शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीचे मूळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 07:31 IST

संविधान सभेतील भाषणात डॉ. आंबेडकरांनी विचारले होते, ‘हजारो जातीत विभाजित जनता एक राष्ट्र कसे होऊ शकते? आपण एक आहोत, हा आपला भ्रम होय!’

संविधान सभेतील भाषणात डॉ. आंबेडकरांनी विचारले होते, ‘हजारो जातीत विभाजित जनता एक राष्ट्र कसे होऊ शकते? आपण एक आहोत, हा आपला भ्रम होय!’

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विसाव्या शतकातील एक महान विचारवंत आणि द्रष्टे होते.  त्यांनी समस्त मानवी समाजातील विषमतेच्या विरोधात बंड पुकारले.   डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  आयुष्यभर केलेले चिंतन, लेखन आणि भाषणातून त्यांना अपेक्षित असलेल्या भारताचे चित्र रेखाटले आहे. त्यांनी ऑल इंडिया रेडिओला ३ ऑक्टोबर १९५४ रोजी ‘माझ्या जीवनाचे तत्त्वज्ञान’ या विषयावर एक मुलाखत दिली. त्यात ते म्हणतात, “माझे सामाजिक तत्त्वज्ञान हे तीन शब्दात सामावले आहे; स्वातंत्र्य, समता आणि बंधुता! तथापि, कुणी असे म्हणेल की, हे तत्त्वज्ञान मी फ्रान्सच्या क्रांतीतून उसने घेतले आहे.

तर, तसे नाही. माझ्या तत्त्वज्ञानाची मुळे ही धर्मात आहेत, राज्यशास्त्रात नाहीत. मी ती माझे गुरू बुद्ध यांच्या तत्त्वज्ञानातून घेतली आहेत.” डॉ. आंबेडकरांनी भारतीय समाजाचा बारकाईने अभ्यास केला होता. अस्पृश्यता आणि जातिव्यवस्था हे भारतीय समाजाचे वास्तव! अस्पृश्यतेचा अनुभव त्यांनी प्रत्यक्षच घेतला होता. श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या आधारावर विभाजित जातींबाबत ते म्हणतात, “जात हा शब्द समान दर्जाचा नाही. जात असमानतेवर आधारित आहे. ही श्रेणीपद्धत असून त्यात उच्च जातीला अग्रक्रम आणि कनिष्ठ जातीला न्यूनक्रम मिळतो.” विशेष म्हणजे जातिव्यवस्था ही धर्माधिष्ठित आहे. त्यामुळे जातीगत विषमतेचा झरा हा धर्म आहे. धर्माने जातीगत विषमता निर्माण करून तिचे संवर्धन केले.

भारतीय समाजातील ही धर्माधिष्ठित विषमता डॉ. आंबेडकरांना मान्य नव्हती. समाजात समता निर्माण झाल्याशिवाय खरा भारत निर्माण होऊ शकत नाही. याची त्यांना जाणीव होती. विषमतेमुळे समाजातील अस्पृश्य आणि कनिष्ठ जातीचे लोक मानवी अधिकारांपासून वंचित राहतात. आपला विकास करू शकत नाहीत. देशाच्या विकासात गतिरोध निर्माण होतो. म्हणून त्यांना समतेवर आधारलेला भारतीय समाज अपेक्षित होता. संविधान सभेतील  भाषणात डॉ. आंबेडकर म्हणतात, “भारत एक राष्ट्र आहे असा विश्वास बाळगून आम्ही स्वतःला एका मोठ्या भ्रमात ठेवीत आहोत. हजारो जातीत विभाजित जनता एक राष्ट्र कसे होऊ शकते? सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या अजूनही आम्ही एक राष्ट्र नाही; याची आम्हाला जेवढ्या लवकर जाणीव होईल तेवढे ते आमच्या हिताचे ठरेल.

त्यानंतरच एक राष्ट्र होण्याच्या गरजेचे महत्त्व आम्हाला कळेल आणि आमच्या उद्धिष्टपूर्तीसाठी कोणत्या मार्गांचा आणि उपायांचा अवलंब करावा, याचा आम्ही गांभीर्याने विचार करू शकू! या ध्येयाप्रत पोहचणे अतिशय कठीण आहे. अमेरिकेतील लोकांना जेवढे कठीण होते, त्यापेक्षा भारतात अधिक कठीण आहे. अमेरिकेत नव्हत्या, भारतात जाती आहेत. जाती या राष्ट्रविरोधी आहेत. त्या समाजजीवनात विभागणी करतात. त्या राष्ट्रविरोधी आहेत. कारण जाती-जातींमध्ये मत्सर आणि द्वेषभावना निर्माण करतात. बंधुतेशिवाय समता आणि स्वातंत्र्य म्हणजे रंगाच्या वरवरच्या थरांसारखा बाह्य देखावा असेल.”२६ जानेवारी १९५० पासून भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली. परंतु डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत समताधिष्ठित भारत निर्माण होऊ शकला नाही.भारतीय समाजात विषमता रुजविणारी, परंपरेने चालत आलेली, बहुजन समाजाच्या विकासासाठी घातक अशी धार्मिक मूल्ये होती; तर दुसरीकडे भारतीय भूमीत माणुसकीचा विचार पेरणारा बुद्ध धम्म होता. बुद्ध धम्माने भारतीय समाजात समतेचा, बंधुतेचा, मानवी स्वातंत्र्याचा विचार रुजविण्याचे कार्य केले. भारतीय समाजाला उजेडाची दिशा दाखविण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्धाचा धम्म निवडला. बुद्धाचा धम्म हा माणुसकीची शिकवण देणारा बुद्धिवादी धम्म आहे. बुद्ध धम्मामुळे लोक वैचारिक गुलामीतून मुक्त होतील, असा ठाम विश्वास होता. त्यांनी नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी प्रथम स्वत: बुद्ध धम्माचा स्वीकार केला आणि नंतर त्यांनी ५ लाख लोकांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली.  डॉ. आंबेडकरांनी ‘बुद्धिस्ट सेमिनरी’ची संकल्पना मांडली होती. परंतु बुद्ध धम्माच्या स्वीकारानंतर त्यांचे लवकरच महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे  बुद्ध धम्माचे आचरण करण्याच्या संदर्भात संहिता तयार करण्याचे त्यांचे कार्य अधुरे राहिले, हे मात्र खरे!- डॉ. प्रदीप आगलावे,सदस्य सचिव, डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन  समितीpaglave@rediffmail.com

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती