डोनाल्ड ट्रम्प यांच्या बेमुर्वतखोर निर्णयांमुळे बसणाऱ्या तडाख्यातून सावरण्याची तयारी भारत करत असतानाच, मुसळधार पावसाने देशासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे। ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या पन्नास टक्के आयात शुल्काचा परिणाम काय होईल, याविषयी सर्वत्र चर्चा सुरू आहे. ट्रम्प यांच्या आडमुठेपणाचा मुकाबला करणाऱ्या भारताला मुसळधार पावसाने वेठीस धरले आहे. जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतामध्ये पावसाच्या हाहाकाराने लोक हादरून गेले आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरासह विविध घटनांमध्ये पन्नासहून अधिक लोकांना प्राणास मुकावे लागले. मृतांमधील बहुतेक नागरिक वैष्णोदेवी यात्रा मार्गावर झालेल्या भूस्खलनात बळी पडले. बुधवारी पावसाने विश्रांती घेतली. मग मदत आणि बचाव कार्याला वेग आला. झेलम नदीला महापूर आल्यामुळे अनंतनाग आणि श्रीनगरमध्ये विविध ठिकाणी निवासी भागांत पाणी शिरले. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत.
जम्मू आणि काश्मीरमध्ये तर पावसाने नवे उच्चांक गाठले. श्रीनगरमध्ये पुरामुळे ऑप्टिकल फायबरचे मोठे नुकसान झाल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील सर्व फोन आणि इंटरनेट सेवा आता कुठे पूर्ववत होत आहे. बँकिंग सेवा ठप्प झाल्याचा सामान्यांच्या जनजीवनावर विपरीत परिणाम झाला आहे. हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. अचानक पूर आल्याने अनेक इमारती कोसळल्या. अनेक महामार्गावरील संपर्क तुटला आणि निवासी भाग पाण्याखाली गेले. चंडीगड-मनाली महामार्गाची चाळण झाली. दिल्लीतही यमुनेच्या वाढत्या पाणी पातळीमुळे, केंद्रीय पूर नियंत्रण कक्षाकडून इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडात चित्र भयंकर आहे. अरुणाचल प्रदेशात भूस्खलनामुळे स्थिती बिकट आहे. गंगा नदीच्या पातळीत वाढ झाल्याने वाराणसीत घाट पाण्याखाली गेले आहेत. कृष्णा आणि गोदावरीची पातळी वाढल्याने दक्षिण भारतातही चिंता आहे. ऐन गणेशोत्सवात मोठे विघ्न उभे ठाकले आहे. राज्यात सर्वदूर पाऊस आहे. मराठवाड्यात तर पावसाचा ओर प्रचंड वाढला आहे. विदर्भातही अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद आहे. ओला दुष्काळ पडण्याची ही चिन्हे आहेत. केवळ महाराष्ट्रापुरते नाही. देशाच्या अनेक भागात असेच चित्र आहे. शेजारच्या पाकिस्तान आणि चीनवरही हे संकट आले आहे. आपल्याकडे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. हल्ली पावसाचा 'पॅटर्न'च बदलला आहे. त्याचा परिणाम पिकांवर आणि अर्थातच शेतकऱ्यांवर होतो.
यंदा पावसाचे दिवस वाढले. शिवाय असमान पद्धतीने हा पाऊस पडला. काही ठिकाणी अतिवृष्टी आहे, तर काही ठिकाणी खूपच कमी पाऊस आहे. ज्वारी, मका, सोयाबीन, तूर आणि कापसासारखी पिके अतिवृष्टीमुळे गेली. शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर त्याचा गंभीर परिणाम होणार आहे. पाऊस आणि ढगफुटीमुळे राज्य सरकारांवर आणि केंद्र सरकारवर तातडीने उपाययोजना करण्याचा दबाव निर्माण होतो. आपत्ती व्यवस्थापन विभाग, कृषी विभाग आणि महसूल विभाग यांना त्वरित नुकसान मूल्यांकन, शेतकऱ्यांना मदत देणे आणि पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करणे आवश्यक असते. प्रशासनाच्या तयारीत काही त्रुटी असतील, तर या नैसर्गिक आपतीचा परिणाम अधिक गंभीर होतो. ट्रम्प यांच्या वेमुर्वतखोर धोरणांमुळे आधीच अर्थव्यवस्था अस्थिर आहे. त्यात या ओल्या दुष्काळाने स्थिती आणखी बिकट झाली आहे. खरीप हंगाम गेला तर देशाची अन्नसुरक्षा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे आयात वाढली तर महागाईचे मोठे संकट उभे राहते.
पाऊस हा नैसर्गिक आहे. तो किती कोसळावा, यावर आपले नियंत्रण नाही. मात्र, या आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठीची पूर्वतयारी आणि योग्य धोरण आवश्यक असते. जलसंधारण, ढगफुटीच्या अंदाजाचे तंत्रज्ञान, शेतकऱ्यांसाठी विमा योजना, आपत्ती व्यवस्थापनाच्या तंत्रांचा योग्य वापर आणि केंद्र-राज्य यांचा समन्वय यामुळे नैसर्गिक आपत्तींचा तडाखा कमी करता येऊ शकतो. नद्यांना येणारे महापूर ही फक्त नैसर्गिक आपत्ती नाही. त्यामागे मानवी हस्तक्षेपाचाही मोठा हात असतो. नदीच्या किनाऱ्यांवर अवैध बांधकामे उभी केली जातात. नैसर्गिक जलस्रोत आणि झाडे नष्ट झाल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत शोषले जात नाही. ते नदीत थेट येते, नाल्यांमध्ये आणि नद्यांमध्ये रासायनिक कचरा सोडल्याने नदीच्या प्रवाहाला अडथळा येतो. अशी अनेक कारणे आहेत. पाऊस आपल्या हातात नाही. ट्रम्प तर हाताबाहेर गेलेले आहेत. मात्र, आपल्या शहरांचे नियोजन, नद्यांचे व्यवस्थापन हे आपल्या हातात आहे. मुसळधार पावसाच्या तडाख्यातून हे आपण शिकायला हवे!