विवाह ही अशी युती असते, ज्यामधील पुरुष खिडकी बंद ठेवून झोपू शकत नाही आणि स्त्री खिडकी उघडी ठेवून! जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या या विधानाचा राजकारणाशी अर्थाअर्थी संबंध नसला तरी, ते राजकारणालाही चपखल लागू पडते. विचाराधारांमध्ये मतभिन्नता असलेल्या राजकीय पक्षांची युती झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशाच एका युतीची घोषणा शुक्रवारी झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन, हिंदुत्वाचे राजकारण करणारी शिवसेना आणि छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घेऊन, ‘शेंडी, जानवे व पंचपळीच्या हिंदुत्वा’वर तुटून पडणारी संभाजी ब्रिगेड, या दोन पक्षांनी यापुढे एकत्र काम करण्याची घोषणा केली आहे. भूतकाळात उभय पक्षांमध्ये अनेक मुद्यांवर टोकाचे मतभेद दिसले असले तरी, त्यांच्यात काही साम्यस्थळेही आहेत. दोन्ही पक्षांनी आधी समाजकारणाचा वसा घेतला आणि मग राजकारणाची वाट धरली! शिवाय प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारधारेवर चालण्याचा दावाही दोन्ही पक्ष करतात.
अलीकडेच शिवसेनेच्या बहुतांश आमदार व खासदारांनी वेगळा गट स्थापन करीत, पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाशी पाट लावला. पाठोपाठ पक्षाच्या संघटनेलाही खिंडारे पडली. आजच्या घडीला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे वगळता, जनमानसावर प्रभाव असलेला एकही नेता शिवसेनेत दिसत नाही. दुसरीकडे २०१६ मध्ये राजकारणात प्रवेश केल्यानंतर अद्यापपर्यंत तरी संभाजी ब्रिगेडला कोणत्याही निवडणुकीत प्रभाव पाडता आलेला नाही. या पार्श्वभूमीवर उभय पक्ष एकत्र आले आहेत. स्वाभाविकपणे या घडामोडीचा राज्यातील राजकीय समीकरणांवर कितपत प्रभाव पडेल, याची चर्चा राजकीय नेते, तसेच विश्लेषकांमध्ये सुरू झाली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडमध्ये याआधी अनेक मुद्यांवर टोकाचे मतभेद होते हे जगजाहीर आहे. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या मांडणीवरून तर त्यांच्यातील मतभिन्नता अनेकदा समोर आली आहे. मग तो शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या सन्मानाचा मुद्दा असेल, जेम्स लेन मुद्याच्या अनुषंगाने भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवरील हल्ल्याचा विषय असेल अथवा लाल महालातील दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्याचा विवाद असेल! आता भलेही उद्धव ठाकरे उभय पक्षांचे रक्त एकच असल्याचे म्हणत असतील; पण वस्तुस्थिती आपल्या जागी कायम आहे, की भूतकाळात शिवसैनिक आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते अनेकदा एकमेकांसमोर उभे ठाकले होते!
गमतीशीर बाब म्हणजे भूतकाळात दोन्ही पक्षांच्या नेत्यांना भाजपचे वावडे नव्हते. अगदी अडीच वर्षांपूर्वीपर्यंत भाजप-शिवसेना युतीला दोन्ही पक्षांचे नेते राजकारणातील ‘जय-वीरू’ संबोधत असत. दुसरीकडे संभाजी ब्रिगेडने भाजपसोबत युतीचा पर्याय चाचपून बघायला हवा, अशी मांडणी संभाजी ब्रिगेडचे जन्मदाते असलेल्या पुरुषोत्तम खेडेकर यांनी दोनच वर्षांपूर्वी एका लेखातून केली होती. त्यांच्या अर्धांगिनी रेखा खेडेकर तर भाजपच्या आमदारदेखील होत्या. शेवटी प्रत्येकच पक्ष स्वहित नजरेसमोर ठेवूनच युती-आघाडी करीत असतो. त्यासाठी गरज भासेल तेव्हा विचारधाराही खुंटीला टांगून ठेवली जाते. तेच शिवसेना व संभाजी ब्रिगेडने केले असेल तर त्यामुळे कुणाला पोटशूळ उठण्याचे कारण नाही. युती झाल्यावर उभय पक्षांचे कार्यकर्ते मनाने कितपत जवळ येतात आणि निवडणुकांमध्ये जनता त्यांच्या युतीला कसा प्रतिसाद देते, यावरच या युतीचे पुढील भवितव्य अवलंबून असेल. घोडामैदान जवळच आहे. नव्या युतीच्या यशापयशाचा खरा लेखाजोखा त्यानंतरच मांडता येईल!