-कुमार केतकर,
राज्यसभेचे माजी खासदार, ज्येष्ठ पत्रकार
बरोबर १०० वर्षांपूर्वी २६ डिसेंबर १९२५ रोजी ‘अधिकृत’ कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. अधिकृत हा शब्द यासाठी की मानवेंद्रनाथ रॉय (एम. एन. राॅय) यांनी १९२० साली ताश्कंद (आजचे उझबेकीस्तान) येथे त्यांच्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली होती. परंतु, अधिकृत इतिहासानुसार आणि सर्व राजकीय पक्षांनी अधिकृतपणे स्वीकारलेली तारीख २६ डिसेंबर हीच आहे. आणि म्हणूनच पक्षस्थापनेची राष्ट्रीय आणि जागतिक परिस्थिती समजून घ्यायला हवी.१९२५ या वर्षाची अखेर. रशियातील लेनिनप्रणीत कम्युनिस्टांची ‘बोल्शेविक क्रांती’ होऊन फक्त आठ वर्षे झाली होती. या क्रांतीविषयीची माहिती त्याकाळी इंग्लिश वृत्तपत्रांतूनच येत असे. परंतु, भारतातील ब्रिटिश सरकार कम्युनिस्ट चळवळीच्या विरोधात असल्यामुळे वृत्तपत्रांतून येणाऱ्या बातम्या या क्रांतीची, लेनिनची तसेच कम्युनिस्ट विचारसरणीचीही बदनामी करणाऱ्या असत. टिळकांच्या ‘केसरी’मधून मात्र या क्रांतीला संपूर्ण पाठिंबा दिला जात असे. टिळकांचे स्पष्टीकरण सोपे व स्पष्ट होते. ज्याअर्थी ब्रिटिश वृत्तपत्रे आणि इंग्रज सरकार त्या क्रांतीच्या आणि लेनिनच्या विरोधात एवढी प्रखर भूमिका घेतात, याअर्थी नक्कीच त्या क्रांतीला व लेनिन या त्यांच्या नेत्याला विशेष महत्त्व आहे. ते जे काही करत असतील ते ब्रिटिश साम्राज्याला धक्का लावणारे असेल.. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे हेसुद्धा ब्रिटिश वृत्तपत्रे व त्यातील बातम्या व लेखांचा अर्थ, अन्वयार्थ बारकाईने लावत असत. या काळात (म्हणजे १९१५ ते १९२२) भारतात स्वातंत्र्य चळवळ खोलवर रुजत चालली होती. देशात गांधीजींचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत होता. काॅम्रेड डांगेंनी त्या परिस्थितीत ‘गांधी विरुद्ध लेनिन’ हे लहानसे पण महत्त्वाचे पुस्तक लिहिले. तेव्हा डांगेंचे वय फक्त २३ वर्षांचे होते आणि गांधीजींना भारतात येऊन फक्त सात वर्षे झाली होती. त्यावेळेस भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत विविध विचारप्रवाह प्रचलित होते. लोकमान्य टिळकांचा जहाल राष्ट्रवाद, नामदार गोपाळ कृष्ण गोखलेंचा मवाळ राष्ट्रवाद, गोपाळ गणेश आगरकरांचा सुधारक विचार, काही मोजक्या तरुणांचा सशस्त्र लढा देण्याची तयारी करणारा प्रयत्न, हिंदू महासभेचा हिंदू राष्ट्रवाद (या महासभेची स्थापना १९१५ची, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अगोदर १० वर्षे), पण सावरकर तेव्हा तुरुंगात होते.. याखेरीज भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आणखी एक प्रवाह होता तो ब्रिटिशांशी जमवून घ्यावे असे मानणारा! या सगळ्या भारलेल्या वातावरणातल्या तत्कालीन भारतात कम्युनिस्ट विचारसरणी तितकीशी समर्थपणाने पोचलेली नव्हती, तरीही कॉम्रेड डांगेंनी ते पुस्तक लिहिले. एका अर्थाने त्या पुस्तकातूनच भारताला कम्युनिस्ट विचारसरणीची प्राथमिक ओळख झाली, असे म्हणता येईल. एम. एन. राॅय यांनीही ताश्कंदमधून एक पुस्तिका लिहिली होती; पण ती देशभरात फारशी पोचलीच नव्हती.
