शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

‘गोखले पर्व’ पडद्याआड! अभिनयाची खरी चमक दिसली, ती ‘बॅरिस्टर’मधून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 10:16 IST

रंगभूमी, चित्रपट, मालिका अशा तिन्ही क्षेत्रांत त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अनेक वैविध्यपूर्ण भूमिका त्यांनी अफाट क्षमतेने रंगवल्या.

विक्रम गोखले यांची पणजी दुर्गाबाई कामत. भारतीय चित्रपट क्षेत्रातील त्या पहिल्या स्त्री अभिनेत्री. आजी कमला गोखले म्हणजे कमलाबाई कामत या पहिल्या बालकलाकार, तर वडील चंद्रकांत गोखले हे ज्येष्ठ अभिनेते. भारतीय चित्रपटाचा शतकभराचा इतिहास या नावांशिवाय आणि गोखले कुटुंबाशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही. हा विलक्षण वारसा घेऊन विक्रम गोखले आधी रंगभूमीवर आणि मग रूपेरी पडद्यावर आले. असा वारसा असणे अभिमानास्पद असले तरी ते ओझेही असते. असा वारसा पेलणे सोपे नसते. मात्र, कोणत्याही दडपणाशिवाय अभिनय करणाऱ्या विक्रम गोखले यांचे वैशिष्ट्यच हे की, त्यांचा पडद्यावरचा आणि रंगभूमीवरचाही वावर सहजसुंदर होता. त्यात डौल होता. आत्मविश्वास होता. वडील प्रतिभावंत अभिनेते असले तर मुलावर कायम तुलना होण्याचं दडपण असतं. पण वडिलांच्या छायेत कायम राहूनही त्यांनी त्यांच्या अभिनयाची वेगळी ताकद दाखवून दिली. त्यांच्या अभिनयाची खरी चमक दिसली, ती ‘बॅरिस्टर’मधून. ‘बॅरिस्टर’ हे जयवंत दळवी यांचे नाटक. समीक्षकांनी दाद दिलेले आणि कलावंतांसाठी आव्हानात्मक असणारे विलक्षण नाट्य या नाटकात आहे. ‘वडिलांबरोबर १९७७-७८च्या काळात ‘बॅरिस्टर’ नाटक केल्यानंतर बाबांनी आत येऊन कडकडून मिठी मारल्याचे आजही आठवते. तेव्हा तू चांगला नट आहेस. पण, इतक्या ताकदीचा नट आहेस हे माहिती नव्हतं’, असे बाबा म्हटल्याचे विक्रम गोखले अभिमानाने सांगायचे.

रंगभूमी, चित्रपट, मालिका अशा तिन्ही क्षेत्रांत त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अनेक वैविध्यपूर्ण भूमिका त्यांनी अफाट क्षमतेने रंगवल्या. ‘कळत नकळत’सारख्या चित्रपटाने मराठी प्रेक्षकांवर गारूड केले. मात्र, जितक्या ताकदीच्या भूमिका मराठी चित्रपटांमधून त्यांच्या वाट्याला यायला पाहिजे होत्या, त्या तितक्या फारशा आल्या नाहीत आणि पैशांसाठी तडजोड करणे, हे त्यांच्या स्वभावात नव्हते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात मराठी निर्मात्यांची काहीशी नाराजी ओढवून घेतल्याने त्यांना काम मिळणे काहीसे कमी झाले होते. मग त्यांनी आपला मोर्चा हिंदी आणि गुजराती चित्रपटसृष्टीकडे वळविला. तिथेही त्यांनी आपला अमिट ठसा उमटवला. ‘अग्निपथ’, ‘खुदागवाह’, ‘हम दिल दे चुके सनम’सारख्या विविध चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. मराठीपेक्षा त्यांच्या हिंदी चित्रपटांचीच यादी मोठी असल्याचे दिसते. अमिताभसारख्या महानायकासमोर उभे ठाकल्यानंतरही विक्रम गोखले कधी दुबळे वाटले नाहीत. पण, तरीही त्यांचे रंगभूमीबद्दलचे प्रेम कमी झाले नाही. सत्तरीकडे वाटचाल करत असतानादेखील ‘दिल अभी भरा नहीं’ हे नाटक त्यांनी रिमा लागू यांच्यासमवेत उभं केलं. नाटकाला रसिकांचा उदंड प्रतिसादही मिळत होता. पण अचानक घशाच्या त्रासामुळे नाटकातून अभिनयसंन्यास घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. कुठे थांबले पाहिजे, हे उमजणे आणि तशी कृती करणे याला एक कलाकार म्हणून प्रगल्भ धाडसच असावे लागते. त्यानंतर त्यांनी रंगभूमीवर पुन्हा कधी पाऊल ठेवले नाही. पण, तरीही विक्रम गोखले यांचा आत्मविश्वास ओसरला नाही. जोडीला परखडपणा, स्पष्टवक्तेपणा होताच. त्यांच्या या स्वभावामुळे त्यांनी अनेकदा वादही ओढवून घेतले.

‘दूरचित्रवाणीवरून दाखविल्या जाणाऱ्या मालिका जर पाहण्याजोग्या नसतील, त्यांना दर्जा नसेल तर त्यांना नावं का ठेवता? तुमच्या हातात रिमोट असतो ना? बंद करून टाका ना ते. तुम्ही अशा मालिका बघत राहता. त्यामुळे प्रेक्षकांना असंच हवं असतं, असं म्हणत निर्माते अशा मालिका बनवत राहतात. म्हणून तसा माल बनविणारे मूर्ख की रिमोट असूनही त्याचा वापर न करणारे प्रेक्षक मूर्ख?,’ असा सवाल करणारे विधान करून त्यांनी वादाला तोंड फोडले होते. त्या विधानावरून निर्माते संतापले. अशी वादग्रस्त आणि क्वचित नाहक विधाने करून नंतरच्या काळात ते प्रसिद्धीच्या झोतात राहिले. त्यांच्यावर आरोपही होत राहिले. पंख मिटलेल्या कलावंतांसाठी वृद्धाश्रम बांधण्याकरिता त्यांनी चित्रपट महामंडळाला नुकतीच दोन एकर जमीन दान करीत आपल्या दातृत्वाचे दर्शन घडविले होते. विक्रम गोखले यांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वात करिष्मा होता. पडद्यावर ते एक विलक्षण रसायन होतं. त्यांच्या निधनानं भारतीय पडद्यावरचे ‘गोखले पर्व’ काळाच्या पडद्याआड गेले आहे. अर्थात, जोवर चित्रपट नावाची गोष्ट आहे, तोवर हे पर्व अमर आहे. ‘लोकमत समूहा’च्या वतीने विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

टॅग्स :Vikram Gokhaleविक्रम गोखलेbollywoodबॉलिवूडMarathi Actorमराठी अभिनेता