शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बीड नव्हे, हे तर ‘गँग्स ऑफ वासेपूर’ !

By नंदकिशोर पाटील | Updated: December 17, 2024 15:20 IST

जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न सर्वात कमी आहे. दरवर्षी वीसेक लाख मजुरांना ऊसतोडणीसाठी परजिल्ह्यात जावे लागते. हे चित्र बदलायचे असेल, तर ही गुन्हेगारी थांबली पाहिजे आणि त्यासाठी राजकीय नेत्यांनी पुढाकार घेतला पाहिजे.

- नंदकिशोर पाटील, संपादक, छत्रपती संभाजीनगर

२०१२ साली प्रदर्शित झालेला दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा ‘गँग्स ऑफ वासेपूर’ चित्रपट असो की, अलीकडेच नेटफ्लिक्सवर गाजलेली ‘मिर्झापूर’ नावाची वेब सिरीज. झारखंडमधील कोळसा माफिया आणि उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी विश्वावर आधारित या दोन्ही कलाकृतींमध्ये दाखविलेली हिंसा, गुंडागर्दी, स्थानिक माफियांची दहशत, खंडणी बहाद्दर आणि याच गुंडांच्या टोळ्यांवर गब्बर झालेले बाहुबली पाहिल्यानंतर आपल्या अंगाचा थरकाप उडतो. परंतु, हे काल्पनिक चित्रपट आणि वेबसिरीज देखील फिके वाटावेत, अशा गुन्हेगारी घटनांची मालिका सध्या बीड जिल्ह्यात सुरू आहे.

केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि नंतर झालेल्या खुनाच्या बातमीची शाई वाळत नाही तोच परळीतील एका उद्योजकाचे अपहरण होते. अपहरणाचा गुन्हा दाखल होईपर्यंत बीडमध्ये आठवले गँगकडून गोळीबार केला जातो. परळी तालुक्यातील मरळवाडी येथील सरपंच बापू आंधळे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात येते. गेल्या वर्षभरातील गुन्हेगारी घटनांची आकडेवारी पाहिली, तर या जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था नावाची गोष्ट शिल्लक राहिली नसल्याचे दिसून येते. गेल्या अकरा महिन्यांत तब्बल ३६ जणांचे खून झाले आहे, म्हणजेच दरमहा दोन जणांचा जीव घेतला गेला, तर १६८ जणांच्या खुनाचा प्रयत्न झाला. या जिल्ह्यात महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांची आकडेवारी पाहिली, तर बीडने बिहारला देखील मागे टाकले असल्याचे दिसून येईल. वर्षभरात १५६ महिला/तरुणींवर बलात्कार झाले असून, विनयभंगाच्या ३८६ घटनांची नोंद झाली आहे. याचाच अर्थ, दरदिवशी एकीचा विनयभंग होतो आणि दिवसाआड एकीवर बलात्कार!

या प्रकरणांमध्ये वरवर जरी काही गोष्टी समोर आल्या असतील, तरी या घटनेच्या मुळाशी गेल्यास पवन ऊर्जा, सौर ऊर्जेच्या क्षेत्रातील नवीन प्रकल्पांशी संबंधित अनेक गंभीर बाबी उजेडात येतील. या जिल्ह्यातील हिंसक घटनांमागे जातीय द्वेष हेच एकमेव कारण नसून, आर्थिक हितसंबंधातून या घटना घडल्याचे दिसून येईल. आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्या तोंडून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या घटनेचा घटनाक्रम ऐकल्यानंतर आपल्या अंगाचा देखील थरकाप उडतो. बीड जिल्ह्यातील कोरडे हवामान आणि गतिमान वारे पवन ऊर्जेसाठी पोषक असल्याने गेल्या काही वर्षांत या जिल्ह्यात रिन्यू पॉवर, टाटा, स्टरलाइट, अवाडा, टोरंट पॉवर, इ. यांसारख्या अनेक नामांकित कंपन्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर मोठमोठे पवनचक्की आणि सौर ऊर्जेचे प्रकल्प उभे केले आहेत, परंतु मागील काही वर्षांमध्ये या सर्व गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय हस्तक्षेप, स्थानिक गुंडागर्दी, दहशत, खंडणी बहाद्दर आणि वसुलीखोर लोकांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. आ. सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात नेमके याच बाबीवर बोट ठेवले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागील मास्टरमाइंड शोधला पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. आ. धस यांनी समोर येऊन याप्रकरणी ठोस भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक आहे, कारण काही जणांनी यास केवळ जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. परंतु, जिल्ह्यात गुन्हेगारी कोणामुळे वाढली, यावर धस यांनी नेमके बोट ठेवण्याचे धाडस केले.

अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्याने दाखल केलेल्या फिर्यादीवरून वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत, तर सरपंच देशमुख यांच्या खुन्यातील काही आरोपी हे कराड यांचे नातेवाईक असल्याचे समजते. बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांवर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे म्हणाले, जिल्ह्यातील काही घटनांवरून बीडचा बिहार झाल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही. अशा घटना तर इतर जिल्ह्यांत सुद्धा घडतात! मंत्री राहिलेल्या मुंडे यांची ही प्रतिक्रिया गुन्हेगारांना पाठीशी घालणारी आणि प्रोत्साहन देणारी आहे. स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी अशा प्रकारची भूमिका कधीच घेतली नव्हती. बीड हा वारकरी संप्रदायाचा जिल्हा आहे. संत भगवान बाबा यांच्यासारख्या संतांचा वारसा लाभलेला आहे. गुन्हेगारी सत्र असेच सुरू राहिले, तर ऊर्जा क्षेत्रात येऊ घातलेली गुंतवणूक थांबेल. उद्योजक, व्यापारी स्थलांतर करतील. आधीच या जिल्ह्यात रोजगाराच्या संधीचा अभाव आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न सर्वात कमी आहे. दरवर्षी वीसेक लाख मजुरांना ऊसतोडणीसाठी परजिल्ह्यात जावे लागते. हे चित्र बदलायचे असेल, तर ही गुन्हेगारी थांबली पाहिजे आणि त्यासाठी राजकीय नेत्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. अन्यथा,‘गँग्स ऑफ वासेपूर’सारख्या चित्रपटात दाखविल्याप्रमाणे भीषण परिस्थिती उद्भवणार यात शंका नाही.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी