US Election 2020:  अमेरिकेच्या मताचा कौल जगाच्या बाजूने?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 06:13 AM2020-11-03T06:13:17+5:302020-11-03T06:13:49+5:30

US Election 2020: तंत्रज्ञानातील प्रगती, रोजगाराच्या संधी, तुलनेने  स्थिर कायदा व सुव्यवस्था, राजकीय स्थिरता, बाहेरील समाजघटकांना आपल्यात सामावून घेण्याचा मोकळेपणा ही अमेरिकन समाजव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये आहेत.

US Election 2020: US vote for the world? | US Election 2020:  अमेरिकेच्या मताचा कौल जगाच्या बाजूने?

US Election 2020:  अमेरिकेच्या मताचा कौल जगाच्या बाजूने?

googlenewsNext

- रोहन चौधरी
(आंतरराष्ट्रीय राजकारणाचे  अभ्यासक)

सुमारे दोनशे वर्षांच्या  लोकशाहीचा  वारसा असणारी अमेरिका आज जनमताचा कौल आजमावणार आहे. अमेरिकेचे वैश्विक स्थान, जगाला आकार देण्याची क्षमता यामुळे अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक इतर देशांच्या निवडणुकीपेक्षा महत्त्वाची असते. अमेरिकन निवडणुकांचे जागतिक राजकारणावर काय परिणाम होतात याची चिकित्सा बहुतांशवेळी  राष्ट्राध्यक्ष म्हणून कोण निवडून येईल यावर आधारित असते. ते करणे आवश्यकही असते; परंतु  त्याचा लोकशाही, उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष विचारांवर काय परिणाम होईल याची चिकित्सा करणेही तितकेच  जास्त महत्त्वाचे आहे.  तंत्रज्ञानातील प्रगती, रोजगाराच्या संधी, तुलनेने  स्थिर कायदा व सुव्यवस्था, राजकीय स्थिरता, बाहेरील समाजघटकांना आपल्यात सामावून घेण्याचा मोकळेपणा ही अमेरिकन समाजव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये आहेत.

या मूलभूत वैशिष्ट्यांना साथ मिळते ती  तंत्रज्ञान, विज्ञान आणि सामाजिक शास्रावर केलेल्या संशोधनात्मक गुंतवणुकीची. याच्या जोरावर  अमेरिका शब्दशः  तिच्या स्वतःच्या नजरेतून जगाला पहावयास भाग पाडते. जागतिक राजकारण  हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण  आहे. जागतिक राजकारणाची बहुसंख्य गणिते ही  अमेरिकेने प्रस्थापित केलेल्या  प्रमेयावर आधारित असतात. अमेरिका राष्ट्र म्हणून  जगावर जे अधिपत्य गाजवते ते या मूलभूत वैशिष्ट्यांमुळेच.  

एक राष्ट्र म्हणून अमेरिकेचे परराष्ट्र  धोरण आक्रमक, युद्धखोर आणि वर्चस्ववादी राहिले असले तरी आधुनिक मानवी जीवनात अमेरिकन  समाजाचे योगदान नाकारता येणार नाही. याचे श्रेय हे निश्चितच अमेरिकन समाजाच्या उदारमतवादाला जाते. उदाहरणार्थ तत्कालीन राष्ट्राध्यक्ष  रोनाल्ड रेगन यांनी ‘रोग स्टेट’ नावाची संकल्पना मांडली होती. जागतिक शांततेला धोका असणारी राष्ट्रे असा त्याचा अर्थ होता. ज्यामध्ये उत्तर कोरिया, क्युबा, इराण, इराक, लिबिया यासारख्या राष्ट्रांचा समावेश रेगन यांनी केला होता. परंतु, प्रख्यात विचारवंत नॉम चोम्स्की यांनी जागतिक राजकारणात  अमेरिका आणि इस्रायल हे दोनच ‘रोग स्टेट’ असून, तेच खरे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला धोका असल्याचा प्रतिवाद केला होता.  

