नंदकिशोर पाटील, संपादक, लोकमत छत्रपती संभाजीनगर
तामिळनाडूतील एका शांत, नारळाच्या बागांनी वेढलेल्या गावात इतिहासाचे गूढ पुन्हा जागे झाले आहे. ‘किलाडी’ हे वैगई नदीच्या काठावर वसलेलं एक छोटसं गाव! पण तिथल्या १५ फूट खोल खणलेल्या मातीच्या थराखाली, केवळ तामिळनाडूच नाही तर संपूर्ण भारतीय इतिहासाचा मूलगामी विचार बदलवून टाकणारे पुरावे सापडले आणि त्याचक्षणी सुरू झाला एक अदृश्य, पण तीव्र वैचारिक संघर्ष! भारतीय इतिहासाच्या अंगणात किलाडीच्या उत्खननाने धुळीत पडलेल्या अस्मितेच्या पुराव्यांना जणू पुनर्जन्म दिला आहे. मात्र, हे उत्खनन एका वस्तुनिष्ठ, अकॅडमिक शोधाइतके निष्पाप राहिलेले नाही. त्यात गुंतलेली आहे राजकीय धारणांची साखळी, भाषिक अस्मितेची चिथावणी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे इतिहासाच्या सोयीस्कर पुनर्लेखनाचे धोरण!
आज इतिहासाच्या पुनर्लेखनाचे प्रयत्न, मग ते NCERT पुस्तकांतील बदल असोत की पुरातत्व अहवालांची फेरमांडणी- हे सर्व एका ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ या संकल्पनेभोवती फिरत आहेत. या राष्ट्रवादात ‘हिंदू संस्कृती-आर्य परंपरा-उत्तर भारत’ हे समीकरण पुन: पुन्हा अधोरेखित केले जात आहे. त्यामुळे दक्षिणेतील इतिहास, भाषा, श्रद्धा, देवता, शिलालेख यांची स्वतंत्रता अगोदर नाकारली जाते, मग त्याचे ‘आर्यीकरण’ केले जाते. किलाडी उत्खननात सापडलेल्या २५०० वर्षांपूर्वीच्या भांड्यांच्या तुकड्यांनी, टेराकोटा नळ्यांनी आणि ब्राह्मी लिपीतील शिलालेखांनी केवळ पुरातत्वशास्त्रात नव्हे, तर भारतीय अस्मितेच्या गाभ्यावरच नवा वाद उभा केला आहे. हा वाद आहे आर्य विरुद्ध द्रविड संस्कृतीचा, उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारताचा आणि मुख्यत्वे इतिहासाच्या मुळाशी राजकारण घुसडण्याचा!
भारतीय उपखंडातील नागरीकरणाची सुरुवात इ.स.पू. ३३००च्या सुमारास सिंधू नदीच्या खोऱ्यात झाली. मोहेंजोदडो, हडप्पा, लोथल ही शहरे शिस्तबद्ध नागरी जीवनाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून उत्खननीय पुराव्यांतून सिद्ध झाले. मात्र, ही संस्कृती इ.स.पू. १३०० च्या दरम्यान लयाला गेली. त्यानंतरचा कालखंड म्हणजे गंगेच्या खोऱ्यात उदयास आलेली वैदिक संस्कृती, जिच्याशी आर्यवंशीय परंपरा आणि वेदसाहित्य जोडले गेले. परंतु, या काळात दक्षिण भारतात काय घडत होते, याचे उत्तर आजवर इतिहासाच्या मुख्य प्रवाहात सापडत नाही. कारण इतिहासाची मांडणी मुख्यतः उत्तरकेंद्रित आर्य दृष्टिकोनातून झाली. त्यामुळे द्रविड संस्कृतीचा अभ्यास गौण ठरला. तामिळनाडूमधील किलाडी गावात २०१४ पासून सुरू असलेल्या उत्खननात १५,०००हून अधिक पुरातत्वीय वस्तू सापडल्या. यामध्ये टेराकोटा वस्तू, नाणी, विटांचे स्ट्रक्चर, जलनलिका, स्मशान घडे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तामिळ ब्राह्मी लिपीतील कोरीव अक्षरे होती. यातील काही कोरीव लेख इ.स.पू. ६००च्या आधीचे असल्याचे पुरावे समोर आले. या लिपीतील काही चिन्हे सिंधू संस्कृतीतील चिन्हांशी साम्य दर्शवतात, त्यामुळे इतिहासकारांना प्रश्न पडलाय की, सिंधू संस्कृतीचा काही अंश दक्षिणेकडे स्थलांतरित झाला होता, की, दक्षिणेतही एक समांतर संस्कृती नांदत होती?
