- नंदकिशोर पाटील शरद पवारांचाराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज (10 जून) द्विदशकपूर्ती साजरी करत आहे. या 20व्या वर्धापन दिनानिमित्त आमच्या शुभेच्छा! साधारणपणे माणसाच्या आयुष्यात वयाच्या दहा ते वीस वर्षांपर्यंत कालखंड हा संक्रमणाचा काळ मानला जातो. कारण याच वयात मुलाची शारीरिक, मानसिक वाढ होऊन शहाणपण आलेलं असतं. आयुष्यात आपणांस कुठं जायचंय, काय मिळवाचंय, याचा निर्णय देखील याच टप्प्यावर घ्यावा लागतो. या वयाला ' पौगंडावस्था' असंही म्हणतात.राष्ट्रवादीची सध्याची अवस्था आणि आजवरच्या वाटचालीवर नजर टाकली तर दिसते ते एवढेच की, स्थापनादिनी (10 जून 1999) या पक्षाच्या घड्याळात दहा वाजून दहा मिनिटं झाली होती. आणि आजही तेवढीच आहेत ! सांगायचं तात्पर्य काय, तर हा पक्ष 20 वर्षांनंतरही आहे तिथेच आहे. धड ना वृद्धी, ना घट. या अवस्थेला मुडदूस अवस्था म्हणतात. हे असं का झालं? शरद पवार यांच्यासारखा चाणाक्ष, धूर्त, अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि हवेची दिशा अचूक ओळखणारा जाणता नेता, सोबत जिल्ह्या-जिल्ह्यातील मातब्बर सुभेदार, त्यांनी उभारलेलं संस्थात्मक जाळं , त्यावर पोसलेले कार्यकर्ते एवढं सगळं असताना राष्ट्रवादी का वाढली नाही? पवारांच्याच शब्दांत सांगायचं तर 'भाकरी न फिरवल्यामुळं'!राजकारण प्रवाही असतं. ते विशिष्ट व्यक्ती अथवा घराण्यात अडकून राहिले तर त्याचं डबकं होतं. पवारांच्या राष्ट्रवादीचं असंच डबकं झालंय का? पवार, मोहिते, भोसले, क्षीरसागर, पाटील, देशमुख, भुजबळ, सोळंके, टोपे, नाईक, निंबाळकर आणि तटकरे अशा बारा घरांचा हा पक्ष. (आडनावं वानगीदाखल. बरोबर असतील तर निव्वळ योगायोग !) पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा असो की साखर कारखाना, दूध संघ, बाजार समिती असो. सगळं काही या घराण्यात. सतरंजी उचलणारे थकून भागून शेवटी शिवसेना- भाजपाच्या आश्रयाला गेले. कार्यकर्त्यांनी सतरंजी झटकली तसे हे सुभेदार उघडं पडले. शरद पवार यांचं आजवर सगळं राजकारण ऊस आणि साखर कारखानदारीभोवती फिरत आलं आहे. पवारांनी नेहमीच धनिक बागायतदारांची बाजू घेतली. ऊस, द्राक्षे आणि डाळिंबासाठी पवारांनी जेवढे प्रयत्न केले तेवढा ओलावा त्यांनी कोरडवाहू शेतकऱ्यांबद्दल दाखवला नाही, ही वस्तुस्थिती त्यांचे समर्थकही मान्य करतील.
'राष्ट्रवादी'चं विसावं वरीस धोक्याचं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 08:26 IST