हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत,
नवी दिल्ली
पंचाहत्तरी गाठली म्हणजे आता निवृत्ती आणि निरोपाचा कार्यक्रम असा विचार जर कोणी केला असेल तर त्याच्यासाठी गेल्या सप्ताहात दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांत एकच खुलासा समोर ठेवण्यात आला. पहिला कार्यक्रम दिल्लीत होता आणि दुसरा मुंबईत. ७ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात वृद्धत्वावर सहज बोलून गेले. आपल्या ७५व्या वाढदिवशी एक नेते भेटले आणि त्यांनी चिमटा काढला. ‘अच्छा, तुम्ही आता पंचाहत्तरी ओलांडली तर..!’ मोदींनी त्यावर दिलेला प्रतिसाद नेहमीप्रमाणे टाळ्या घेणारा तर होताच आणि त्यामागचा इरादाही अगदी सुस्पष्ट होता. “अजून २५ बाकी आहेत...” असे ते म्हणाले.
आता सर्वच मेट्रो मार्गांची सखोल सुरक्षा तपासणी होणार; एमएमआरडीएला आली दुर्घटनेनंतर खडबडून जाग
कदाचित हा केवळ विनोद असेल. भारतीय राजकारणात मात्र त्याची बातमी होते. निवृत्तीचे निकष आणि नेतृत्वबदल या विषयावर कुजबुज चालू असताना “निवृत्तीची भाषणे लिहायला इतक्यात सुरुवात करू नका,” हा मोदींचा फटका स्पष्ट संदेश देणारा होता. यालाच जोडून ८ फेब्रुवारीला दुसरा प्रसंग मुंबईत घडला. सरसंघचालक मोहन भागवत यांनी वय आणि अधिकारपद याविषयी त्यांचे मत मांडले. “पंचाहत्तरीनंतर कोणीही पदावर न राहता काम केले पाहिजे हे मला ठाऊक आहे; परंतु, संघानेच मला पदावर कायम राहायला सांगितले आहे आणि जेव्हा संघ आदेश देईल तेव्हा मी पायउतार होईन.” निवडणूक नाही, प्रचार नाही, केवळ नेमणूक, शिस्त आणि आदेश!
- दोन दिवस, दोन नेते. एकच वय आणि विशेष म्हणजे संदेश सारखाच! पंचाहत्तर हा भले एक आकडा असेल; परंतु, बाहेर जाण्याचा दरवाजा स्वयंचलित नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हसत-हसत म्हणाले, “अजून २५ वर्षे बाकी आहेत...” उपस्थितही हसले. कॅमेरे पुढे सरसावले.
- परंतु, बरीच गर्दी असलेल्या भाजपच्या प्रतीक्षागृहात ताटकळलेल्या महत्त्वाकांक्षी नेत्यांना मात्र या हास्याने गोठवून टाकले. कारण, राजकारणात विनोदाकडेही ‘अप्रत्यक्षपणे केलेली घोषणा’ म्हणूनच पाहिले जाते. मागील काही वर्षांपासून दिल्लीच्या भगव्या वर्तुळात ज्येष्ठ नेते सरता काळ मोजत आहेत. तरुण चेहऱ्यांची तयारी चाललेली असते. काहींनी संयम ठेवून वाट पाहिली, काहींचा उतावीळपणा दिसला. त्यातच मोदींचे हे नवे ७५-२५ चे गणित आले. विशेष म्हणजे २०४७ हेच ते वर्ष ज्याचा उल्लेख मोदी ‘विकसित भारताचे गंतव्य’ म्हणून वारंवार करीत असतात. अचानक या घोषणेला एक वेगळी धार आली. - सहेतुक वा अहेतुक कसाही असला तरी संदेश स्पष्ट आहे : मोदींनंतरच्या कालखंडाचा विचार इतक्यात सुरू करू नका.
तोंड कसे बंद करणार?
राहुल गांधी यांनी संसदेत प्रकाशझोत आपल्यावर ठेवला यात काही शंका नाही. यापूर्वी फार थोड्या विरोधी पक्षनेत्यांना हे जमले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्तारूढ बाकांना वाटत होते की राहुल त्यांची नेहमीची भूमिका बजावतील. म्हणजे निषेध, थोडे थांबून पुन्हा मागे जाणे वगैरे.. तर राहुल गांधी यांनी वेगळेच काहीतरी केले. एक प्रकारे त्यांनी सभागृह, कॅमेरे आणि सत्तारूढ बाजूला ‘आता मला अडवून पाहा’ असे आव्हानच दिले. त्यांनी केवळ सरकारवर हल्ला चढवला नाही, तर दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते चालून गेले याचा अनेकांना अचंबा वाटला. राहुल गांधी आता ‘माझे ऐकून घ्या’ अशी विनवणी करणारे नेते राहिलेले नाहीत. कितीही थट्टा करा, अडथळे आणा, व्यक्तिगत हल्ले चढवा, हक्कभंग किंवा इतर ठराव आणा; आता त्यांना कशाची फिकीर नाही.
सत्तारूढ बाकांनी कार्यपद्धतीतल्या तांत्रिक बाबी, तत्काळ प्रत्युत्तर, आक्रमक प्रतिहल्ले असे सगळे मार्ग अवलंबून राहुल गांधी यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते डगमगले नाहीत. गोंधळातही त्यांनी पुढे पावले टाकली. चर्चेमागून चर्चा झाल्या. मात्र, धोरणात्मक बाबींच्या पुढे जाऊन त्यांनी काहीतरी सांगण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आपल्याला गप्प केले गेले, कमी लेखले, बाजूला सारले, मात्र आता नम्रपणे वाट पाहण्याचा काळ संपला आहे. आता थांबणे नाही. सतत पुढे जात राहणे असा त्यांचा नूर दिसला. राजकारणात फारसे स्वारस्य नसलेला नेता ही प्रतिमा बदलायला त्यांनी सुरुवात केली आहे. इतिहासाने त्यांना नाकारलेले स्थान पटकावण्यासाठी आता त्यांनी निर्धार केला आहे. घटनेची एक छोटी प्रत राहुल गांधी खिशात नेहमी बाळगतात. तज्ज्ञ आता घटनेची पाने उलटू लागले आहेत, असे कळते.
Web Summary : PM Modi hinted at continuing leadership, dismissing retirement talks at seventy-five. RSS Chief Bhagwat echoed similar sentiments on holding positions. Rahul Gandhi challenges the ruling party, adopting a more assertive stance in parliament, signaling a shift in his political approach.
Web Summary : पीएम मोदी ने पचहत्तर वर्ष की आयु में सेवानिवृत्ति की बातों को खारिज करते हुए नेतृत्व जारी रखने का संकेत दिया। आरएसएस प्रमुख भागवत ने भी पद पर बने रहने पर समान विचार व्यक्त किए। राहुल गांधी संसद में सत्तारूढ़ दल को चुनौती दे रहे हैं, जो उनके राजनीतिक दृष्टिकोण में बदलाव का संकेत है।