शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

सोनिया गांधींबाबत कृतज्ञता

By admin | Updated: May 24, 2014 18:24 IST

सोनिया गांधी यांनी त्यांच्या काँग्रेसाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ करणे आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांचे अनुकरण करणे हे जेवढे स्वाभाविक

- कमलाकर धारप

लोकसभेच्या निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वत:कडे घेऊन सोनिया गांधी यांनी त्यांच्या काँग्रेसाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ करणे आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांचे अनुकरण करणे हे जेवढे स्वाभाविक व समजण्याजोगे, तेवढेच त्या दोघांना त्यांचे राजीनामे परत घ्यायला लावण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाने एकत्र येणे हेही स्वाभाविक होते. १९९९ ते २००४ या काळात काँग्रेस पक्षाची संपूर्ण वाताहत झाली होती. केंद्र हातून गेले होते आणि निम्म्या राज्यांतही त्याची सत्ता राहिली नव्हती. सार्‍यांनी त्यांची मनधरणी केल्यानंतर व कार्यकर्त्यांच्या आग्रहापुढे नाईलाज झाल्यानंतर सोनिया गांधींनी पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर त्यांनी महागाईच्या प्रश्नावर दिल्लीत प्रचंड मोर्चा काढला. त्याच्या स्वागताला व त्याला उत्तर द्यायला प्रत्यक्ष पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे त्यांच्या मंत्रिमंडळातील प्रमुख सहकार्‍यांसोबत रस्त्यावर आले होते. त्या वेळी त्या दोघांत झालेला वाद देशाने ऐकला आणि सोनिया गांधींचे नेतृत्व नुसते सक्षमच नाही, तर सामर्थ्यशाली आहे, याची देशाला खात्री पटली. जनतेच्या या विश्वासाच्या बळावरच सोनिया गांधींनी सार्‍या देशात पुन्हा एकवार पक्षाची उभारणी केली आणि २००४ची लोकसभेची निवडणूक त्या बळावर सार्‍यांची भविष्ये बाजूला सारून त्यांनी जिंकली व सत्तेबाहेर गेलेला आपला पक्ष सत्तेवर आणला. अनेक लहान मित्र पक्षांना एकत्र केले व संयुक्त पुरोगामी आघाडी स्थापन करून तिच्या हाती देशाची सत्ता दिली. त्या वेळी त्यांच्या पक्षाने, आघाडीने व देशानेही त्यांना आपले पंतप्रधानपद एकमुखाने देऊ केले. परंतु, त्यांनी पंतप्रधानपदाचा त्याग केला व ते पद डॉ. मनमोहनसिंगांना दिले. हे करायला फार मोठे मन व वृत्ती लागत असते. ज्या आघाडीचे सरकार नंतरची दहा वर्षे डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वात सत्तेवर राहिले, तिचे अध्यक्षपद सोनिया गांधींनीच समर्थपणे सांभाळले. २००९ची निवडणूकही त्यांनी सार्‍यांचे अंदाज चुकवीत याच हिमतीने जिंकली व देशावर तब्बल १० वर्षे काँग्रेसची सत्ता राखली. ही सत्ता देशाचे आर्थिक बळ, लष्करी सामर्थ्य आणि वैज्ञानिक क्षेत्रात त्याचे वजन वाढविणारी ठरली. देशाच्या आर्थिक विकासाचा दर जगातील लोकशाही देशात पहिल्या क्रमांकाचा झाला. १९९१ ते २०१४ या काळात देशाची संपत्ती चार पटींनी वाढली. पाच टक्क्यांचा मध्यमवर्ग ४० टक्क्यांवर गेला, एक कोटी टेलिफोनधारकांची