विशेष लेख: काेण म्हणून काय पुसता? भारतीय थोडेसे ‘डेनिसोवन’ही आहेत!

By Shrimant Mane | Published: March 23, 2024 06:54 AM2024-03-23T06:54:24+5:302024-03-23T06:54:56+5:30

भारतीयांच्या जनुकांमध्ये थेट तीस हजार वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या डेनिसोवन मानवी प्रजातींचे अंश सापडले आहेत. या नव्या अभ्यासाविषयी!

Special Article: Who Wipes What? Indians are a bit 'Denisovan' too! | विशेष लेख: काेण म्हणून काय पुसता? भारतीय थोडेसे ‘डेनिसोवन’ही आहेत!

विशेष लेख: काेण म्हणून काय पुसता? भारतीय थोडेसे ‘डेनिसोवन’ही आहेत!

श्रीमंत माने, संपादक, लोकमत, नागपूर

स्वांटे पेबो यांना विसरला नाहीत ना? २०२२ साली वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित झाले, ते हेच स्वीडिश शास्त्रज्ञ! नामशेष झालेल्या निएंदरथल या मानव प्रजातीची जनुकीय संरचना व आताच्या होमो सेपियन्सपर्यंत झालेली उत्क्रांती याची सांगड घातली म्हणून हे नोबेल त्यांना देण्यात आले. सायबेरियातील डेनिसोवा गुहेतील जीवाश्माचे जीनोम सिक्वेन्सिंग हे त्यांचे मोठे काम. त्यातून पॅलेओजेनिटिक्स ही जनुकीय अभ्यासाची नवी शाखा स्थापित झाली. पेबो यांनी कधी भारतात काम केले नसले तरी त्यांची  आठवण यासाठी की त्यांच्या संशोधनाशी संबंधित एक आनुवंशिक विविधतेचा खजिनाच जणू भारतात सापडला आहे. ...आणि त्यातील आश्चर्यकारक बाब म्हणजे भारतीयांच्या जनुकांमध्ये थेट तीस हजार वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या डेनिसोवन मानवी प्रजातींचे अंश सापडले आहेत. 

प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा या अभ्यासाचा एक निष्कर्ष म्हणजे, केवळ वेशभूषा, बोलीभाषा किंवा खाद्यसंस्कृतीच नव्हे तर भारत हा आनुवंशिक विविधतेचाही अद्भुत असा टापू असल्याचे प्रथमच जगापुढे आले आहे. टोनी जोसेफ यांचे ‘अर्ली इंडियन्स’ हे चारेक वर्षांपूर्वीचे पुस्तक अनेकांनी वाचले असेल. आम्ही भारतीय म्हणजे साधारणपणे पासष्ट हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून बाहेर पडलेले होमो सेपियन्स आहोत, हे त्यांनी पुरातत्त्व पुरावे तसेच आनुवंशिक संशोधनाच्या आधारे  सिद्ध केले आहे. नवा अभ्यास आपल्याला त्या पलीकडे घेऊन जातो. आपण सेपियन्स आहोतच. तथापि, आपल्या जनुकीय संरचनेत निएंदरथल व डेनिसोवन या कित्येक हजार वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या प्रजातींचेही अंश आहेत, असे हा नवा अभ्यास सांगतो. 

भारतातील लाँगिट्यूडिनल एजिंग स्टडी, अमेरिकेतील बोस्टन येथील हार्वर्ड टीएच चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ, सदर्न कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्स आणि एम्स या संस्थांनी मिळून भारतातील आतापर्यंतचे हे सर्वांत मोठे जनुकीय संशोधन गेल्या काही वर्षांत केले. देशातील १८ राज्ये, विविध बोली व भाषा बोलणाऱ्या समूहांमधील २,७६२ व्यक्तींची जनुकीय संरचना यात अभ्यासली गेली. यातील २२ नमुने असे होते, की त्यात आई, वडील व अपत्य अशा तीन पिढ्यांचे डीएनए व जनुकीय रचना अभ्यासली गेली. या अभ्यासाचे प्राथमिक निष्कर्ष bioRxiv नियतकालिकात गेल्या महिन्यात प्रकाशित झाले. अजून त्यावर जागतिक पातळीवर चर्चा तसेच जगभरातील संशोधकांकडून काटेकोर चिकित्सा किंवा फेरपडताळणी व्हायची आहे.  

