शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
3
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
4
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
5
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
6
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
7
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
8
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
9
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
10
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
11
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
12
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
13
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
14
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
15
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
16
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
17
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
18
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
19
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
20
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड

बंधमुक्ता!

By admin | Updated: February 2, 2016 03:08 IST

नागपुरातील एका मंदिरात महिलाना प्रवेश नव्हता. प्रवेशबंदीचा फलक तिथे ठळकपणे दिसायचा. ‘वर्षानुवर्षांपासूनची ही परंपरा आहे, ती कशाला तोडायची, उगाच देव नाराज होईल

नागपुरातील एका मंदिरात महिलाना प्रवेश नव्हता. प्रवेशबंदीचा फलक तिथे ठळकपणे दिसायचा. ‘वर्षानुवर्षांपासूनची ही परंपरा आहे, ती कशाला तोडायची, उगाच देव नाराज होईल’! या अंधश्रद्धेतून मतलबी पुरुष बायकोला रस्त्यात उभे ठेवून एकटेच मंदिरात जायचे आणि शेंदूर फासून परत यायचे. कार्यक्रमानिमित्त तिथे गेलेला उमेशबाबू चौबे हा ज्येष्ठ कार्यकर्ता या घृणास्पद प्रकाराने व्यथित झाला. उमेशबाबूंनी या घाणेरड्या प्रथेविरुद्ध आंदोलन उभारले. आता या मंदिरात स्त्रियासुद्धा जातात. एक विचार मनाला स्पर्शून जातो, ‘शनीच्या चौथऱ्यावर महिलांनाही प्रवेश मिळावा, यासाठी कुणी पुरुष पुढाकार का घेत नाही, त्यांच्या आंदोलनात खांद्याला खांदा लावून उभा का राहात नाही’?शनिशिंगणापूरचे आंदोलन केवळ पूजाअर्चेचा अधिकार मिळावा यासाठी महिला करीत नाहीत. तो विषय स्त्रियांच्या सबलीकरणाचा आहे. त्यांना पुरुषांच्या बरोबरीने धर्माधिकार देण्याचा आहे. महिलांनी मंदिरात जायचे की नाही, हे त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य आहे. पण ती केवळ स्त्री आहे म्हणून तिचा हक्क नाकारणे हा तिच्यावरील अन्याय आहे. हा प्रश्न सांकेतिकही नाही, तो सैद्धांतिक आहे. तो सोडविण्यासाठी पुरुषांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. या देशात महिलांच्या उद्धाराचे आरंभीचे कार्य पुरुषांनीच सुरू केले. महात्मा गांधी, जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजा राममोहन राय या महापुरुषांनी महिलांच्या सबलीकरणाची चळवळ फार पुढे नेली. भारतातील सामाजिक चळवळीचा हा प्रेरक इतिहास असताना शनिशिंगणापूरच्या वेशीवर या महिला एकाकी लढतात आणि मर्द म्हणवून घेणारे पुरुष घरात निर्लज्जपणे शांत बसतात, हा आपल्या साऱ्यांचाच सामाजिक पराभव आहे. एरवी मानवी हक्कांसाठी बेंबीच्या देठापासून ओरडणारे, विदेशी अनुदानावर पोट भरणारे पोटार्थी स्वयंसेवी अशा वेळी कुठल्या बिळात लपून बसतात, कळायला मार्ग नाही. स्त्रीमुक्तीच्या पंचतारांकित गप्पा मारणाऱ्या शोभा आणि शबानाही अचानक गायब झालेल्या दिसतात. जातिधर्माच्या मतांसाठी लाचार झालेले राजकीय नेतेही याबद्दल चकार शब्द काढत नाहीत. अशा निराशेच्या वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिशिंगणापुरात आंदोलन करीत असलेल्या महिलांना पाठिंबा देतात आणि स्त्री-पुरुष भेदभाव करू नये, असे खडेबोल सुनावतात, तेव्हा खऱ्या अर्थाने पुरोगामी असलेल्या या मुख्यमंत्र्यांची कळकळ लक्षात येते. शनीच्या चौथऱ्यावर या महिलांना जायचे आहे म्हणजे त्यांना तिथे पूजा करायची नसून घटनेने माणूस म्हणून दिलेल्या हक्कांचे संरक्षण करायचे आहे. ‘महिलांना चौथऱ्यावर जाऊन काय मिळणार’? असे बाष्कळ विधान एका शंकराचार्यांनी केले. ‘ज्या स्त्रीची तुम्ही अशी अवहेलना करता, त्याच स्त्रीच्या पोटी तुम्ही जन्म घेतला आहे. हा निर्लज्जपणा करून तुम्ही मातृत्वाचाही अपमान करीत आहात’, असे या शंकराचार्यांना कुणी खडसावून का सांगत नाही? ‘एक गाव-एक विहीर, एक स्मशानभूमी’ अशी घोषणा देत समताधिष्ठित चळवळीला बळ देऊ पाहणारे सरसंघचालक मोहन भागवत या धगधगत्या प्रश्नात स्पष्ट भूमिका का घेत नाहीत? प्रश्न एकट्या शनिशिंगणापूरचा नाही. आपल्या गाव परिसरातील प्रत्येक धार्मिक स्थळी स्त्रीला प्रवेश मिळायलाच हवा, हाच आग्रह असला पाहिजे. शनीच्या चौथऱ्यावरील प्रवेशासाठी लढणाऱ्या महिलांच्या पाठीशी आपण उभे राहिलो तर शनीदेव कोपतील, आपल्या धर्माचे काय होईल, अशी भीती बाळगणाऱ्या घाबरट पुरुषांकडून अशा कुठल्याही क्रांतीची अपेक्षा नाही. पण ‘ज्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश नाही तिथे मी जाणार नाही, त्या देवाच्या पायावर डोकेही ठेवणार नाही’, अशी शपथ घेण्याची हिंमत किती जणांमध्ये आहे? अंधश्रद्धेचे जोखड मानगुटीवरून उतरवायला समाज तयार होत नाही. पण सभोवताली अशी काही जळमटं आहेत, तेथील परंपरेची कडे तोडण्यासाठी शनिशिंगणापूरचा लढा प्रेरक आहे. या आंदोलनाकडे त्याच दृष्टिकोनातून बघायला हवे. तसे झाले तरच बुरसटलेल्या परंपरा बंधमुक्त होतील. अशा ‘बंधमुक्ता’ गावागावात जन्मास येण्याची गरज आहे. या सामाजिक क्रांतीचा तोच खरा बोध आहे.- गजानन जानभोर