विदर्भवाद्यांची निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:58 AM2018-02-03T00:58:57+5:302018-02-03T01:00:22+5:30

राज्यकर्त्यांनी सदैव विदर्भावर अन्यायच केला. विदर्भाच्या संपत्तीचा विदर्भात नव्हे तर विदभार्बाहेरच जास्त उपयोग होतो. सर्व साधने उपलब्ध असूनही मोठे सिंचन प्रकल्प विदर्भात नाहीत. परिणामी विदर्भातील शेतक-यांना सर्वस्वी निसर्गावर अवलंबून राहावे लागते.

 Vidarbha's disappointments | विदर्भवाद्यांची निराशा

विदर्भवाद्यांची निराशा

googlenewsNext

राज्यकर्त्यांनी सदैव विदर्भावर अन्यायच केला. विदर्भाच्या संपत्तीचा विदर्भात नव्हे तर विदभार्बाहेरच जास्त उपयोग होतो. सर्व साधने उपलब्ध असूनही मोठे सिंचन प्रकल्प विदर्भात नाहीत. परिणामी विदर्भातील शेतक-यांना सर्वस्वी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सरळ शेतकºयांना बसत असल्यामुळे व त्यांना हवी ती मदत मिळत नसल्यामुळे अखेर ते आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. आज सर्वात जास्त आत्महत्या विदर्भात आहेत. महाराष्ट्राच्या निर्मितीपासून विदर्भाच्या वाट्याला उपेक्षितांचे जिणे आले आहे, अशी सबळ कारणे देऊन विदर्भवाद्यांनी स्वतंत्र विदर्भाचा लढा अखंड सुरू ठेवला आहे. परंतु काँग्रेस असो वा भाजपा हे दोन्ही पक्ष स्वतंत्र विदर्भाचा केवळ निवडणुकीपुरता उपयोग करून नंतर यापासून फारकत घेत असल्याने व सातत्याने प्रयत्न करूनही स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाला स्थानिकांचा जनाधार लाभत नसल्याने स्वतंत्र विदर्भाचे समर्थक थोडे निराश झाले आहेत. परवा नागपुरात पार पडलेल्या एका कार्यक्रमात उपस्थितांनी ही निराशा थेट मंचावरून अनुभवली. विशेष म्हणजे, ज्यांच्या बोलण्यातून ही निराशा व्यक्त झाली ती काही साधी नावे नव्हती. यातले एक नाव अ‍ॅड. श्रीहरी अणे तर दुसरे नाव अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे होते. संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जर स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव आला नाही तर पुढे तो येणे शक्य नाही, असे विधान अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले. ज्या भाजपाने एकेकाळी स्वतंत्र विदर्भासाठी रान उठवले होते ती भाजपा आता मात्र कशी मूग गिळून बसलीय याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यातला टीकेचा भाग सोडला तर पुढे काय याचे उत्तर अणे आपल्या भाषणातून देऊ शकले नाहीत. स्वतंत्र विदर्भासाठी लढणाºया संघटनांनी आता राजकीय व्हावे व त्यांचे नेतृत्व कल्पनेतल्या संयुक्त रिपब्लिकन पक्षाने करावे, इतका एक सोयीचा संदेश देऊन त्यांनी आपले भाषण आटोपले. स्वतंत्र विदर्भाचे समर्थन करणारे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर तर अणेंपेक्षाही जास्त निराश दिसले. वेगळा विदर्भ कसा फायद्याचा आहे, या विषयावर मी लेख लिहिणेच बंद करून टाकले आहे. कारण, वेगळा विदर्भ येथील जनतेलाच हवा की नको याबाबत मी साशंक आहे, अशा शब्दात त्यांनी आपली निराशा जाहीर केली आणि पुढचे सर्व भाषण मुंबईच्या इन्फास्ट्रक्चरला समर्पित करून टाकले. विदर्भवाद्यांची ही निराशा फारच बोलकी आहे. त्यामुळे या नेत्यांकडे नेतृत्वाच्यादृष्टीने आशाळभूत नजरेने पाहणाºया वैदर्भीयांना विदर्भ वेगळा हवा या जुन्या मागणीसाठी नव्याने चैतन्य निर्माण करण्याकरिता पुन्हा नवा पर्याय शोधावा लागेल, असेच चित्र दिसत आहे.

Web Title:  Vidarbha's disappointments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :newsबातम्या