रस्त्यारस्त्यांवर ठाण मांडून बसलेली गुरे, हे दृश्य महाराष्ट्राच्या बहुतांश शहरांमध्ये पावसाळ्यात हमखास दिसते. त्यात एखादा मस्तवाल सांडही असतो. त्याचे ना कोणाशी वैर असते, ना कोणाशीच मैत्री! तो आपल्याच मस्तीत वावरत असतो. मध्येच त्याची लहर फिरली, की कोणालाही ढुशी देतो.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गत काही काळापासून त्या मस्तवाल सांडासारखेच वागू लागले आहेत. कधी त्यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा पुळका येतो, तर कधी ते त्यांच्यावर भडकतात. कधी त्यांना पाकिस्तान दहशतवादाला आश्रय देणारा, अमेरिकेची फसवणूक करणारा, खोटेपणा करणारा भागीदार वाटतो, तर कधी त्यांना पाकिस्तानच्या प्रेमाचे भरते येते. कधी त्यांच्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परममित्र असतात, तर कधी ते त्यांना अमेरिकेविषयी कठोर, अन्यायकारक संबोधतात. युरोपीय देश हे अमेरिकेचे परंपरागत मित्र आहेत; पण हल्ली ट्रम्प यांच्यामुळे त्यांनाही अमेरिकेविषयी विश्वास वाटत नाही. अलीकडेच ट्रम्प यांनी भारताला पुन्हा एकदा ढुशी दिली. भारत-अमेरिका मुक्त व्यापार करारासंदर्भात वाटाघाटी सुरू असतानाच त्यांनी भारतावर १ ऑगस्टपासून २५ टक्के आयात शुल्क आकारण्याचा निर्णय जाहीर केला आणि २ ऑगस्ट उजाडताच एक आठवड्यासाठी निर्णय पुढेही ढकलला! चालू आर्थिक वर्षात भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच जीडीपी वाढीचा दर जगात सर्वाधिक ६.८ टक्के असेल, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेचे म्हणणे आहे.
‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’चा गजर करत पुन्हा जागतिक रंगमंचावर अवतरलेल्या ट्रम्प तात्यांच्या मते मात्र भारत आणि रशियाच्या अर्थव्यवस्था मृतावस्थेत आहेत! ट्रम्प तात्या ही मराठी समाजमाध्यम जगताने त्यांना दिलेली उपाधी! महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात एखाद्या वयस्क आणि जरा विक्षिप्त, तिरसट, पण ठसकेबाजपणे वावरणाऱ्या व्यक्तीस उपरोधाने तात्या संबोधले जाते. ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्षीय कारकिर्दीतील एकूणच वर्तन त्याच पठडीतील वाटल्यामुळे समाजमाध्यमांत सक्रिय मंडळींपैकी कोणी तरी ट्रम्प यांना तात्या संबोधले आणि ती उपाधी त्यांना कायमची चिकटली! खरी गोष्ट ही आहे, की ट्रम्प तात्यांच्या डोळ्यात भारताचे रशियासोबतचे संरक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ आणि ऊर्जा क्षेत्रातील अलीकडील घनिष्ठ सहकार्य खुपत आहे. भारताने स्वतंत्र परराष्ट्र धोरण त्यागून अमेरिकेच्या कच्छपी लागावे, ही त्यांची आंतरिक इच्छा आहे.
भारताने केवळ अमेरिकेकडूनच संरक्षण सामग्री आणि खनिज तेल खरेदी करावे, असे त्यांना वाटते. ते होत नाही म्हणून तात्यांची चिडचिड अन् तिरसटपणा वाढला आहे. भारत सर्वाधिक वेगाने आर्थिक प्रगती करीत असताना, ‘ग्रेट’ अमेरिकेत मात्र महागाई आणि परकीय गुंतवणुकीसंदर्भात अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळेच ट्रम्प तात्या अलीकडेच परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आखाती देशांच्या दौऱ्यावर गेले होते. आज जगभर ट्रम्प तात्यांच्या आयात शुल्क धोरणाची चर्चा होत असली तरी, त्याचा पाया त्यांनी त्यांच्या पहिल्या अध्यक्षीय कारकिर्दीतच घातला होता. तेव्हा अमेरिकेने ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिपमधून अंग काढून घेतले होते, उत्तर अमेरिका मुक्त व्यापार कराराऐवजी नवा करार केला होता, अनेक देशांच्या मालावर जबर आयात शुल्क आकारले होते, त्यातूनच चीनसोबत व्यापारयुद्ध सुरू केले होते आणि भारताचा व्यापारातील विशेष दर्जा समाप्त केला होता.
एखाद्या तात्यांना ज्याप्रमाणे संपूर्ण गावाने आपल्याच मताने वागावे, चालावे असे वाटते, त्याप्रमाणेच ट्रम्प तात्यांनाही अवघ्या जगाने त्यांच्याच मर्जीने वर्तन करावे असे वाटते. जे देश त्यांची मनमानी चालू देत नाहीत, त्यांना मग ते आयात शुल्काची भीती दाखवतात! यापूर्वी १९३० मध्येही अमेरिकेने हा खेळ खेळून बघितला आहे आणि हात पोळूनही घेतले आहेत. तेव्हाही ट्रम्प यांच्याच रिपब्लिकन पक्षाचे हर्बर्ट हूव्हर राष्ट्राध्यक्ष होते. तेव्हा अमेरिकेने स्मूट-हॉले टॅरिफ कायदा पारित करून, २० हजारांपेक्षा जास्त वस्तूंवरील आयात शुल्कात जबर वाढ केली होती. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असे हूव्हर यांना वाटले होते; पण झाले उलटेच! ती एक आर्थिक चूक होती, असे बहुसंख्य अर्थतज्ज्ञ मानतात. ट्रम्प तात्या इतिहासापासून धडा न घेता पुन्हा एकदा त्याच मार्गाने निघाले आहेत!