शर्मिला फडके, ख्यातनाम कला समीक्षक, लेखिका
पिवळी सूर्यफुलं म्हटलं की नजरेसमोर येतात ती फक्त आणि फक्त व्हॅन गॉगची सूर्यफुलं. इंटरनेटवर पिवळी सूर्यफुलं टाइप करायचा अवकाश, लाखो वेबसाइट्समधून सडा पडतो, तोही त्यांचाच. चित्रासोबत चित्रकाराचं नाव घट्ट जोडलं गेल्याचं सर्वात लोकप्रिय उदाहरणही हेच. पिवळ्या रंगाच्या फक्त तीन छटांमध्ये रंगवलं गेलेलं हे साध्या, बिनवासाच्या, फुलदाणीत खोचलेल्या फुलांचं पेंटिंग. रंगाच्या जाड, इम्पास्टो थरामुळे एक विशिष्ट पोत चित्राला आहे. रंगांचा कल्लोळ नाही, शांत सुरेल मेळ आहे. पोस्ट इम्प्रेशनिस्ट शैलीचं उत्कृष्ट उदाहरण.
व्हॅन गॉगने अनेक पिवळी सूर्यफुलं रंगवली. काही आनंदी, उत्फुल्ल मन:स्थितीत रंगवली, काही उदास, निराश असताना. प्रत्येक मूड प्रत्येक पिवळ्या सूर्यफुलात उतरला. आर्ल्सच्या पिवळ्या घरात आपला प्रिय मित्र पॉल गोगीन राहायला येण्याच्या आतूर खुशीत व्हिन्सेन्टने मित्राच्या स्वागताप्रीत्यर्थ, त्याची झोपण्याची खोली, लिहिण्याची जागा सजवायला एकूण बारा पिवळ्या सूर्यफुलांची चित्रमालिका रंगवायला घेतली. त्यापैकी अकरा तो पूर्ण करू शकला. आता ती जगभरात विखुरलेली आहेत.
अनेक आठवडे खपून, सहवासाची आस, मैत्रीची आशा, पुन्हा एकदा नव्याने आयुष्य सुरू करण्याची आकांक्षा कुंचल्याच्या प्रत्येक फटकाऱ्यात ओतून ज्याच्याकरिता सूर्यफुलं इतक्या उत्साहात रंगवली, तो मित्र पिवळ्या घरात राहायला आला खरा; पण ते वास्तव्य काही सुखावह ठरलं नाही. दोन महिन्यांचा हा कालावधी पुढच्या असंख्य दुर्दैवी, दु:खद प्रसंगांची नांदी ठरला, ज्याची परिणती अखेर व्हिन्सेन्टच्या आयुष्याची अखेर होण्यात झाली. नंतर गोगीनने लिहिलं, ‘ही सूर्यफुलं व्हॅन गॉगचं सेल्फ पोर्ट्रेट आहे. त्याची चित्रशैली आणि स्वभावासकट संपूर्ण व्हिन्सेन्ट मला या सूर्यफुलांत दिसतो.’ आपल्या रंग कौशल्याने मित्राला प्रभावित करण्याची तीव्र आस या फुलांमध्ये होती. ‘ही फुलं मला आपली वाटतात,’ त्याने थिओला लिहिलं आहे. आपल्या आवडत्या पिवळ्या रंगाची अनेक मिश्रणं करून बघण्याचा छंद त्याला होता.
पॅरिसच्या गजबजलेल्या प्रदूषित शहरी वातावरणातून दक्षिणेच्या प्रोव्हेन्समधल्या उबदार, लख्ख सूर्यप्रकाशित प्रदेशात आल्यावर अत्यंत आशावादी मनोवृत्तीत व्हॅन गॉगने रंगवायला घेतलेली ही सूर्यफुलं एका अर्थाने त्याच्या स्थलांतरणाचंही प्रतीक. चित्रांमधल्या प्रतीकात्मतेचं आकर्षणही त्याला होतंच. आपले चित्रविषय खूप विचारपूर्वक निवडायचा तो. निष्ठा, प्रेम, भक्ती, भारावलेपणाचं प्रतीक असलेली ही सूर्यफुलं. त्याआधी पॅरिसमध्ये राहत असतानाही त्याने सूर्यफुलं रंगवलीच होती; पण ही वेगळी, खास होती. त्यात भावनिक खोली आहे, चित्रकार म्हणून, माणूस म्हणून व्यक्तिमत्त्वात आलेली परिपक्वता आहे.
सूर्यफुलाची मान प्रकाशाच्या लालसेत सदैव सूर्याच्या दिशेनेच वळलेली असते. व्हॅन गॉगमध्येही अशी लालसा होती, जगण्याकरिता त्याला सदैव प्रकाशाची गरज लागे. अध्यात्माची, मानवी सहवास, प्रेमाची ऊब, कौतुकाचं खतपाणी याकरता तो सदैव तहानलेला होता. मृत्यूपर्यंत त्याची ती तहान सर्वार्थाने कधीही भागली नाही. मृत्यूनंतर ही सूर्यफुलं व्हॅन गॉगच्या जगण्याच्या आसक्तीचं, त्याच्या जीवनेच्छेचं प्रतीक म्हणून अजरामर व्हावीत, यापेक्षा वेगळी आयरनी कोणती?
आर्ल्समधल्या अखेरच्या, एकाकी दिवसांत, सैरभैर मन:स्थितीत रंगवलेली सूर्यफुलं, कोमेजून गेलेली, माना टाकलेली तरीही एकदा शेवटी प्रयासपूर्वक सूर्याच्या दिशेने बघायचा प्रयत्न करणारी. सुकत गेलेली, मरणपंथाला लागलेली, तपकिरी छटेतली... अपरिहार्य जीवनचक्र, आशा-निराशेचं एक वर्तुळ व्हिन्सेन्टने पूर्ण केलं, हे खरंच! sharmilaphadke@gmail.com
Web Summary : Van Gogh's sunflowers, painted in Arles, reflect his hopes for friendship and a new life. Goghin saw them as self-portraits, revealing Van Gogh's artistic passion and unfulfilled need for connection, forever capturing his life's yearning.
Web Summary : आर्ल्स में चित्रित वान गाग के सूरजमुखी, दोस्ती और एक नए जीवन की उनकी उम्मीदों को दर्शाते हैं। गोगिन ने उन्हें आत्म-चित्र के रूप में देखा, वान गाग के कलात्मक जुनून और संबंध की अतृप्त आवश्यकता को प्रकट करते हुए, हमेशा के लिए उनके जीवन की लालसा को कैद किया।