अॅड. जयवंत महाराज बोधले - मनुष्याच्या ठिकाणी असणाऱ्या मन, बुद्धी, चित्त, अहंकार या चार गोष्टींंना अंत:करणचतुष्ट्य असे म्हटले जाते. संत एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात -संकल्प, विकल्प मनाचे।निश्चयो कर्म बुद्धीचे।चिंतन जाण चित्ताचे।अहंकाराचे मी पण।।यामध्ये अंत:करणाची संकल्प, विकल्प करणारी वृत्ती म्हणजे मन होय. अंत:करणाची निश्चय करणारी वृत्ती म्हणजे बुद्धी होय. तसेच अंत:करणाची पूर्वापार चिंतन करणारी वृत्ती म्हणजे चित्त होय आणि अंत:करणाची अहंग्रह धारण करणारी वृत्ती म्हणजे अहंकार होय. याच्या शुद्धीलाही सत्वशुद्धी असे म्हटले जाते.श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांनी ‘सत्वशुद्धी’ ची व्याख्या अशी सांगितली आहे की, तेवी सत्स्वरूपी रूचलेपणे।बुद्धी जे ऐसे अनन्य होणे।ते ‘सत्वशुद्धी’ म्हणे। केशीहंता।।सत्य स्वरूप जे परमात्मतत्व त्याच्या ठिकाणी बुद्धी अनन्यपणे राहणे यालाच ज्ञानेश्वर महाराज सत्वशुद्धी म्हणतात. खरे तर बुद्धी ही फार चंचल आहे. ती क्षणाक्षणाला रंग बदलते, असे संत तुकाराम महाराज सांगतात.अनेक बुद्धीचे तरंग।क्षणक्षणा पालटे रंग।धरू जाता संग।तव तव होय बाधक।।अलीकडच्या काळात माणसाच्या ठिकाणी चंचलता वाढलेली आहे. आहाराने, विचाराने, श्रवणाने बुद्धीच्या ठिकाणी शुद्धपणा आणणे खूप महत्त्वाचे आहे. महाभारतातील एका प्रसंगात भीष्माचार्य शरपंजरी उत्तरायणाची वाट पाहत पडले होते. त्यांना भेटण्याकरिता भगवान श्रीकृष्ण पाच पांडव, द्रौपदी यांच्याबरोबर गेले होते. धर्मराजाने भीष्मांना नमस्कार केला. त्याच्याकडे पाहून भीष्माचार्यांनी नैतिकतेच्या, धर्माच्या गोष्टी बोलायला सुरूवात केली. धर्माची ही भाषा ऐकून द्रौपदीला हसू आले. सर्वजण घाबरून गेले. हिच्या पहिल्या हसण्यामुळेच तर युद्ध झाले होते. भीष्माचार्यांनी तिच्याकडे पाहिले व हसण्याचे कारण विचारले. तेव्हा धाडस करून द्रौपदी म्हणाली, भरसभेत माझे वस्त्रहरण होत असताना त्यावेळेस तुम्ही तिथेच होता, मग त्यावेळेस तुमची धर्मबुद्धी कुठे गेली होती. भीष्माचार्य म्हणाले, द्रौपदी तू म्हणतेस ते खरे आहे. परंतु त्यावेळी मी दुर्योधनाचे अन्न खात होतो व त्यामुळे माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. आता मात्र या अर्जुनाच्या बाणाने ते दुष्ट रक्त सगळे निघून गेले आहे व आता माझी बुद्धी शुद्ध झाल्यामुळे मी धर्माच्या गोष्टी बोलत आहे. या कथेतून आपणास असे लक्षात येते की, आपला आहार शुद्ध असेल तर आपली बुद्धी शुद्ध होईल, हीच ती सत्वशुद्धी होय.