मुंबई कशी ज्वालामुखीच्या तोंडावर उभी आहे, याचे उत्तम उदाहरण बुधवारी बीपीसीएलमधील रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटाच्या रूपाने पाहायला मिळाले. आधीच अतिरेक्यांच्या निशाण्यावर असलेल्या मुंबईकरांच्या काळजात या भयानक स्फोटाने धस्स झाले. तब्बल सहा तासांनंतरही ही आग धुमसत होती. चेंबूर भागातील बीपीसीएल, एचपीसीएल अथवा जवळील टाटा पॉवर तसेच माहुल परिसरातील औद्योगिक कंपन्यांमुळे सर्वाधिक प्रदूषण या पट्ट्यात असते. नागरी लोकवस्तीही या ठिकाणी आहे. त्यामुळे येथील रहिवासी कायम मृत्यूच्या छायेखाली वावरत असतात. बुधवारच्या आगीने याचा प्रत्यय आणून दिला. यापूर्वीदेखील लोअर परळ येथील कमला मिल, अंधेरीतल्या साकीनाका येथील फरसाण मार्टला लागलेल्या आगीत मोठी मनुष्यहानी झाली होती. अशा मोठ्या आगीच्या घटनांवर त्वरित नियंत्रण मिळविण्यात आपल्याकडच्या यंत्रणा कमी पडल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या यापूर्वीच्या विकास आराखड्यातही चेंबूरसह लगतचा परिसर हा ‘हेव्ही इंडस्ट्रीयल झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. या ठिकाणी दाट वस्ती असता कामा नये, याची जाणीव तज्ज्ञांनी प्रशासनाला वारंवार करून दिली आहे. असे असतानाही मुंबई महापालिकेने लगतच्या माहुल परिसरात प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले आहे. केवळ माहुलच नाही, तर चेंबूर, मानखुर्द, गोवंडीसह लगतच्या परिसरातील रहिवाशांना आधीच मूलभूत सेवासुविधांअभावी जगावे लागत आहे. माहुल येथील प्रकल्पग्रस्तांनी आंदोलने करीत प्रशासनाला याची जाणीवही करून दिली आहे. मात्र त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी काहीच हालचाली झालेल्या नाहीत. पूर्व उपनगरातील डम्पिंगलाही सातत्याने आगी लागत असून, आगीमुळे येथील परिसरात चार ते पाच पाच दिवस धुराचे साम्राज्य राहते. मानखुर्द आणि गोवंडीमध्ये दाटीवाटीने वसलेल्या लोकवस्तीमध्ये यापूर्वी कित्येकवेळा आगी लागल्या आहेत. परिणामी, मुंबईसारखी मायानगरी सातत्याने ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. बीपीसीएलसारख्या कंपन्यांत आपत्कालीन घटनांवर मात करण्यासाठी यंत्रणा कायम सज्ज असल्या तरीदेखील येथील दुर्घटनांचा संबंध हा इतिहासात झालेल्या चुकांशी आहे. चुकीच्या पद्धतीने वसवलेली वस्ती, त्यामुळे येथील मूलभूत सेवासुविधांवर लोकसंख्येचा येणारा ताण, डम्पिंगची अपुरी क्षमता यांसारख्या अनेक समस्यांनी आधीच डोके वर काढले आहे. त्यात पुन्हा अशा आगीच्या घटना घडतात. हे दुहेरी संकट येत्या काळात अधिकच गडद होत जाईल. याचा विचार आगामी विकास आराखड्यात झाला तरच मुंबईकरांना सुरक्षित आयुष्य जगता येईल.
ज्वालामुखीच्या तोंडावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 05:06 IST