- विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह‘सत्तेचे हजार हात असतात जे दिसत नाहीत’ अशा आशयाची एक जुनी म्हण आहे. जसे सत्तेचे हात दिसत नाहीत, तसे सत्तेचे चमत्कारही दिसत नाहीत, असे म्हणतात. बिहार निवडणुकीच्या ताज्या निकालांनी ही म्हण खरी करून दाखवली. शेवटी असे झाले तरी काय, की नितीश कुमार पुन्हा सत्तेवर आले? कोरोनानंतरच्या लॉकडाऊनने सगळ्यात जास्त आफत कोणावर आणली असेल, तर ती रोजगाराच्या शोधात देशभर पांगावे लागलेल्या मजुरांच्या जगण्यावर! टाळेबंदीत अडकलेल्या शहरातला आपला घास संपला आहे याची जाणीव होताच हे मजूर होते तिथून पायी चालत आपल्या गावाच्या दिशेने निघाले. त्यांच्या वेदना अख्ख्या देशाने पाहिल्या आहेत. घरी परतण्यासाठी व्याकूळ झालेल्या या मजुरांपैकी कित्येक हजार लोक बिहारचे होते. ते आपली बोचकी डोक्यावर घेऊन उपाशीपोटी राज्यात परतले. जिथे परतले तिथेही त्यांना रोजीरोटी नव्हतीच. मुंबई, दिल्ली, गुजरात, राजस्थानातून पायी आपल्या गावी परतलेल्या या मजुरांची वेदना निवडणुकीत भारी पडायला हवी होती. बेरोजगारीचा मुद्दा निवडणुकीत केंद्रस्थानी यायला हवा होता; पण सगळे मुद्दे कोपऱ्यात भिरकावले गेले. हे का झाले असावे? नितीश कुमार यांचे सातव्यांदा मुख्यमंत्री होणे एखादा ‘चमत्कार’ व्हावा, तसेच वाटते आहे.
अर्थात, हे सगळ्यांना कळते की सत्तेत असण्याचे भरपूर फायदे असतात. आणि त्यात दिल्लीतील सत्ता सोबत असेल तर काय - ‘सोने पे सुहागा’. कशाला काही कमी म्हणून पडत नाही. एनडीएने सुरुवातीपासूनच नितीश कुमार यांनाच आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून सादर केले होते. स्वाभाविकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून केंद्रातील डझनभर मंत्री बिहारच्या निवडणुकीत प्रचाराच्या मैदानात उतरले. या सर्वांना साधनसामग्रीची कोणतीच उणीव नव्हती. दिल्लीतील कुमक मदतीला असल्याने सत्ताधारी आघाडीकडे बाकी सगळी तरतूद भरपूर असली, तरीही गेली पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या नितीश कुमार यांच्याविरुद्धची मतदारांची वाढलेली नाराजी सत्ताधारी गोटाच्या एकूण तयारीला भारी पडेल, असे वाटत होते; पण अखेरीस सत्तेच्या ताकदीचे हजार हात भारी पडले आणि शेवटी विजयाचे मापही सत्तेच्याच पारड्यात पडले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात आपल्या झंझावाताने हलचल निर्माण करणाऱ्या राजदच्या तेजस्वी यादव यांनी हे प्रश्न पूर्ण ताकदीने उपस्थित केले. बिहारच्या तरुणांना त्यांनी १० लाख सरकारी नोकऱ्यांचे आश्वासन दिले. सरकारचे भांडे फोडण्यासाठी तेजस्वी यादव प्रयत्नांची शिकस्त करत होते, पण त्यांच्याकडे साधने कमी होती. पाठीवर हात ठेवायला पिता लालूप्रसाद यादव मैदानात नव्हते. दुसरीकडे असदुद्दिन ओवैसी तेजस्वी यादव यांची मते खाण्यासाठी मैदानात उतरले होते. ओवैसी यांनी ५ जागा जिंकल्याही. त्यांनी महाआघाडीची मते खाल्ली, हे उघडच आहे. तिकडे चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्या जदयुचे नुकसान केले. एवढेच नव्हे, तर राजदला मिळणारी दलितांची मतेही पळवली. ओवैसी आणि चिराग हे दोघे भाजपची बी टीम होऊन राजदचे नुकसान करत होते. असे असूनही तेजस्वी ज्या प्रकारे लढले त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे होईल. त्यांच्या नेतृत्वाखाली राजद सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. ओवैसी मैदानात नसते, काँग्रेसने मागच्याइतक्या जागा मिळवल्या असत्या तर आज तेजस्वी मुख्यमंत्री झाले असते. कॉंग्रेसला जास्त जागा देणे त्यांना महागात पडले. तरी असेच म्हणावे लागेल की तेजस्वी बिहारची नवी आशा म्हणून समोर आले, त्यांनी आपल्या क्षमता दाखवून दिल्या आहेत.
शक्य तेथे आणि तेव्हा मित्रपक्षाला खच्ची करायचे, असेच भाजपचे डावपेच असतात! महाराष्ट्रात त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत हेच केले; पण ते शिवसेनेच्या लक्षात आले आणि त्या पक्षाने भाजपची साथ सोडली. नितीश अशा स्थितीत अडकले की त्यांना भाजपची साथ सोडताही येत नव्हती. या सगळ्यात सर्वाधिक नुकसान बिहारचे झाले आहे. एनडीए आणि नितीश कितीही दावे करोत त्यांच्या राजवटीत बिहारमध्ये काहीही बदललेले नाही. मागास राज्य हा शिक्का आजही आहे. सत्तेची ताकद जिंकली; पण बिहारचा सामान्य माणूस हरला, हेच खरे!
- vijaydarda@lokmat.com