- डॉ. जनार्दन वाघमारे, जेष्ठ साहित्यिक
माजी केंद्रीय गृहमंत्री आणि पंजाबचे माजी राज्यपाल, लातूरचे सुपुत्र शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला आहे. माझा ७०-७५ वर्षांपासूृनचा वर्गमित्र आणि राजकारणाच्या देवघरातील देव गेला, या शब्दांत डॉ. जनार्दन वाघमारे यांनी कंठात दाटलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. डॉ. वाघमारे यांच्या या भावस्पर्शी प्रतिक्रियेतून चाकूरकर यांच्या महान व्यक्तिमत्त्वाची आणि राजकीय योगदानाची उंची स्पष्ट होते.
शिवराज पाटील-चाकूरकर यांची ओळख केवळ एक राजकारणी म्हणून नव्हे, तर काँग्रेस पक्षाचे 'थिंक टँक' आणि तत्त्वनिष्ठ, सुसंस्कृत नेते म्हणून आहे. चाकूरकर यांनी ५५ वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक उच्चपदे भूषवली; परंतु कधीही तत्त्व सोडून राजकारण केले नाही. त्यांचा विनम्र स्वभाव आणि सुसंस्कृत आचरण हा आजच्या राजकारण्यांसाठी एक आदर्श होता. चाकूरकरांनी भूषवलेल्या प्रत्येक पदाला न्याय दिला. जर चाकूरकर २००४च्या लोकसभा निवडणुकीत लातूरमधून निवडून आले असते, तर ते देशाचे पंतप्रधान झाले असते.
उत्तम प्रशासक, अभ्यासू नेतेचाकूरकर यांचा राजकीय प्रवास अत्यंत अभ्यासू आणि कार्यक्षम होता. त्यांचे शिक्षण पार्श्वभूमी उर्दू, मराठी आणि उच्च शिक्षण इंग्रजीमध्ये झाले होते, ज्यामुळे ते एक प्रज्ञावंत आणि अभ्यासू राजकारणी म्हणून ओळखले जात होते. १९६६ मध्ये लातूरचे नगराध्यक्ष म्हणून त्यांच्या राजकीय पर्वाला सुरुवात झाली. त्यांनी एक वकील म्हणून काम करत असताना, सार्वजनिक जीवनात सक्रिय सहभाग घेतला. नगराध्यक्ष म्हणून त्यांनी लातूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात मोलाची भूमिका बजावली. आज लातूरमध्ये दिसणारी ‘गंजगोलाई’ त्यांच्याच कार्यकाळात बांधली गेली. नगराध्यक्षानंतर आमदार, राज्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, केंद्रात विविध पदे, लोकसभाध्यक्ष आणि सार्वजनिक जीवनातील शेवटचे पद पंजाबचे राज्यपाल अशी उत्तुंग पदे त्यांनी भूषविली. चाकूरकर हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले नेते होते. त्यांनी समाजात नेहमी आदर्श विचार मांडले. आजच्या राजकारणात इतका मोठा विद्वान सापडणार नाही.
अखेरची भेट : आदर्श आणि मार्गदर्शन..!चाकूरकरांच्या लातूर येथील ‘देवघर’ निवासस्थानी त्यांच्या वाढदिवसाला भेट दिल्याचा एक भावनिक प्रसंग मला आठवतो. अन्न-पाणी वर्ज्य केलेल्या अवस्थेतही, मी ‘तुम्ही आमचे आदर्श आहात, तुमच्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे’, असे सांगून त्यांना भेटण्याची विनंती केली. या भेटीत चाकूरकर यांनी भेट म्हणून भगवद्गीतेचे वाचन करण्यासाठी एक पुस्तकही मला दिले होते. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या रूपाने भारतीय आणि विशेषतः लातूरच्या राजकारणाने एक विद्वान, तत्त्वनिष्ठ आणि सुसंस्कृत आदर्श गमावला आहे.
धर्म, विज्ञान अन् संस्कृतीचा समन्वय साधणारा नेता..!डॉ. शिवराज पाटील-चाकूरकर आणि मी राजस्थान विद्यालयात दहावीत वर्गमित्र होतो आणि नंतर हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात एकत्र शिकलो. पुढील शिक्षणासाठी आम्ही वेगवेगळ्या वाटा निवडल्या. मी इंग्रजी साहित्यात एम. ए. करून प्राध्यापक झालो, तर त्यांनी कायद्याचे शिक्षण घेऊन वकिली पत्करली. लातूरच्या भूमीतून त्यांनी घेतलेली उत्तुंग राजकीय भरारी केवळ देशालाच नव्हे, तर पुढील पिढ्यांनाही मार्गदर्शक आहे. त्यांच्यासारखा सुसंस्कृत राजकारणी क्वचितच सापडेल. धर्म, संस्कृती, अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय साधण्याचा त्यांचा प्रयत्न वाखाणण्याजोगा होता. त्यांची ही विचारधारा आजही आपल्याला प्रेरणा देते.
Web Summary : Janardan Waghmare mourns the loss of Shivraj Patil-Chakurkar, a statesman, describing him as a guiding light. Waghmare recalls their long friendship and Chakurkar's principled politics, scholarly nature, and dedication to public service. He highlighted Chakurkar's potential to have been Prime Minister and his ability to blend dharma, science, and culture.
Web Summary : जनार्दन वाघमारे ने शिवराज पाटिल-चाकूरकर के निधन पर शोक व्यक्त किया, उन्हें एक मार्गदर्शक बताया। वाघमारे ने अपनी लंबी दोस्ती और चाकूरकर की सैद्धांतिक राजनीति, विद्वतापूर्ण स्वभाव और सार्वजनिक सेवा के प्रति समर्पण को याद किया। उन्होंने चाकूरकर के प्रधानमंत्री बनने की क्षमता और धर्म, विज्ञान और संस्कृति को मिलाने की उनकी क्षमता पर प्रकाश डाला।