जनुकीय संरचनेचा आतापर्यंतचा अभ्यास सध्याचे भारतीय म्हणजे  प्राचीन इराणी शेतकरी, युरेशियन पशुपालक व दक्षिण आशियातील शिकारी या तीन वर्गांचे मिश्रण असल्याचे सांगतो. नव्या अभ्यासातील निष्कर्ष संशोधकांना त्या पलीकडे पाहायला लावणारे आहेत. असे मानले जाते, की आपले म्हणजे होमो सेपियन्सचे मूळ आफ्रिका खंडात आहे. सुमारे तीन लाख वर्षांपासून आपण पृथ्वीवर आहोत. निएंदरथल प्रजाती आफ्रिकेबाहेरची. ती प्रामुख्याने युरोप व आशियात राहत होती. तिची उत्पत्ती सेपियन्सपेक्षा किमान एक लाख वर्षे आधीची. सत्तर हजार वर्षांपूर्वी सेपियन्स आफ्रिकेबाहेर पडले, तर निएंदरथल तीस हजार वर्षांपूर्वी नामशेष झाले. म्हणजे उणीपुरी चाळीस हजार वर्षे या दोन्ही प्रजाती आफ्रिका खंडाबाहेर सोबतच राहिल्या. या सहजीवनाचे अंश सध्याच्या आफ्रिकेबाहेरच्या सेपियन्समध्ये जनुकांच्या रूपाने आढळतात.

डेनिसोवा ही या दोहाेंच्या मधली एक रहस्यमय प्रजाती. होमो हबिलिस, होमो इरेक्ट्स, निएंदरथल किंवा सेपियन्ससारखी ही पूर्ण प्रजाती होती का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. पण, सायबेरियातील डेनिसोवा गुहेत सापडलेले जीवाश्म, विशेषत: ती मोठी दाढ तसेच जनुकीय संशोधन सांगते, की निएंदरथल व डेनिसोवा या एकमेकींच्या नातेवाईक असाव्यात. डीएनए पुरावा सूचित करतो, की डेनिसोवन प्रजातीची त्वचा, डोळे आणि केस काळे होते आणि त्यांच्या शरीराची ठेवण तसेच चेहऱ्याची वैशिष्ट्ये निएंदरथलसारखीच होती. आतापर्यंत सायबेरियातील डेनिसोवा गुहा, तिबेटच्या पठारावरील बैशिया कार्स्ट गुहा ते आग्नेय आशियात लाओसच्या अन्नामाइट पर्वतातील कोब्रा गुहेपर्यंत डेनिसोवन प्रजातीचे अवशेष आढळले आहेत. याच टापूत हे डेनिसोवन लोक राहत असावेत, असे जीवाश्मरूपातील पुराव्यांनी स्पष्ट झाले. 

भारतात मात्र डेनिसोवन प्रजातीचे एकही जीवाश्म अजून आढळलेले नाही. आता पुढे आलेला जनुकीय पुरावा स्पष्ट करतो, की भारतीयांचे जनुकीय मूळ बरेच गुंतागुंतीचे आहे आणि इंडोगामी म्हणजे जवळच्या नात्यात विवाह किंवा शरीरसंबंधांमुळे ही गुंतागुंत तयार झाली असावी. वेगवेगळ्या मानवी प्रजातींमधील संकर पाषाणयुगाच्या प्रारंभी झाला असावा, याकडे हा अभ्यास बोट दाखवितो. महत्त्वाचे हे, की आम्ही कोण आणि कसे उत्क्रांत होत आलो, आमच्या जनुकीय रचनेत कसे बदल होत गेले आणि त्या बदलाचे अंश आपल्या शरीराच्या डीएनएमध्ये किती आहेत, या नव्या दिशेच्या संशोधनाचा प्रारंभ करणारा हा अभ्यास आहे आणि त्याचा केंद्रबिंदू भारत असेल.

shrimant.mane@lokmat.com

Web Title: Special Article: Who Wipes What? Indians are a bit 'Denisovan' too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :historyइतिहास