राजेंद्र दर्डा, एडिटर इन चीफ, लोकमत वृत्तसमूह
‘वडिलांची कीर्ती’ सांगणाऱ्या मुलांना समर्थ रामदासांनी खडे बोल सुनावले आहेत हे खरे; पण ही शिक्षा त्यांनी दिली आहे ती स्वत: काही न करता केवळ वडिलांच्या पुण्याईवर अवघ्या आयुष्याचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या मुलांसाठी. आमच्या वडिलांनी- ‘लोकमत’चे संस्थापक, संपादक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जवाहरलाल दर्डा यांनी तशी काही शक्यताच ठेवली नव्हती. त्यांनी आम्हा मुलांच्या स्वप्नांना आकाश दिले, महत्त्वाकांक्षेला आव्हाने दिली, स्वप्ने पाहण्याची हिंंमत आणि ती साकार करण्यासाठी लागणारी शस्त्रे-साधने कशी मिळवावीत, टिकवावीत याचे चोख शिक्षणही दिले.
दरवर्षी बाबूजींच्या जन्मदिनी त्यांच्या आठवणींचा सुगंध मनात भरून राहतो आणि डोळे भरून येतात. मला आठवते, ‘लोकमत’ सुरू झाला त्या सुरुवातीच्या संघर्षाच्या दिवसांत आपले वर्तमानपत्र गावागावात गेले पाहिजे, एवढी एकच दिशा त्यांनी आम्हाला दिली होती. त्या दिशेने जाणारे मार्ग मात्र आमचे आम्ही शोधावेत असा त्यांचा आग्रह असे. आपण का आहोत इथे?-बातम्यांसाठी! बातम्या कुणासाठी?- वाचकांसाठी! त्याने तुमचा पेपर विकत घेऊन वाचावा अशी तुमची इच्छा असेल तर तो नेटका, सुबक असावा, त्याचे प्रथमदर्शनी रूप देखणे असावे, छपाई निर्दोष आणि कागद उत्तम असावा, असा गुणवत्तेचा आग्रह मात्र त्यांनी कधी सोडला नाही.
बाबूजी सांगत, ‘लोकमत हे सामान्यांचे वृत्तपत्र आहे, ते त्यांचेच राहिले पाहिजे. सामान्यांच्या प्रश्नांना, विचारांना, लेखनाला त्यात जागा असलीच पाहिजे. कोणताही पक्ष, कोणतीही विचारसरणी, मोठा माणूस यांच्या आशीर्वादाने वृत्तपत्र जिवंत राहत नाही. वाचकांचा विश्वास आणि पाठिंबा हेच तुमचे खरे भांडवल आहे, हे कधीही विसरू नका.’
सर्वसामान्यांचे वर्तमानपत्र, त्यातले विषय सर्वसामान्यांचे आणि भाषाही त्यांना समजेल अशीच हवी, असा आग्रह धरून बाबूजींनी तत्कालीन पत्रकारितेवरचा पांढरपेशीय आणि उच्चवर्णीय शिक्का हट्टाने पुसला. अनेक वादळांशी लढताना, संकटांना सामोरे जाताना, व्यक्तिगत टीका झेलताना मी बाबूजींना पाहिले; पण त्यांच्या तोंडून मी कधीही, कुणाहीबद्दल अपशब्द ऐकला नाही. स्वत:च्या मालकीचे वृत्तपत्र असणे म्हणजे कुणाही राजकारणी माणसाच्या हाती असलेले केवढे मोठे हत्यार! पण त्यांनी ‘लोकमत’ला कधीही असे हत्यार बनवले नाही. ‘लोकमत’चा उपयोग त्यांनी स्वत:च्या प्रसिद्धीसाठी केला नाहीच; पण विरोधकांच्या चारित्र्यहननासाठीही कधी होऊ दिला नाही.
