शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

गायकी आणि व्यक्तिमत्त्व याची भुरळ पाडणारे स्वरराज जसराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 04:27 IST

अद्याप खूप काही करायचे आहे. पण...

-जानेवारीत पंडित जसराज यांचा ९० वा वाढदिवस झाला. तेव्हा मिर्झा गालिब यांच्या ‘हजारो ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले’ या ओळी ऐकवून पंडित जसराज म्हणाले होते की, वय हा केवळ आकडा असतो. अद्याप खूप काही करायचे आहे. पण...संगीत हा सर्वांच्याच आवडीचा विषय असतो. चित्रपट संगीत, भावगीत, भक्तिगीत यांत रस असणारे कोट्यवधी असतात; पण शास्त्रीय संगीत हा सर्वांना आपल्या आटोक्यातील वाटत नाही. राग, खयाल, ठुमरी या अशा समजण्यास अवघड गोष्टींमध्ये शिरण्याचा फारसा प्रयत्न अनेकजण करीत नाहीत. त्यामुळेच शास्त्रीय संगीताचा कान सर्वांना असूच शकत नाही; पण शास्त्रीय संगीताला वाहून घेतलेल्या अनेक दिग्गजांनी अत्यंत सोप्या पद्धतीने त्याची मांडणी केली. अभंग आणि भक्तिसंगीतात ते अशाप्रकारे घोळविले की सामान्य रसिकही त्याकडे आकर्षित झाले.

शास्त्रीय संगीताच्या विविध घराण्यांचे बडे गायक सुगम संगीताकडे कमअस्सल म्हणून पाहात, त्या काळात सामान्यांना वेगळ्या प्रकारे भारतीय अभिजात संगीताचे माहात्म्य पटवून देणारी जी मंडळी होती, त्यात संगीत मार्तंड पंडित जसराज यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्यामुळेच त्यांच्या निधनाने सामान्य संगीत रसिकांनाही चटका बसला. गेले काही महिने ते अमेरिकेत होते आणि कोरोना संसर्गामुळे घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे त्यांना भारतात परतणे शक्य झाले नाही. आता येणार आहे पार्थिवच. कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी अशा अनेक दिग्गजांनी भारतीय शास्त्रीय संगीताला शिखरावर नेलेआणि त्यात अनेक प्रयोग केले. या नावांत पंडित जसराज यांचा उल्लेख करावाच लागेल. अतिशय सात्त्विक, राजबिंडा, शांत व हसरा चेहराआणि लोभस व्यक्तिमत्त्व हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांची गायकी आणि व्यक्तिमत्त्व याची भुरळ पडल्याशिवाय राहात नसे. असंख्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले; पण पुरस्कारांपेक्षा आपण हिंदुस्थानी संगीत सामान्यांपर्यंत पोहोचवू शकलो. देश-विदेशांतहजारो उत्तम गायक तयार करू शकलो, याचा पंडितजींना खूप आनंद असे. चित्रपट संगीताकडे ते क्वचितच वळले. मोजकी चार गाणी आहेत त्यांची; पण अभंग आणि भक्तिगीतांद्वारे त्यांनी शास्त्रीय संगीताचा सामान्यांना लळा लावला. त्यांच्या ३०० हून अधिक बंदिश आहेत. ख्याल आणि ठुमरी यांचे आगळे-वेगळे मिश्रण सादर केले. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या रागांची जुगलबंदी सादर करून त्यांनी नवा पायंडा पाडला. त्यांची एक जुगलबंदी तर तब्बल सहा तास चालली आणि उपस्थित रसिकांसाठी ती पर्वणीच होती; पण त्यांचे भक्तिसंगीतावर विशेष प्रेम होते. स्वत: आध्यात्मिक असल्याचा तो परिणाम असेल. त्यांचे हवेली संगीतही अत्यंत लोकप्रिय झाले.
कृष्णभक्तीचे अनेक अभंग आणि रचना यांचे अल्बम अनेकांनी घरांत जपून ठेवले आहेत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला आध्यात्मिक अंग आहे. त्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचणे शक्य आहे, असे ते म्हणत. ते अनेकदा चित्रपट संगीतही मनापासून ऐकत. ज्येष्ठ गझल गायक जगजीत सिंह यांची, ‘सरकती जाये हैं रुख से नकाब आहिस्ता, आहिस्ता’ ही गझल त्यांना खूप आवडत. त्यांचा मित्र आणि शिष्यपरिवार अफाट होता आणि आहे. अगदी अमेरिका, कॅनडा, ब्रिटन अशा अनेक देशांतही शिष्य आहेत. एरवी प्रेमळ असलेले पंडितजी शिष्यांकडून रियाज करून घेताना मात्र शिस्तप्रिय असत. तालमीत पक्का झालेल्या शिष्याला ते आपल्यासह मैफलीत बसवत. अमेरिकेतही त्यांनी संगीत संस्था सुरू केली होती. ती पाहून, मलाही आता इथे शिकावेसे वाटते आहे, असे उद्गार आशा भोसले यांनी काढले होते. पंडितजींच्या मैफलीची सुरुवात आणि अखेर ‘जय हो’ने होत होती. अंटार्क्टिका येथील त्यांची मैफलही गाजली. पंडितजींनी अनेक संस्थांच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम केले, त्याचा गवगवाहीकधी केला नाही. नेपाळच्या नरेशांसमोर १९५२ मध्ये त्यांची मैफल झाली होती. तेव्हा नरेशांनी त्यांना १०० मोहरा दिल्या. तेव्हा पंडितजी गडबडून गेले होते. त्यानंतर खूप पैसा, सन्मान मिळाला; पण आपले कार्य अद्याप पूर्ण झालेले नाही, असे त्यांना वाटत असे. तसे त्यांनी बोलूनही दाखविले होते. कार्य पूर्णत्वाला येण्याआधीच त्यांनी आयुष्याच्या मैफलीत ‘भैरवी’ गायली. त्यांच्या सुरांच्या देणगीने श्रीमंत झालेले कोट्यवधी चाहते ही स्वरांची दौलत पुढील कैक वर्षे सांभाळतील यात शंकाच नाही.