संख्या ८० कोटींवर गेली. त्यांचे अपयश एवढेच, की त्यांच्या नेतृत्वात झालेल्या या विकासाची खरी ओळख जनतेपर्यंत पोहोचविण्यात व ती तिच्या गळी उतरविण्यात त्यांच्या नेतृत्वाला व पक्षाला यश आले नाही. मागेल त्याला काम, रोजंदारीच्या दरात अभूतपूर्व वाढ, शिक्षणाच्या संधीची मुबलकता आणि समाजाच्या अंगावर एकूणच दिसू लागलेली समृद्धी याही बाबी त्या पक्षाला लोकांना नीट सांगता आल्या नाहीत. याउलट, सरकारातील काही मंत्र्यांनी व अधिकार्‍यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या बातम्या या काळात मोठ्या झाल्या, माध्यमे विरोधात गेली, न्यायालये साशंक बनली आणि विरोधक त्यातल्या प्रत्येक गोष्टीचे हत्यार बनवून त्यांच्या एकाकी नेतृत्वावर प्रहार करीत राहिले. त्यांचे दुसरे दुर्दैव हे, की त्यांची बाजू प्रभावीपणे जनतेसमोर मांडणारे प्रवक्ते त्यांच्याजवळ नव्हते. या स्थितीत झालेल्या पक्षाच्या पराभवानंतर त्यांनी देऊ केलेला अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांच्या पक्षाने नाकारला असेल, तर तो त्याच्या मानभावीपणाचा भाग न मानता खर्‍याखुर्‍या कृतज्ञतेचा आविष्कार मानला पाहिजे. दोन निवडणुकांत विजय मिळविणार्‍या नेत्याचे नेतृत्व एका निवडणुकीत पराभूत झाले म्हणून त्याला बाजूला सारणे हा एरवी कृतघ्नपणाचा भाग झाला असता. भाजपानेही लालकृष्ण अडवाणींना आता बाजूला सारले आहे. मात्र, त्यांच्या नेतृत्वात त्या पक्षाला दोनदा पराभव अनुभवावा लागला आहे. राजकारणात नेतृत्वबदल होणे ही एक अपरिहार्य, अवघड, पण आवश्यक बाब आहे. मात्र, तिचा वापर पुरेशा समंजसपणेच होणे आवश्यक आहे व तसा तो झाला आहे. सोनिया गांधींनी व काँग्रेस पक्षाने आपल्या नेतृत्वाची धुरा आता राहुल गांधींकडे सोपविली आहे. परवाच्या पराभवानंतरही पक्ष राहुल गांधींच्या मागे ठामपणे उभा आहे. काँग्रेस पक्ष पराभवाचा धक्का सहन करू शकणार नाही व तो तुटेल अशी भीती अनेकांना वाटली, तर विरोधकांनी तशी अपेक्षा बोलूनही दाखविली होती. प्रत्यक्षात तसे काही झाले नाही आणि पक्षातील नवे व जुने कार्यकर्ते सोनिया गांधींच्या व राहुल गांधींच्या नेतृत्वासोबतच राहिलेले देशाला दिसले. पक्षातील आताची राजकीय एकजूट हीदेखील सोनिया गांधींनीच त्याला दिलेली देणगी आहे. सव्वाशे वर्षांचा व स्वातंत्र्य लढ्याची उज्ज्वल परंपरा लाभलेला काँग्रेस पक्ष ज्यांच्या परिश्रमाने गेली दहा वर्षे सत्तेवर राहिला, त्या सोनिया गांधी आता सत्तेवरून पायउतार झाल्या आहेत. मात्र, आपले उर्वरित आयुष्य पक्ष व देश यांची सेवा करण्यातच त्या घालविणार आहेत. काही मूर्ख माणसांनी त्या इटलीला जातील, असा अत्यंत अभद्र प्रचार निवडणुकीच्या काळात केला. तो करणार्‍यांची तोंडे लोकांनी बंदही केली. आता त्या सार्‍यांना सोनिया गांधींच्या कृतीतूनच खरे उत्तर मिळणार आहे. आजवर देशाची सेवा केलेल्या व त्याला समृद्धी प्राप्त करून दिलेल्या या नेतृत्वाचे मार्गदर्शन यापुढेही देशाला लाभावे ही अपेक्षा.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)