महत्त्वाची गोष्ट म्हणजे  ना रेगन यांनी ‘तुकडे तुकडे टोळी’ म्हणून त्यांची निर्भत्सना केली, ना अमेरिकन समाजाने त्यांची  शहरी नक्षलवादी, देशद्रोही म्हणून हेटाळणी केली. इतक्या टोकाच्या टीकेनंतरही चोम्स्की हे ‘मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या  प्रतिष्ठित संस्थेत कार्यरत होते. हा उदारमतवाद अमेरिकन समाजाला सामर्थ्यशाली बनवतो. अमेरिकन समाजाच्या उदारमतवादाचे दुसरे उदाहरण म्हणजे  जगभरातील  प्रतिभावंतांना आपल्या सामाजिक जीवनात मोकळेपणाने समरस करणे आणि नेतृत्वाची संधी देणे. उदाहरणार्थ, सत्या नाडेला, सुंदर पिचाई, नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी किंवा सध्याच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस  अशा असंख्य भारतीय वंशांच्या  नागरिकांना अमेरिकन समाजाने आपलेसे केले आहे. 

भारतीय वंशाच्या  कर्तबगार लोकांचे गोडवे गात असताना विदेशी नागरिकत्वावरून किंवा  प्रादेशिक आणि जातीय अस्मितेवरून राजकारण करणाऱ्या  भारतीयांच्या तुलनेत अमेरिकन समाजाची ही वैशिष्ट्ये उल्लेखनीय आहेत.  भारतीय लोकशाही  ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असूनही जातीय अस्मिता आणि  संकुचित प्रादेशिकता यामुळे ती  जागतिक राजकारणात आदर्शवत ठरत नाही. त्या तुलनेत अमेरिकेतही कृष्णवर्णीयांचा तिरस्कार आणि पुरुषसत्ताक पद्धत अस्तित्वात असली तरी अमेरिकन लोकशाही जगात आदर्श ठरण्यात त्याचा अडथळा ठरत नाही. अमेरिकन राजकारणातील ट्रम्प यांच्या प्रवेशाने अमेरिकन समाजाच्या आदर्शवत लोकशाहीला तडे जाण्यास सुरुवात झाली.  

वास्तविक पाहता कोरोनाने अमेरिकेला  पुन्हा एकदा जागतिक राजकारणात नेतृत्व करण्याची संधी प्राप्त करून दिली होती. कोरोना विषाणूने जगभरात चीनविरोधी जनमानस तयार केले होते.  फक्त गरज होती ती जागतिक सहकार्याची. अशाप्रकारचे सहकार्य अमेरिकेशिवाय शक्य नाही हे वास्तव आहे; परंतु आत्मनिर्भरतेच्या मोहापायी निर्माण केलेल्या संकुचित राष्ट्रवादाने ट्रम्प यांना या वास्तवाची जाणीव  झाली नाही.  परिणामी  चीनचा आक्रमकवाद आणि अमेरिकेची उदासीनता यामुळे जागतिक नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. ट्रम्प यांच्या  धोरणातून निर्माण झालेले संकुचित राष्ट्रवादाचे वारे  अल्पावधीतच जगभर पसरण्यास सुरुवात झाली.  

विकसनशील राष्ट्रे  जागतिकीकरणाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असताना,  कोरोनाच्या प्रादुर्भावाने  जगाच्या मूळ ढाच्यावरच आघात केला आहे; परंतु  त्यापेक्षाही अमेरिकेच्या धोरणामुळे निर्माण झालेला राष्ट्रवादाचा प्रादुर्भाव हा जास्त  चिंताजनक आहे.  जर ट्रम्प परत निवडून आले तर  याला अधिमान्यता मिळेल आणि  बायडन निवडून आले तर राष्ट्रवादाचा  प्रादुर्भाव आटोक्यात येण्याची आशा तरी निर्माण होईल.  राष्ट्रवादाच्या अंधारात चाचपडत असलेल्या जागतिक व्यवस्थेत धर्मनिरपेक्ष आणि उदारमतवादाची पहाट उजाडण्यासाठी अमेरिकन मतदारांचा कौल  निर्णायक  ठरेल.

Web Title: US Election 2020: US vote for the world?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.