शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

एका गूढ रहस्याच्या अनाम मृत्यूची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 07:51 IST

गुरुनाथ नाईक यांच्या मृत्यूची बातमी ऐकून त्यांच्या रहस्यकथांनी भारावलेल्या  वाचकांच्या गळ्यात आवंढा येईल, हीच या प्रतिभावान लेखकाची अंतिम कमाई!

- सद्गुरू पाटील, निवासी संपादक, लोकमत गोवा

वाचकप्रियता मिळवलेल्या अनेक लेखक आणि गीतकारांना अनुल्लेखाने मारण्याची एक अतीव  अनुचित परंपरा मराठी साहित्य विश्वात आहे. त्या परंपरेचे बळी  ठरलेल्यांची यादी करायची तर अग्र-उल्लेखाचा मान ज्यांना द्यावा लागेल असे गुरुनाथ नाईक. गुरुनाथ अखेर गेले आणि सुरेश भट म्हणायचे त्याप्रमाणे उपेक्षेच्या  अरण्यातून मृत्यूनेच त्यांची सुटका केली. बाबूराव अर्नाळकरांचा वारसा त्यांच्या इतक्याच ताकदीने चालवून हजारो वाचकांवर आपल्या रहस्य-प्रतिभेचे गारुड घालणारा हा लेखक वृत्तीने आणि स्वभावाने कलंदर आणि भटक्या. पण, आपल्या लेखणीच्या प्रतिभेचा व्यवसाय करता येतो हे त्यांनी जाणले आणि अशक्य वाटाव्या अशा वेगाने रहस्यकथा - कादंबऱ्या प्रसवून कथामालांची बहार उडवून दिली.  तब्बल १२०० पुस्तके या लेखकाच्या नावावर आहेत हा तपशील नाईक यांच्या मृत्यूच्या बातमीत वाचून आजच्या (संथ) लेखकांच्या तोंडचे पाणी पळाले असण्याचीच शक्यता अधिक! अतीव गूढ अशी शैली, वाचक-रंजनाच्या अन्य सर्व क्लृप्त्या अवगत असलेली लेखणी आणि एकामागोमाग एक पात्रे जन्माला घालण्याची अफाट क्षमता  ही नाईक यांची वैशिष्ट्ये! समीक्षक आपल्या लेखनाबाबत काय म्हणतात याची दाखल घ्यायला मुळात वेळच मिळू नये असे भन्नाट प्रसवक्षम प्रतिभेचे वरदान त्यांना लाभले होते.

१९७० व ८० च्या दशकांचा काळ हा गुरुनाथ नाईक यांच्यासाठी अत्यंत बहराचा होता. युवा वाचकांसाठी रहस्यकथांच्या मेजवानीचा तो काळ! गुरुनाथ नाईक यांच्या नावाचे गारुड वाचकांच्या मनावर झाले होते. इंटरनेट पूर्व काळात वाचकांच्या एकूणच कल्पनाशक्तीला किती मर्यादा असणार, याची कल्पना आताच्या पिढीला करता येणे निव्वळ अशक्यच! म्हणून तर रिकाम्या दुपारी किंवा मध्यरात्रीनंतरच्या प्रहरांना अर्थपूर्णता देण्यासाठी  गुरुनाथ नाईक यांच्या पात्रांच्या सहवासाने गुंगावलेल्या वाचकांची पिढीच्या पिढी घडली. आम्ही प्रारंभी उभे-आडवे काहीही वाचायचो, त्या काळी गुरुनाथ नाईक, अर्नाळकर वगैरे वाचतच दिवस सुखाने घालवले असे हजारो पौढ किंवा वृद्ध वाचक आज सांगतात. मोबाईल नसलेल्या त्या काळात गुरुनाथ नाईक यांनी मराठी वाचकाला पुस्तकांमध्ये खिळवून व गुंतवून ठेवले हे कधी विसरता येणार नाही. बाकीच्या साहित्य व्यवहारात काय चालले आहे याच्याशी या वाचकांना घेणे नव्हते आणि जोवर पुस्तके विकली जात आहेत, तोवर आपल्याला अन्य मानमरातब मिळत आहेत की नाहीत हे पाहायला गुरुनाथ नाईक यांनाही खरेतर वेळ नव्हता. ते आणि त्यांनी निर्माण केलेल्या पात्रांवर वेड्यासारखे प्रेम करणारे वाचक यांची एक खास वेगळी दुनियाच जणू होती! गुरुनाथ नाईक हे मूळचे गोव्याचे आणि मुळातले  पत्रकार. गोव्यातले  ज्येष्ठ पत्रकार जयंत संभाजी, इब्राहिम अफगाण आदी अनेकांनी नाईक यांना त्या काळात जवळून पाहिले होते. संभाजी सांगतात, गुरुनाथ हे चाळीस वर्षांपूर्वी प्रचंड लिहायचे. खोलीत अनेक तास स्वत:ला कोंडून घेऊन  लिहायचे. लेखनिकही ठेवायचे. महिन्याला पाच-सहा कादंबऱ्या प्रसिद्ध करण्याचा अचाट वेग आणि तेवढी तगडी वाचकप्रियता या माणसाने कमावली होती.  इतके विपुल  लेखन करणारा दुसरा गोमंतकीय लेखक नाही. खरेतर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळावे असे राज्य त्यांनी वाचकमनावर केले. पण, सन्मानाच्या अशा खुर्च्या कधीही त्यांच्या नशिबी आल्या नाहीत.  रहस्यकथांचा साहित्य प्रकार त्यादृष्टीने उपेक्षित राहिला. रहस्यकथांच्या आकर्षणाचा काळ ओसरल्यानंतर नाईक नावाचा वृक्षही निष्पर्ण होत गेला.

आयुष्यभर मुशाफिरी करून, टोकाचे वैभव आणि तितक्याच टोकाची हलाखी अनुभवून आयुष्याच्या अखेरीस गुरुनाथ गोव्यात परतले. त्यांना  स्थैर्य असे लाभलेच नाही. आर्थिक विपन्नावस्था ओढवली.  वयपरत्वे आरोग्याची हेळसांड झाली. एकेकाळी हा लेखक खरोखर सेलेब्रिटी होता का, असा प्रश्न नव्या पिढीला पडावा एवढी विचित्र स्थिती नाईक यांच्या वाट्याला आली होती. ते गोव्यात परतले तेव्हा त्यांना घर नव्हते. पर्रीकरांच्या पुढाकाराने त्यांना गोव्यात घर मिळाले. पण, ते तेवढेच!  उपेक्षा आणि हलाखीच नाईक यांच्या वाट्याला आली! व्यासंगी वाचक व नाईक यांचे मित्र इब्राहिम अफगाण म्हणतात त्याप्रमाणे गुरुनाथ जर विदेशात जन्मले असते तर जीवंतपणीच त्यांचे मोठे स्मारक तयार झाले असते. गुरुनाथ नाईक यांच्या मृत्यूची बातमी ऐकून ऐन तारुण्यात त्यांच्या साहस-रहस्यकथांनी भारावलेल्या  आणि  आज उतारवयात असलेल्या वाचकांच्या गळ्यात आवंढा येईल, हीच या प्रतिभावान लेखकाची अंतिम कमाई!