शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

आजचा अग्रलेख - खासगी रुग्णालयांचा स्वार्थ, 'ही' बेजबाबदारी आवरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 02:02 IST

या सगळ्या गदारोळामागे जसा बड्या हॉस्पिटल्सचा  स्वार्थ आहे तशी रुग्णांची अगतिकताही आहे, हे मान्य ! पण आता या गदारोळाला काही शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

‘सीटी स्कॅनचा वापर कमीत कमी करा. अवास्तव वापराने कॅन्सरचा धोका होऊ शकतो,’ असा इशारा एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिल्यावर तरी निदान देशात यावर चर्चा सुरू व्हावी. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने  देशाच्या वैद्यकीय क्षेत्राला अक्षरश: पांगळेपण आणले आहे. साधनांची  कमतरता ही  देशाच्या जागतिक अप्रतिष्ठेचे कारण ठरलेली त्यातली ठळक गोष्ट ! पण तेवढेच नाही.  उपलब्ध अपुऱ्या साधनांचा बेजबाबदार वापर, परिणामांपेक्षा दुष्परिणामांचे कारण ठरणारा  अप्रस्तुत औषधयोजनेचा अतिरेक, अनावश्यक चाचण्या आणि अवास्तव बिले लावण्याची खासगी वैद्यकीय क्षेत्राची चढाओढ हे सारे एका बाजूला, तर माहितीच्या अतिमाऱ्याने जणू सर्वज्ञ असल्यासारखे स्वतःच औषधयोजना करणारे, डॉक्टरांचे सल्ले  झुगारणारे, जरा शिंक आली तरी सीटी स्कॅनचा आग्रह धरणारे, रुग्णाला  बरे वाटले तरी केवळ भविष्याच्या भीतीपोटी  रुग्णालयातली  खाट अडवून ठेवणारे, कोरोनामुक्त झाल्यावरही किती प्रतिपिंडे उगवली ते पाहण्यासाठी म्हणून दर काही दिवसांनी स्वतःच चाचण्या करायला धावणारे लोकही आधीच आसन्नमरण झालेल्या  व्यवस्थेवरचा ताण अकारण वाढवत आहेत.

या सगळ्या गदारोळामागे जसा  बड्या हॉस्पिटल्सचा  स्वार्थ आहे तशी रुग्णांची अगतिकताही आहे, हे मान्य ! पण आता या गदारोळाला काही शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनावर कोणते उपाय करावेत, याविषयी वैद्यकीय क्षेत्रात मतमतांतरे आहेत. महाराष्ट्रातल्या टास्क फोर्सने कोविड प्रोटोकॉल तयार करून दिला आहे. कोरोनाबाधितास कोणते औषध द्यावे? किती दिवसांनी कोणते इंजेक्शन सुरू करावे? सीटी स्कॅन कधी करावा? रेमडेसिविर किंवा टोसिलिझुमॅब कधी द्यावे? - याची पूर्ण स्पष्टता लिखित स्वरूपात टास्क फोर्सने राज्यातल्या सर्व खासगी आणि सरकारी दवाखान्यात कळवली आहे. तरीही खासगी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स ठरावीक औषधांसाठी आग्रह धरतात. लाखो रुपयांची बिले बनवण्याचा त्यामागे हेतू असल्याची भीती महाराष्ट्रातल्या टास्क फोर्सने वारंवार व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने स्वतंत्र यंत्रणा उभी करावी. खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड प्रोटोकॉलपेक्षा वेगळे उपचार सुरू असतील तर त्याचा जाब विचारावा. प्रसंगी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. सरकारी कोविड सेंटरमध्ये हजारो रुग्ण दाखल आहेत. त्यांच्याकडून कधीही रेमडेसिविरचा आग्रह धरला जात नाही. तेथून मोठ्या प्रमाणावर रुग्ण बरे होऊन  घरी सुखरूप जात आहेत. रेमडेसिविरसाठी लागलेल्या ९० टक्के रांगा खासगी हॉस्पिटलमुळे आहेत.  हा काळ लुटालूट करण्याचा नाही. अनेकदा साध्या स्टेरॉइड देण्यामुळे रुग्ण बरे झाल्याची शेकडो उदाहरणे आहेत. कोकणात डॉ. हिंमतराव बावस्कर, नगर जिल्ह्यातील जामखेड येथे डॉ. रवींद्र आरोळे यांच्यासारखे अनेक डॉक्टर्स शहरी-ग्रामीण भागात अपुऱ्या साधनांनिशी कोविड  रुग्णांवर यशस्वी उपचार करीत आहेत. बड्या शहरातील खासगी हॉस्पिटल्सनी ही उदाहरणे डोळे उघडून बघितली पाहिजेत. सीटी स्कॅनवरून लूट सुरू झाल्याने सीटी स्कॅनचे दर निश्चित करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. तरीही सीटी स्कॅनचा आग्रह कायम आहे. एकेका रुग्णाचे तीन-चार वेळा सीटी स्कॅन केले जाते. त्यापोटी दहा-वीस हजारांची बिले लावली जातात.

एकाच पीपीई किटचे बिल दहा पेशंटला लावले जाते. सीटी स्कॅनच्या अतिवापराने धोका असल्याचा इशारा डॉ.गुलेरिया यांनी दिला आहेच! आतातर रेमडेसिविरच्या वारेमाप वापराचे रुग्णांवर गंभीर दुष्परिणाम दिसू लागले असून, अनेक ठिकाणी हा नवाच  ताण वैद्यकीय व्यवस्थेवर पडत असल्याच्या बातम्या आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णसेवेसाठी उभ्या असलेल्या डॉक्टरांना वंदन तर करायला हवेच; पण त्याबरोबरच या महामारीला संधी समजून हात धुवून घेण्याची घाई झालेल्या खासगी हॉस्पिटल्सना लगाम लावण्याची व्यवस्थाही हवी. केवळ ऑक्सिजनअभावी तडफडणाऱ्या प्रियजनांचे मृत्यू सोसावे लागलेल्या नागरिकांबद्दल व्यवस्थेला कणव हवीच हवी, पण वैद्यकीय सल्ले  धुडकावून मनमानी करणाऱ्या आणि आधीच ढेपाळलेल्या यंत्रणेवरचा ताण अकारण वाढवणाऱ्या नागरिकांनाही समज देण्याची वेळ आलेली आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्यांमधल्या टास्क फोर्सनी नेमक्या माहितीवर आधारित निकोप वैद्यकीय चर्चा घडवली पाहिजे. डॉक्टरांनी आणि रुग्णांनी, रुग्णांच्या आप्तांनी मनमानी करण्याची ही वेळ नव्हे ! बेजबाबदारी, मग ती भीतीपोटी आलेली असो, वा स्वार्थापोटी; तिला आवर घातला पाहिजे!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटल