागला आहे.

शासन आणि जिल्हा परिषदांकडून अशा तळागाळातील माणसाला घडविणाºया शाळा बंद पडताहेत असे वाटू लागले आहे. इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांचे जाळे एखाद्या उद्योगासारखे वाढत आहे. पालकही जागरूक झाले आहेत. आपल्या मुलांना आधुनिक ज्ञानासाठी परिपूर्ण शाळा हवी आहे, असे मानू लागले आहेत. त्यासाठी खासगी शाळांवर पैसा खर्च करायला तयार झाले आहेत; मात्र आपल्या गावची शाळा सक्षम करण्याकडे कोणाचा कल नाही. शासनाचा व्यवहार तर या शाळांना वाºयावर सोडून देण्यासारखाच आहे.

शिक्षण क्षेत्रात एक प्रचंड विरोधाभास तयार झाला आहे. एकीकडे महागडे खासगी शिक्षण आणि दुसरीकडे अशा शाळांमध्ये जाण्याची कुवत नसलेले खासगी (शाळाबाह्य मुले) आणि त्यांचे पालक, अशी ही विभागणी झाली आहे. खासगी शाळेत नवे नवे अभ्यासक्रम, विविध उपक्रम आणि प्रयोगांमुळे ही मुले अधिक प्रभावीपणे पुढे येताना दिसतात. त्या पातळीवर जिल्हा परिषदांच्या शाळा आणून ठेवण्यासाठीचे पाठबळ शासन द्यायला तयार नाही. गावोगावची आर्थिक स्थिती नाही. पालकांची तर अजिबात नाही. अशा विरोधाभासात गर्जनसारख्या शाळेच्या संवेदन शिक्षकांची कोंडी झाली आहे. ज्यांचे मन संवेदनशील नाही, त्यांनी आपली ही शेवटची नोकरी आणि शेवटीची पिढी या शाळेत शिकणारी! असे समजून हार मानली आहे.

काहींना राजकारणाने ग्रस्त केले आहे. काहींना आधुनिक जगातील तथाकथित चमकणाºया ताºयांनी ग्रस्त केले आहे. ते शहराकडे धावत आहेत. राज्यकर्ते, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांनी हा आपला विषयच नाही, असे ठरवून टाकले आहे; मात्र यातून समाजाचे विघटन होत आहे. समाजाची फाळणी एखादा देशासारखी होते आहे. त्याचे खूप गंभीर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिणाम होणार आहेत, याचेच भान राहिलेले नाही.

कोणत्याही नावाजलेल्या प्राथमिक खासगी शाळेशी स्पर्धा करण्याची कुवत आता गर्जनच्या विद्यामंदिर शाळेत येणार आहे. कारण त्यांना जे पाठबळ हवे होते, ते मिळू लागले आहे. जमलं तरी आपल्या गावात नाही तर जवळच्या शहरात किंवा तालुक्याच्या ठिकाणी खासगी शाळेत मुलांना पाठविण्यापेक्षा गावोगावच्या शाळा लोकसहभागातून सक्षम होऊ शकतात. तंत्रज्ञानाची साथ आहे. आधुनिक ज्ञान या शाळांपर्यंत पोहेचविता येणे सहज शक्य आहे. अट एकच आहे की, गर्जनच्या शाळेतील शिक्षकांसारखी मानसिकता हवी आहे. सुरेश शिपूरकर आणि त्यांनी जमविलेला गोतावळा हा केवळ दयाभूत नजरेतून या शाळेला मदत करीत नाही, तर ही सर्व मंडळी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत उत्तम शिक्षण मिळाले पाहिजे, अशी मनोमन कामना करणारा आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा सर्वांना किमान लिहिते-वाचते करून साक्षर केले एकदाचे, एवढ्या मर्यादेत शिक्षणाकडे पाहिले जात होते. आता ही मर्यादा ओलांडायची वेळ कधीच निघून गेली आहे. केवळ लिहिता-वाचता येऊन चालणार नाही, तर कौशल्य निर्माण करून देणारे, ज्ञानी बनविणारे, विचार प्रवृत्त करणारे शिक्षण हवे आहे. संपूर्ण समाजाचे आधुनिकतंत्रज्ञानामुळे जागतिकीकरण झाले आहे. त्यात शिक्षणाचा खूप महत्त्वाचा वाटा आहे.माणूस आता मुंबईतील गिरण्यामध्ये पोट भरण्यासाठी स्थलांतरित होत नाही. तो उत्तम जीवनमानासाठी जगभर स्थलांतरित होण्याचे स्वप्न पाहतो आहे. अशा परिस्थितीत गर्जनच्या पालकांच्या पाल्यांनी कोणते स्वप्न पहावे, पडक्या शाळेने निराश झालेल्या शिक्षकांच्या पुढे बसून ते स्वप्न सत्यात येण्याचे बळ त्यांना मिळणार आहे का? कपाट नाही, फरशी नाही, स्वच्छतागृह नाही, धड मैदान नाही, छप्पर गळते आहे, भिंती ओल्या होताहेत, संगणकाचा पत्ता नाही, प्रिंटर माहीत नाही, अशा अवस्थेतील शाळा ‘आंतरराष्ट्रीय स्कूल’शी स्पर्धा कशी करेल. स्पर्धा सोडून देऊ; पण जगण्याच्या संधी पकडण्याचे बळतरी कसे मिळेल? यासाठी गर्जन शाळेची वाट आपण सर्वांनी मिळून चालली पाहिजे.

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापर्यंत त्या त्या काळाची आव्हाने ओळखून पावले टाकली. आता बदलेली आव्हाने आपण ओळखूया! गर्जनसारखी अवस्था प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळाच्या भोवती कमी- अधिक प्रमाणात आहे. ‘गर्जन शैक्षणिक उठाव मोहीम’ आता नवी वाट दाखविणार आहे. येत्या काही दिवसांत ही शाळा नव्या रूपात पूर्णपणे उभी राहिलं तेव्हा नवे स्वप्न पाहण्याची ऊर्मीसुद्धा निर्माण करेल. गर्जनचे मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ आणि मदतीला धावणाऱ्या सर्व संवेदनशील व्यक्तींना नवी वाट दाखविल्याबद्दल सलाम!

 

टॅग्स :SchoolशाळाSocialसामाजिक