वस्तुत: कॉम्रेड डांगे यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला हजर राहणे सयुक्तिक होते. पण इंग्रज सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला लावून त्यांना तुरुंगात टाकले होते. ‘कानपूर कट’ म्हणून तो ओळखला जातो. डांगेंनी पक्षस्थापनेची राजकीय-वैचारिक तयारी केलीच होती. त्यामुळे जरी ते पक्षस्थापनेच्या मुहूर्ताला हजर नसले तरी त्यांनाच ‘संस्थापक’ मानले जाते. कानपूर खटला १९२४ चा आणि पक्षाची स्थापना १९२५ मध्ये. याचवर्षी रा. स्व. संघाचीही स्थापना झाली. म्हणजे दोन्ही ‘भगवा व लाल’ रंग एकाच वर्षी भारतीय राजकारणात अवतरले. संघाचा कम्युनिस्ट विचारसरणीला आणि काँग्रेसलाही तीव्र विरोध होता. गांधीजींच्या वाढत्या प्रभावाला आव्हान देण्यासाठी संघ राजकीय रणांगणात उतरला. पण त्यांनी असा पवित्रा घेतला की, आपली संघटना सांस्कृतिक स्तरावरच काम करेल. हिंदू महासभेने मात्र सरळ सरळ राजकीय भूमिका घेतली. दोन्ही संघटना जरी कम्युनिस्ट व काँग्रेसच्या विरोधात हिंदुत्वाचे निशाण घेऊन उतरल्या असल्या तरी त्यांच्यात एकमत नव्हते. कित्येकदा हिंदू महासभा व संघ परस्परांच्या विरोधात असत. सावरकर सुटून आल्यावर तर संघावर टीका करीत असत. पुढे गांधींना आणि काँग्रेसला विरोध करण्यासाठी मात्र संघ आणि सावरकर एकत्र आले. कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी विचारसरणी या गोष्टी समानार्थी मानल्या जात असल्या तरी पूर्णत्वाने त्या तशा नाहीत. एम. एन. राॅय हे स्वतःला त्यावेळेस कट्टर मार्क्सवादी मानत असले तरी त्यांच्या पक्षाला कम्युनिस्ट पक्षाचा अधिकृत दर्जा नाही. पुढे त्यांनी ‘रॅडिकल कम्युनिस्ट’ पक्ष स्थापला. तत्पूर्वीच अधिकृत कम्युनिस्ट पक्षाने त्यांना एकप्रकारे बहिष्कृत केले होते. पण आता ते सर्व वाद बऱ्याचअंशी कालबाह्य झाले आहेत, असो.
कम्युनिस्ट वाङ्मय भारतात येण्यापूर्वीच कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव तत्कालीन भारतातील तरुणांवर पडू लागला होता. अर्थातच, रशियातील कम्युनिस्ट क्रांतीने सबंध जगाच्या राजकारणाला ऐतिहासिक कलाटणी दिली होती. पुढे कम्युनिस्ट विचारसरणीला ‘मार्क्स-लेनिनवादी’ क्रांती असेही संबोधले जाऊ लागले आणि पक्षानेही काही ठिकाणी त्यांच्या नावात ‘मार्क्स-लेनिनवादी कम्युनिस्ट पक्ष’ असा बदलही केला!
