शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: “आबूराव गबूराव, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है...”

By अतुल कुलकर्णी | Updated: October 29, 2023 07:23 IST

सर्वपक्षीय नेत्यांनी जनतेला वेगवेगळ्या विषयात गुंतवून ठेवल्याबद्दल अभिनंदनाचे पत्र

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई

सर्वपक्षीय नेतेगण हो,नमस्कार, आपण जनतेला गेले काही दिवस ज्या वेगवेगळ्या विषयात गुंतवून ठेवले आहे त्याचे अभिनंदन करण्यासाठी पत्र लिहीत आहे. आपल्याएवढा चाणाक्षपणा आजवर आम्ही कधी पाहिला नाही. त्यामुळे आम्हाला आमचे नेमके प्रश्न काय आहेत? आमच्या समस्या कोणत्या आहेत? त्यावर उपाय कुठे शोधायचा? त्यातून मार्ग कसा काढायचा? या कशाचीही चिंता किंवा विचार आमच्या मनाला हल्ली शिवत नाही. कधीकाळी राहुल गांधी यांना एका इंग्रजी वाहिनीवर काही प्रश्न विचारले गेले. जो प्रश्न विचारला त्याचे भलतेच उत्तर त्यांनी दिले, म्हणून त्यांची ‘पप्पू पप्पू’ अशी प्रतिमा केली गेली. पण गेले काही वर्षे, प्रमुख पक्षाच्या कुठल्याही नेत्याला जो प्रश्न विचारला आहे, त्या प्रश्नाचे तो नेता भलतेच उत्तर देतो. मूळ प्रश्न काय विचारला होता हे प्रश्नकर्त्यालाही आठवत नाही, इतका तो आपल्या उत्तरात त्या प्रश्नकर्त्याला गुंतवून टाकतो. तेव्हा तो नेता मात्र पप्पू ठरत नाही. हा आदर्श आमच्यापुढे असल्यामुळे हल्ली आम्हाला रोजच्या जगण्यामरण्याच्या प्रश्नांविषयी फारसे काही वाटत नाही. याचे सगळे श्रेय अर्थात तुम्हा नेतेमंडळींना आहे. त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद.

टोमॅटो २०० रुपये किलो झाले तेव्हा इतर अनेक प्रश्न त्यापेक्षा जास्त गहन आहेत असे आम्हाला सांगितले गेले. कधीतरी आपणही त्याग केला पाहिजे हे आमच्या लक्षात आले आणि आम्ही दोनशे रुपये किलोचे टोमॅटोही घेतले. आता कांदा पंच्याहत्तरीपार जाऊ लागला तेव्हा, कांदा खाल्लाच पाहिजे का? असे आम्हाला सांगायची गरज नाही, आम्ही स्वतःच कांदा खाणार नाही, कारण आमच्यावर तसेच संस्कार झाले आहेत ना... संजय गांधी निराधार योजनेतल्या लोकांना गेल्या कित्येक महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही, असे काँग्रेसवाले सांगत आहेत. पण आम्ही त्याकडे लक्ष देणार नाही. आपल्याकडे कोरोनाची एवढी मोठी साथ येऊन गेली. हजारो लोकांचे जीव गेले. मात्र त्यापासून धडा घेतला पाहिजे, असे आम्हाला कोणीही सांगितलेले नव्हते. त्यामुळेच नांदेडमध्ये शासकीय हॉस्पिटलमध्ये ५७ लोक मेले... ठाण्यात हॉस्पिटलने १८ जणांचे बळी घेतले... औरंगाबादमध्येही असेच काहीसे घडले... पेपरवाले दोन दिवस बातम्या छापतील. आरोग्य सेवा सरकारने सुधारायला पाहिजे, असे किती वेळा म्हणायचे? त्यातून काहीही साध्य होत नाही हे आमच्या लक्षात आल्यामुळे आम्ही त्याकडे आता फार लक्ष देत नाही.  हे आम्ही आता तुमच्यापासून शिकू लागलो आहोत.

रेल्वे, बँकिंग, शिक्षण, आशा वर्कर अशा लाखो जागा रिक्त आहेत. त्या भरल्या तर विनाकारण सरकारी तिजोरीवर बोजा येईल. परिणामी आपल्यालाच जास्तीचा कर द्यावा लागेल, ही तुमची भूमिका आम्हाला समजू लागली आहे. त्यामुळे आम्ही जागा भरा, असा आग्रह कधीच धरणार नाही. कारण त्याचा फार उपयोग होत नाही, हे आमच्या लक्षात आले आहे. या सगळ्यापेक्षा जात, धर्म, गटतट हे विषय जास्त महत्त्वाचे आहेत, हा तुमचा मुद्दा आम्हाला दोनशे टक्के पटलेला आहे.

विरोधकांना बोलायला काही नसले की, ते महागाईबद्दल बोलतात. परवा कोणीतरी सांगत होतं, की एक लिटर पेट्रोलच्या किमतीत आता एक किलो कांदे मिळतील. मात्र विरोधकांच्या अशा बोलण्याला आता आम्ही फार फसणार नाही. वय जसे वाढण्यासाठीच असते तशी महागाईही वाढण्यासाठीच असते. म्हणून तर तिचं नाव महागाई आहे. कितीही महागाई आली तरी देशासाठी आपण एवढे करायला नको का..? असे तुम्हीच तर आम्हाला सांगितले. त्यामुळे वाढती महागाई, बेरोजगारी, आर्थिक मंदी, आरोग्याच्या सुविधा, शाळांची दुरवस्था, रस्त्यावर ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग या अशा फुटकळ गोष्टींकडे लक्ष देऊ नका, हा तुमचा मंत्र आम्ही कायम जवळ ठेवला आहे. आम्हाला कचऱ्याचे ढीग दिसले की, आम्ही चेहरा फिरवून पुढे जातो. आरोग्य सुविधा मिळाल्या नाहीत तर आम्ही महागड्या हॉस्पिटलमध्ये जातो... शेवटी पै पै जमा केलेली पुंजी कधी कामाला यायची? हेदेखील तुमच्याकडूनच आम्ही शिकलोय. तेव्हा तुम्ही चिंता करू नका. तुम्ही अशीच नेतेगिरी करत राहा. “आबूराव गबूराव, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है...” अशा घोषणा आम्ही देत जाऊ. निवडणुका आल्या की आमच्या सोसायटीत पुढच्या पाच वर्षांसाठी केबलचे कनेक्शन मोफत घेऊन टाकू... आमच्या बिल्डिंगला रंग लावून घेऊ... गेला बाजार तुमची आठवण म्हणून तुमच्याकडून छोटेसे पाकीट घेऊ... पुन्हा पुढच्या पाच वर्षांनी तुमच्या भेटीची वाट पाहण्यासाठी तेवढे पुरेसे होईल... तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!- तुमचा बाबुराव

टॅग्स :Politicsराजकारण