बाबूजी वेळेच्या बाबतीत अत्यंत काटेकोर होते. मंत्रिपदी असताना इतके कामात बुडालेले असत; पण घरच्या लोकांसाठी, मुले-सुना-नातवंडांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही, असे कधीही झाले नाही. तुम्ही पैशाचे बजेट करता ना, व्यवसायाचे बजेट करता ना, घरी लग्नकार्य असले तर खर्चाची तजवीज करता ना; मग तुमच्याकडे तुमच्या वेळेचाही नेमका हिशेब केलेला असला पाहिजे, असा आग्रह ते सतत धरत असत. आणि मुख्य म्हणजे स्वत: तसे वागत. प्रत्येक गोष्टीसाठी, कामासाठी, माणसासाठी किती वेळ हे त्यांचे ठरलेले असे आणि ते गणित सहसा कधी चुकत नसे!
राजकारणात सक्रिय असताना, महत्त्वाची मंत्रिपदे आणि पक्षकार्य सांभाळताना ते ‘लोकमत’मध्येही व्यग्र असत आणि एवढे करून त्यांच्याकडे कुटुंबासाठी, मित्र-स्नेहींसाठीही वेळ असे; पण बाबूजींची सततची दगदग, दिवसदिवस चालणारे दौरे, मीटिंगा, एका ठिकाणी पाय ठरू नये असे प्रवास; हे सारे आमच्या आईला- आम्ही तिला बाई म्हणत असू - बाईला अजिबात मान्य नसे. कधीकधी बाईचा तोल जाई आणि मग घरात वाद होत, अबोला सुरू होई.
माझ्या लहानपणीचा एक प्रसंग अजून आठवतो. यवतमाळचे दर्डा उद्यान. बरड जमिनीवर लावलेली झाडे बहरू लागली होती. त्या दिवशी बाबूजी यवतमाळला मुक्कामी होते. सकाळपासून बाहेर बैठका आणि भेटीगाठी झाल्या. दुपारचे तीन वाजून गेल्यावर ते घरी आले. बाईला म्हणाले, आठ आदमी का खाना लगा दो.. हे त्यांचे नेहमीचे असे. आमची बाई अन्नपूर्णा. ऐनवेळी घरी आलेल्या लोकांना जेवूखाऊ घालणे तिच्या स्वभावातच होते; पण त्या दिवशी बाई चिडली.. बाबूजींना म्हणाली, आपको इस मे क्या सुख मिलता है? सतत कामात असता, लोकांची कामे करत फिरता, खाण्यापिण्याची आबळ करता, क्षणभराची विश्रांती नाही, असे कसे चालेल? तुमच्या जिवाला आराम नको का थोडा तरी?
.. त्या रात्रीचे जेवण अबोल्यातच पार पडले.
दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही जण बागेत निवांत चहा घेत बसले होते. मी तिथे गेलो. रात्रीचा विषय माझ्या डोक्यात ताजा होता.
मी बाबूजींना म्हणालो, ‘तुम्ही का करता असे, बाबूजी? बाई म्हणते त्यात काय चूक आहे? सतत कष्ट करता, तुम्हाला वेळेवर जेवण मिळत नाही, पुरेशी झोप नाही, यात कसले सुख आहे.’
बाबूजी हसून म्हणाले, ‘राजन, तुम्हे क्या लगता है? सुख क्या होता है? देरी से उठो, अच्छे से खाना खाओ और दोपहर को गादी पे लेट जाओ, क्या ये सुख है? आजूबाजूला बघ. ही जमीन आपण घेतली तेव्हा बरड होती, इथे मातीही नव्हती. आपण माती आणली. बाईने त्यात झाडे लावली. कष्ट केले. ही झाडे मोठी होताना पाहणे हे खरे सुख आहे. खरे सुख हे श्रमाच्या पोटीच जन्म घेते, कधीही विसरू नकोस!’
- तो दिवस आठवताना आजही माझे डोळे भरून येतात. आता बाबूजी नाहीत... पण आम्हा सर्वांच्या अंत:करणात ते सदैव आहेत.
rjd@lokmat.com