असे असले तरी कम्युनिस्टांमध्ये मतभेद होऊन अनेकदा फूट पडली पण मूळ वैचारिक भूमिकेला कुणीही साेडून दिले नाही. मग फूट का पडते? वा पडली? - कारण जगाची संरचना, समाजातील वर्गीय विश्लेषण या मूलभूत संकल्पना समजून घेण्यातच त्यांचे मतभेद होते. स्वाभाविकच त्यांच्या राजकीय डावपेचात फरक पडत गेले आणि फूट अटळ झाली.- कार्ल मार्क्स म्हणत असे- ‘आजवर जगभरच्या विद्वानांनी, तत्त्वज्ञांनी, विचारवंतांनी आपले हे विश्व (सामाजिक, आर्थिक. राजकीय इ.) समजावून घेण्याचे प्रयत्न केले आहेत. ते सर्व महत्त्वाचे असले तरी आपल्यासमोर आव्हान आहे ते जग बदलण्याचे!’ केवळ जग/विश्व/समाज कसा आहे व कसा चालतो हे समजून घेऊन चालणार नाही, तर विचार हवा (व कृती हवी) ती प्रचलित जग बदलण्याची. ते बदलताना कोणत्या मूल्यांना डोळ्यासमोर ठेवून जग बदलायचे? तर समाजात वर्गविरहित (म्हणजे विषमताविरहित वर्ण, वंश, पंथविरहित) असे स्वरूप निर्माण करायचे. समता प्रस्थापित करायची, अन्याय नाहीसा करायचा आणि एक पिळवणूकरहित व सर्जनशील समाजव्यवस्था निर्माण करायची हे मुख्य ध्येय हवे. फ्रेंच राज्यक्रांतीने समता, स्वातंत्र्य, बंधुत्व ही मूल्ये दिली, ती मार्क्सच्या मांडणीच्या अगोदर सुमारे ७० वर्षे. पण त्यात ती समता कशी प्रस्थापित करायची याचे विवेचन नव्हते. फ्रेंच क्रांती भांडवलशाहीविरोधी असण्याचा मुद्दाच नाही. त्याचप्रमाणे ॲडम स्मिथने ‘वेल्थ ऑफ नेशन्स’ हा प्रबंध लिहिला तेव्हा भांडवली व्यवस्था दूर करून समाजवादी/ समतावादी व्यवस्थापन करण्याचा मुद्दा नव्हता. म्हणजेच मार्क्सच्या भाषेत तो जग ‘समजून घेण्याचा’ भाग होता, जग बदलण्याचा नव्हता. म्हणूनच १७७६ ची अमेरिकन ‘क्रांती’, १७८९ची फ्रेंच राज्यक्रांती या भांडवलशाहीविरोधी नव्हत्या. रशियातील कम्युनिस्ट क्रांती ही पहिली अशी ऐतिहासिक घटना आहे की, जिने भांडवलशाही आणि सरंजामशाहीला थेट सशस्त्र आव्हान दिले आणि पहिल्या तडाख्यात भांडवलशाहीवर (उत्पादन व्यवस्था व वितरणाची मालकी व नियंत्रण) थेट हल्ला चढवला.
त्यामुळे जगभरच्या सर्व भांडवलशाही, सरंजामशाही व्यवस्थापनांना आणि वसाहतवादी- साम्राज्यवादाला प्रत्यक्ष आव्हान निर्माण झाले. त्यामुळेच देशात कम्युनिस्ट पक्ष उखडण्याचे प्रयत्न सुरू झाले. कानपूर राजद्राेहाचा खटला (१९२४), मीरत कटाचा खटला (१९२९) त्या साम्राज्यवादी धोरणाचा भाग होता. रशियन क्रांतीचा धसका जगभरच्या भांडवलशाहीने घेतला होता आणि तीच क्रांती भारतीय कम्युनिस्ट चळवळीचे प्रेरणास्थान झाली होती. मतभेद होते ‘जग समजून घेण्यात’; ध्येय अगर उद्दिष्टात मतभेद कधीच नव्हते, आजही नाहीत. पक्षाची पीछेहाट झाली आहे- विचारसरणीची नाही. ती होणारही नाही. ketkarkumar@gmail.com (यदू जोशी यांचा साप्ताहिक स्तंभ उद्याच्या अंकात)
Web Summary : The Indian communist movement, inspired by Marx and Lenin, fought against inequality. Despite splits, the core ideology endures. The party's decline doesn't mean its ideals are dead.
Web Summary : मार्क्स और लेनिन से प्रेरित भारतीय कम्युनिस्ट आंदोलन ने असमानता के खिलाफ लड़ाई लड़ी। विभाजन के बावजूद, मूल विचारधारा कायम है। पार्टी का पतन इसके आदर्शों के खात्मे का मतलब नहीं है।