- अमेय गोगटे। डेप्युटी एडिटर, लोकमत डॉट कॉमआजचा जमाना ‘होऊ दे व्हायरल’चा आहे. आपण सगळे सोशल मीडियाला इतके शरण गेलेलो आहोत की तिथे जे वाचतो, पाहतो ते आपल्याला खरं वाटू लागतं, अशी परिस्थिती आहे. आपला हा ‘सोशल कनेक्ट’ पाहूनच राजकीय पक्षांनी ‘पॉलिटिकल व्हायरल लीग’ सुरू केलीय. आता इंडियन प्रीमिअर लीग सुरू असताना अचानक ही लीग आठवण्यामागे कारणही तसंच आहे.
नुकत्याच झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात २५ विधेयकं मंजूर करण्यात आली. त्यापैकी कृषी विधेयकांवरून बराच गदारोळ झाला. उपसभापतींचा माइक तोडण्यापर्यंत प्रकरण गेलं. त्यानंतर निलंबनाची कारवाई, खासदारांचं उपोषण, केंद्र्र सरकारचा निषेध, असंवैधानिक पद्धतीने शेतकरीविरोधी कायदा केल्याचा आरोप, राष्ट्रपतींना निवेदन अशा घडामोडीही चर्चेत राहिल्या. पण, या दरम्यान दोन व्हिडिओ ‘व्हायरल’ झाले. एक काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचा, तर दुसरा भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांचा. ते कुणी व्हायरल केले हे सुज्ञ वाचकांना वेगळं सांगायची गरज नाही. ज्या कृषी विधेयकांना काँग्रेसनं या अधिवेशनात विरोध केला, त्यांचंच कौतुक कपिल सिब्बल यांनी सत्तेत असताना केलं होतं, असं एका व्हिडिओत दिसतं. याउलट, तेव्हा विरोधी बाकांवर असलेल्या सुषमा स्वराज यांनी या विधेयकातील तरतुदी शेतकऱ्यांसाठी, ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी कशा धोक्याच्या आहेत, हे पटवून दिलं होतं, याकडे दुसरा व्हिडिओ लक्ष वेधतो.
विरोधासाठी विरोध न करता चांगल्या गोष्टींचं, निर्णयांचं मोठ्या मनाने स्वागत केलं तर बाकं बदलल्यावर असे यू-टर्न घ्यावे लागणार नाहीत, हे सगळ्यांनीच समजून घ्यायची गरज आहे. नाहीतर मग, ‘लाव रे तो व्हिडिओ’ आहेच!दुसºया दोन व्हिडिओंमधली एक सकारात्मक बाजू म्हणजे ‘महत्त्वाच्या विषयावर झालेली चर्चा’. लोकशाहीत ती खूप महत्त्वाची आहे. प्रगल्भ चर्चा होणं, त्यातून प्रश्न सुटणं - मार्ग निघणं या गोष्टी व्हायला हव्यात. पण दुर्दैवानं, ही चर्चा निकोप आहे का, असा विचारही मनात येतो. नुसतेच हल्ले-प्रतिहल्ले, टोले-टोमणे यातच आपण रमतोय की काय, असंही वाटतं. ‘हमने तुमको सिर्फ दो मारा, पर क्या सॉल्लिड मारा ना’, असं म्हणत स्वत:वरच खूश व्हायचं का, याचा विचार नेत्यांनीही करायला हवा आणि जनतेनंही. कटुता निर्माण होऊ न देता सामंजस्याने चर्चा करणं आणि तोडगा शोधणं ही आजची सगळ्यात मोठी गरज आहे.