शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

आजचा अग्रलेख: छकुलीचे दप्तर अन् न्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 08:16 IST

Court News: अतिक्रमण, बुलडोझर वगैरेची पुरती ओळख न झालेली सहा-सात वर्षांची बालिका शाळेची पुस्तके-वह्या काखोटीला मारून बंदोबस्तावरच्या पोलिसांच्या पुढून पळतानाचे गेल्या आठवड्यातील दृश्य पाहून देशाचे हृदय हेलावले. जणू ती छकुली दप्तर नव्हे तर स्वप्ने कवटाळून धावत होती. तिच्या काखेतील चार बुकांनी कायद्याचे ग्रंथ हलविले.

अतिक्रमण, बुलडोझर वगैरेची पुरती ओळख न झालेली सहा-सात वर्षांची बालिका शाळेची पुस्तके-वह्या काखोटीला मारून बंदोबस्तावरच्या पोलिसांच्या पुढून पळतानाचे गेल्या आठवड्यातील दृश्य पाहून देशाचे हृदय हेलावले. जणू ती छकुली दप्तर नव्हे तर स्वप्ने कवटाळून धावत होती. तिच्या काखेतील चार बुकांनी कायद्याचे ग्रंथ हलविले. चार वर्षांआधीच्या बुलडोझर कारवाईच्या विरोधात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी न्या. अभय ओक व न्या. उज्ज्वल भुयान यांना त्या बालिकेची आठवण झाली. जिथे आसरा घ्यायचा, खायचे-प्यायचे, ऊन-वाऱ्यापासून निवारा, संरक्षण मिळवायचे आणि सोबतच उज्ज्वल भविष्याची, अधिक मोठ्या घरात राहायला जाण्याची स्वप्ने पाहायची, त्या स्वप्नांच्या पाठलागात रात्रंदिवस परिश्रम घ्यायचे, असे एखाद्याचे घर क्षणात जमीनदोस्त करणाऱ्या प्रशासकीय निष्ठुरतेवर न्यायदेवतेने संतापाने कोरडे ओढले.

प्रयागराजमधील सहा याचिकाकर्त्यांना प्रत्येकी १० लाख रुपये भरपाईचा आदेश दिला. निवाऱ्याचा मूलभूत अधिकार वगैरे काही प्रकार आहे की नाही, अशी विचारणाही केली. देशाच्या सर्वोच्च न्यायासनाने किंवा उच्च न्यायालयांनी असे खडसावण्याची ही पहिली वेळ नाही. काल-परवा नागपूर हिंसाचारातील कथित सूत्रधार फहिम खान व अन्य एकाच्या घरावर महापालिकेने चालविलेला बुलडोझर उच्च न्यायालयाने रोखला. काेकणात मालवणला क्रिकेट सामन्यावेळी एका मुलाने पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिली म्हणून त्याच्या माता-पित्याच्या घरावर बुलडोझर चालविल्याबद्दल उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले. उच्च न्यायालयाच्या या ताशेऱ्यांना उत्तर प्रदेशातील बुलडोझरप्रकरणी गेल्या नोव्हेंबरमधील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार आहे. त्या निकालाआधी अनेकदा सर्वोच्च न्यायालयात बुलडोझर संस्कृतीवर खल झाला होता. प्रशासनाला कायदेशीर बाबींची, संवेदनशीलतेची आठवण करून देण्यात आली होती. तरीही प्रशासन निर्ढावल्यासारखे वागत राहिले. तेव्हा, अशा कारवायांसाठी काही अटी घालून देण्यात आल्या. तरीदेखील प्रशासन सुधारायला तयार नाही. त्याची सगळी कारणे सगळ्यांना पुरती ठाऊक आहेत. ही नवी संस्कृती म्हटली जात असली तरी प्रत्यक्षात ती विकृती आहे आणि तिची ओळख करून देण्याचा मान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे जातो.

अशा बहुतेक कारवाया मुस्लीम आरोपींच्याच घरांवर करण्याचा शिरस्ता ते पाळत आले. असा बुलडोझर चालविला की बहुसंख्य हिंदू खुश होतात, हे त्यांनी ओळखले आणि अभिमानाने स्वत:ला ‘बुलडोझर बाबा’ म्हणवून घेऊ लागले. त्यांच्या या कथित लोकप्रियतेचा हेवा अन्य मुख्यमंत्र्यांना वाटू लागला आणि मध्य प्रदेश, राजस्थान वगैरे राज्यांमध्येही बुलडोझर चालू लागला. न्यायव्यवस्थेची मूल्ये गुंडाळून ठेवणारा हा मध्ययुगीन प्रकार आहे. उन्मादी समुदायाला असा झटपट न्याय नेहमीच आकर्षक वाटतो. स्वत:ला न्यायाधीश म्हणवून घेत तो देणाऱ्यांवर लोक पुष्पवृष्टी करतात, जयजयकार केला जातो. त्या जयजयकारात आपण असावे असे शासनकर्त्यांना वाटते आणि ते या मध्ययुगीन न्यायाचे समर्थन करू लागतात. झटपट न्यायाबाबत बुलडोझर आता बनावट चकमकींशी स्पर्धा करू लागला आहे आणि संशयित अपराध्यांची चकमकीत हत्येसारखाच बुलडोझरही शासनकर्त्यांना लोकांच्या टाळ्या घेण्यासाठी हवा आहे.

अलीकडचे बदलापूर विद्यार्थिनी छळ प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काउंटर बनावट होते आणि कोणाला तरी वाचविण्यासाठी त्याचा बळी घेण्यात आला, असे दंडाधिकारी चाैकशीत सिद्ध होऊनही संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना कायद्याचा धाक नाही. चकमक असो की बुलडोझर, पीडितांना बचावाची संधी न देता, घटनात्मक न्यायासनासमोर सुनावणीशिवाय कारवाई लोकशाहीविरोधी आहे. एखाद्याचा जीव, निवारा हिरावून घेणे असंस्कृत, अमानवीय आहे, असंवेदनशीलतेचा कळस आहे. दुर्दैव म्हणजे, उठताबसता राज्यघटनेतील तत्त्वांची, मूल्यांची घोकंपट्टी करणारे नोकरशहा आणि सर्वांना हक्काच्या निवाऱ्याचे आश्वासन देणारे, त्या बळावर पुन्हा पुन्हा सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहणारे सत्ताधारी या अमानवीयतेत विकृत आनंद मिळवतात. प्रसिद्ध उर्दू शायर बशीर बद्र यांच्या ‘लोग टूट जाते हैं एक घर बनाने में, तुम तरस नहीं खाते बस्तियां जलाने में’ या ओळी निर्ढावलेल्या व्यवस्थेचे अत्यंत नेमके वर्णन आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीCourtन्यायालय