भारतीय इतिहासाची एक लोकप्रिय आख्यायिका अशी आहे की, आर्य हे मध्य आशियातून भारतात आले, त्यांनी द्रविड संस्कृतीला मागे टाकले आणि आपली वैदिक परंपरा आणि भाषा यांचा विस्तार केला. त्यांच्यामुळेच भारतात शहरीकरण आणि साक्षरतेची सुरुवात झाली असे मानले जाते; पण किलाडीच्या उत्खननाने हे चित्र उलटे करताना द्रविड संस्कृती स्वतंत्र आणि पुरातन आहे, हे अधोरेखित केले. तामिळ ब्राह्मी लिपी ही अशोककालीन ब्राह्मीपेक्षा जुनी आहे, असा दावा तामिळ तज्ज्ञांनी केला आहे. या दाव्याने एक पारंपरिक सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय धोरणांना छेद दिला आहे. द्रविड अस्मिता ही आता फक्त सांस्कृतिक प्रश्न न राहता राजकीय हत्यार बनत चालली आहे.
किलाडीतील उत्खननामुळे इतिहासाच्या मांडणीतील पूर्वग्रह पुन्हा समोर आले. अनेक पुरातत्व शास्त्रज्ञांनी ही शोधमोहीम अधिक खोलवर जावी असे सुचवले असताना केंद्र सरकारच्या Archaeological Survey of India (ASI) ने मुख्य पुरातत्व अधिकारी अमरनाथ रामकृष्णन यांची अचानक बदली केली आणि त्यांचा शोध अहवाल ‘अशास्त्रीय’ ठरवला गेला, तर तामिळनाडूतील सत्ताधाऱ्यांनी याचा अर्थ ‘तामिळ अस्मितेच्या विरोधातील षड्यंत्र’ असा घेतला. किलाडी हे आता राजकीय, प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा बनले आहे. किलाडीच्या तुकड्यांतून मिळालेली लिपी, शहरे, व्यापाराचे पुरावे हे सांगतात की भारताच्या इतिहासात दक्षिणही तितकाच पुरातन, नागरी आणि समृद्ध होता जितका की उत्तर भारत! द्रविड इतिहास स्वतंत्र, बहुविध आणि जातिव्यवस्थेच्या पारंपरिक साच्यापेक्षा वेगळा होता, हे स्वीकारणे आज केंद्रीय सत्तेला धोकादायक वाटते. दुर्दैवाने, आपल्याकडे इतिहास विजेत्यांच्या अंगाने लिहिलेला असतो आणि पराजितांची गोष्ट ‘मूक इतिहास’ बनते. किलाडीने हा मूक इतिहास बोलका केला आहे. किलाडीने आपल्या सामायिक मुळांचा शोध घेण्याची संधी दिली आहे. हे केवळ द्रविड किंवा तामिळ अस्मितेचे लक्षण नसून, भारतीय उपखंडात विविध संस्कृती कशा एकमेकांशी जोडलेल्या होत्या, याची साक्ष आहे. किलाडीचा प्रश्न केवळ तामिळ अस्मितेचा नसून आपण इतिहासाला राजकीय सोयीने बदलत राहणार की वस्तुनिष्ठतेने स्वीकारणार, याचे उत्तर शोधण्याचा!
Web Summary : Kiladi excavations challenge North-centric history, revealing a sophisticated, ancient Dravidian civilization. This discovery sparks debate about Aryan-Dravidian dynamics, prompting questions about rewriting history and political agendas. The findings highlight South India's rich, independent past.
Web Summary : किलाडी उत्खनन उत्तर-केंद्रित इतिहास को चुनौती देता है, जो एक परिष्कृत, प्राचीन द्रविड़ सभ्यता को उजागर करता है। यह खोज आर्य-द्रविड़ गतिशीलता पर बहस छेड़ती है, इतिहास को फिर से लिखने और राजनीतिक एजेंडा के बारे में सवाल उठाती है। निष्कर्ष दक्षिण भारत के समृद्ध, स्वतंत्र अतीत पर प्रकाश डालते हैं।