आपल्या पक्षाच्या तालुकाध्यक्षांकडील लग्नात राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची हजेरी किंवा वधू-वरांना आशीर्वादावेळी त्यांच्या हातून नवरदेवाच्या हातात महागड्या ‘फॉर्च्युनर’ गाडीची चावी सोपविणे, यात धक्कादायक वगैरे काही नाही. परंतु, लोभी व संपत्तीलोलूप सासरच्या अनन्वित छळाला, अमानुष मारहाणीला कंटाळून ती मुलगी तीन वर्षांनंतर अवघ्या दहा महिन्यांचे बाळ मागे सोडून आत्महत्या करीत असेल आणि सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी असल्याने बेबंद होऊन सासरचे कुटुंब पोलिसांना वाकुल्या दाखवित असेल तर मात्र प्रकरण गंभीर बनते.
पुण्याजवळ मुळशी तालुक्यातील भुकूम येथील वैष्णवी हगवणे या तरुणीच्या आत्महत्येचे प्रकरण असेच अत्यंत गंभीर आहे. शेतजमिनींचे व्यवहार व त्यातून हिंसाचाराचे दर्शन घडविणारा ‘मुळशी पॅटर्न’ हा सिनेमा याच परिसरावर बेतलेला आहे. हजारो, लाखो तरुणींच्या संसाराची राखरांगोळी करणारी हुंडापद्धती आणि जोडीला नवश्रीमंतांची हाव अशा दुहेरी कारणांनी गेल्या शुक्रवारी वैष्ष्णवीने आत्महत्या केली आणि अख्खा महाराष्ट्र हादरला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे वैष्णवीचे सासरे, तर त्यांच्याच वाटेने निघालेला दिवटा शशांक हा वैष्णवीचा नवरा. शशांक व वैष्णवी यांचा खरेतर प्रेमविवाह होणार होता.
वैष्णवीचे मातापिता स्वाती व अनिल कस्पटे यांचा त्याला विरोध होता. पण, मुलगी अडून बसल्याने त्यांनी माघार घेतली आणि एकावन्न तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी वगैरे असे लाखो रुपये खर्चून थाटामाटात लग्न लावून दिले. मुळात दोघांचे प्रेमच होते तर हुंडा वगैरेचा प्रश्नच उद्भवायला नको होता. परंतु, हगवणे कुटुंबाने मुलाच्या लग्नात कमाईची संधी सोडली नाही. उलट, लग्नानंतर या ना त्या निमित्ताने वैष्णवीच्या आईवडिलांकडे पैशाची मागणी होऊ लागली. ‘आम्ही तुमच्या मुलीला फुकट नांदवायचं का’, अशी भाषा वापरली गेली. वैष्णवीचा छळ सुरू झाला. सासू लता व नणंद करिष्मा यांनी छळाचा कहर केला. पती शशांक चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करू लागला. शवविच्छेदनावेळी आढळलेल्या वैष्णवीच्या सर्वांगावरील बेदम मारहाणीच्या खुणा अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. तिने मैत्रिणींकडे केलेले छळाचे वर्णन डोळ्यांत पाणी आणणारे आहे. त्यामुळेच ही आत्महत्या नसून मुलीची हत्या आहे, असा वैष्णवीच्या माहेरच्या लोकांचा आरोप आहे.
या प्रकरणात पोलिसांवर कोणताही दबाव नाही, वैष्णवीला न्याय मिळेल, असे सांगितले जात असले तरी अशा बड्या धेंडांचे गुन्हे कसे हाताळले जातात, हे जनतेला चांगले कळते. राज्य महिला आयोगाच्या असंवेदनशील अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना वैष्णवी प्रकरणाचे गांभीर्य लवकर लक्षात न येण्याचे कारणही राजकारण हेच आहे. समाजाला नीतिमत्ता शिकविणाऱ्या राजकारण्याच्या घरात मात्र लग्न करून घरात आलेल्या लक्ष्मींना दिली जाणारी वागणूक पाहून संताप अनावर व्हावा. हगवणे यांच्या थोरल्या सुनेलाही मारहाण होत होती. परंतु, तिचा पती तिच्यासोबत होता. लग्नापूर्वी प्रेम असूनही वैष्णवीच्या वाट्याला पतीची साथ नव्हती. हे सारे पाहून हगवणे कुटुंबात माणसे राहतात की जनावरे असा प्रश्न पडावा. हे खरे तर पुण्यासारख्या मोठ्या शहरांच्या अवतीभोवती फोफावलेल्या फॉर्च्युनर संस्कृतीचे भाेग आहेत. या संस्कृतीची सुरुवात गुंठामंत्र्यांनी केली. ती पहिली पिढी वडिलोपार्जित जमिनींचा गुंठा-गुंठा विकून हातात, गळ्यात सोन्याचे गोफ घालून कृत्रिम तोऱ्यात वावरणारी होती. त्यापैकी काहीजण प्रस्थापित राजकारणात घुसण्यात यशस्वी झाले.
आधीचे राजकारणही तत्त्वनिष्ठ होते. या गुंठामंत्र्यांची पुढची पिढी मात्र जबर राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणारी आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाणारी आहे. हातात गैरमार्गाने पैसा आला की बऱ्यावाईटाचे भान गमावले जाते. सज्जनपणा व साैजन्य फाट्यावर मारणारा माज येतो. अशी मस्ती अंगात मुरलेले गब्बर युवानेते ही राजकारणाचीही गरज बनली आहे. त्यामुळेच खोटा बडेजाव व सासरच्या पैशावर रंगणाऱ्या शाही विवाहांना हजेरी लावणे नेत्यांसाठी अपरिहार्य बनते. केवळ पैसा हेच सर्वस्व मानणाऱ्या अशा टग्यांच्या टोळ्या बनल्या आहेत आणि टोळ्यांचे सदस्य घरातल्या सुनांचे, बायकांचे जीव घ्यायला लागले आहेत. तेव्हा, वैष्णवीच्या मारेकऱ्यांना अटक किंवा शिक्षा हा उपाय नाही. त्यापलीकडे आपल्या राजकारणाने विचार करण्याची गरज आहे.