दिल्लीतल्या छत्रसाल स्टेडियमच्या वाहनतळावर झालेल्या बेदम हाणामारीत उगवत्या राष्ट्रीय पहिलवानाचा मृत्यू होतो... या घटनेनंतर गुणवंत पहिलवान सुशील कुमार फरार होतो. हा पहिलवान साधासुधा नव्हे. देशात आजवर कोणालाही न जमलेली कामगिरी करणारा हा पहिलवान आहे. होय, सुशीलने दोन ऑलिम्पिक पदके जिंकून आणली आहेत. त्यामुळेच खुनासारख्या हिणकस गुन्ह्याशी त्याचे नाव जोडले गेल्याने क्रीडाप्रेमींना धक्का बसणे स्वाभाविक होते. टोकियो-२०२१ ऑलिम्पिक स्पर्धेचे बिगूल वाजले असतानाच खुनाच्या आरोपात अडकल्याने सुशीलचे ‘करिअर’ कायमचे संपले आहे. नजफगडचा हा ‘हरियाणवी छोरा’ स्वत:च्या हिमतीवर, कष्टाने एकेक पायरी चढत अल्पावधीत ‘इंटरनॅशनल रेसलर’ बनला होता. एकेकाळी आशिया गाजवलेला सत्पालसिंगसारखा पहिलवानसुद्धा सुशीलची गुणवत्ता पाहून त्याच्या प्रेमात पडला आणि स्वत:ची मल्लविद्या तर त्याला दिलीच, शिवाय स्वत:ची मुलगीही त्याला दिली. सुशील हा कुस्ती मारण्यासाठी धोका पत्करण्याची तयारी ठेवणारा पहिलवान म्हणून ओळखला जात होता. पण, हा धोका पत्करतानासुद्धा त्याने बेधुंद हाराकिरी कधी केली नाही. मग आखाड्याबाहेरच्या आयुष्यातच त्याने अशी कशी काय पाठ टेकली, हा प्रश्न कुस्तीक्षेत्राला पडला आहे.मुळात, खेळासारख्या तन-मन प्रसन्न करणाऱ्या प्रकारात गुन्हेगारीवृत्ती शिरते कुठून? खरे तर आजच्या व्यावसायिक क्रीडा जगताने निवृत्त खेळाडूंना प्रशिक्षण, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा साहित्य विक्री, समालोचन, संघटनात्मक कार्य असे अनेक मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. यात प्रत्येकाला गती असतेच असे नाही. अशावेळी स्वत:चा काळ ओसरल्यानंतर, निरलसपणे बाजूला होऊन ‘प्रेक्षक’ होण्याची परिपक्वता भलेभले दाखवू शकत नाहीत. मैदानात असताना मिळणारी प्रसिद्धी, पैसा, ग्लॅमरची चमक अचानक ओसरते तेव्हा ते सहन होत नाही. अशावेळी अंगभूत दबून राहिलेली विकृती डोके वर काढण्याची भीती असते. सुशील कुमार या विकृतीचा बळी असावा. दिल्लीतल्या ‘गँगस्टर’शी त्याचे असणारे संबंध समोर येत आहेत. हे गँगस्टर म्हणजे कोणीफार मोठे स्मगलर, देशद्रोही नाहीत. स्थानिक गुंडगिरीशी सुशील संबंध राखून होता. बहुतेक ठिकाणी हेच दिसते. आखाड्यातून बाहेर पडलेले अनेक पहिलवान कोणाच्या तरी आशीर्वादाने दमदाटीच्या उद्योगात अडकलेले असतात. जे अधिक चलाख असतात ते स्वत:च गुंडांचे नेतृत्व करू लागतात, काही ‘पुढारी’ही होतात.
सुशील कुमारने कुस्तीत मस्ती केली असेल तर ती जिरलीच पाहिजे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 06:16 IST