शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

राशिदभाई, ये दुख सहा ना जाये... वेदनेपल्याड निर्मळ आनंदाचा शोध थांबणे व्याकूळ करणारे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 08:14 IST

एकाकीपणाच्या मुशीतून घडत गेलेले हे गाणे वेदनेपल्याड असलेल्या निर्मळ आनंदाचा शोध घेत असे... तो शोध थांबणे व्याकूळ करणारे आहे!

-वंदना अत्रे, शास्त्रीय संगीताच्या अभ्यासक

एकाच स्वराचा तासनतास रियाझ आणि पलटे घोकत बसण्याचा त्याला भारी कंटाळा! त्यामुळे असा वेडा आग्रह धरणारे संगीत आणि ते शिकवणारे आजोबा उस्ताद निस्सार हुसेन खां ह्या दोन्हीपासून लांब पळण्याचे अनेक बेत तो सतत आखत राहायचा! आसपासचे मित्र जमवून क्रिकेट किंवा कबड्डी खेळत राहणे त्याला कदाचित आवडले असते. पण कोलकात्याच्या संगीत रिसर्च अकादमीमधील ऑडिओ लायब्ररीमध्ये उस्ताद अमीर खां, बडे गुलाम अली खां यांची भारदस्त गायकी त्याच्या कानावर पडली, उस्ताद अली अकबर खां यांच्या सरोदचे स्वर पाठलाग करू लागले आणि स्वरांवर आपले प्रेम असल्याचा साक्षात्कार त्याला प्रकर्षाने झाला. स्वर आसपास असतात तेव्हा जीवाभावाच्या माणसाचे बोट हातात असावे, असे आश्वस्त वाटते याची जाणीव झाली.

संगीत त्याच्यासाठी नवीन नव्हते. वडील सुफी गायक  आणि आईचे काका म्हणजे निस्सार हुसेन. रामपूर सहस्वान घराण्याचे एक बुजूर्ग कलाकार. त्यामुळे बदाउसारख्या छोट्या गावात राहूनही अजाणत्या वयात त्याला संगीताचे शिक्षण मिळाले होते. भैरव-यमनची ओळख झाली होती. पण अमीर खां आणि बडे गुलाम अली खां यांचे गाणे ऐकून मोठ्या निश्चयाने रियाझाकडे वळला तो, स्वेच्छेने!

राशिदमधील हा बदल बघायला त्याची अम्मी, शाखरी बेगम असती तर आयुष्याचे सार्थक झाल्याचा आनंद तिला झाला असता. कदाचित तिचे काका उस्ताद निस्सार हुसेन खां यांच्या नजरेने ती हा बदल आणि बदलानंतर परिपक्व होत गेलेले त्याचे गाणेही बघत असणार, खुश होत असणार! वयाची जेमतेम पन्नाशी ओलांडलेल्या आणि बदलत्या काळातील रसिकांच्या बदलत्या अपेक्षांशी जमवून घेतसुद्धा आपल्या गायकीची चोख शुद्धता राखणाऱ्या राशिद खां यांच्या अकाली निधनाने हे परिपक्व गाणे अकाली थांबले.

बातमी सांगणाऱ्या पोस्टस्, भावपूर्ण श्रद्धांजली वगैरे सगळी कर्मकांडे पार पडत आहेत. पण तरीही ह्या धक्क्याने नेमके काय घडले आहे हे अजून या गाण्यावर नितांत प्रेम करणाऱ्या रसिकांना उमगलेले नाहीय, नसावे इतका हा मृत्यू व्याकूळ करणारा आहे... वयाची पंचावन्न वर्ष आणि प्रोस्टेट कॅन्सर ही दोन्ही एखाद्या माणसाच्या निधनाचे निमित्त नाही होऊ शकत ना! संगीताकडे गंभीरपणे बघणारा, पूर्वजांच्या कामगिरीबद्दल मनात अतिव कृतज्ञता आणि आदर असणारा, ती परंपरा सांभाळत प्रयोग करू बघणारा आणि अभिजात शास्त्रीय संगीत गाणारा गायक ही जबाबदारी मान्य असलेला कलाकार जेव्हा अकाली जातो तेव्हा संगीताचे भविष्य काळवंडून जाते. (आणि सुमारांची सद्दी होते ते वेगळेच!)

घराण्याच्या तालमीत राहून, शिक्षण घेऊनसुद्धा काही कलाकार त्या चौकटी ओलांडून जातात. चौकटी मान्य न करण्याचा उर्मट अभिनिवेश त्यात नसतो तर त्यांच्या कानांना दूरवरच्या त्या ड्रम्सचा आवाज येत असतो जो भाग्यवंतांच्याच कानावर येतो. राशिद यांना तो ऐकू येत होता. संगीताचे संस्कार त्यांना कुटुंबाने दिले तसे न सोसणारे चटकेही दिले. लहान भावाचा अकाली मृत्यू, त्या धक्क्याने आईचा मृत्यू, त्यानंतर संगीत शिक्षण घेण्यासाठी मुंबईला झालेली रवानगी आणि तिथे अंगावर आलेले एकाकीपण. एवढे पुरेसे नव्हते म्हणून कोलकात्याच्या संगीत रिसर्च अकादमीमधील वास्तव्यात गुरू उस्ताद निस्सार हुसेन यांच्याकडून मिळालेली कठोर करकरीत वागणूक, इतर शिष्यांशी तुलना आणि अवहेलना. आयुष्याचे हे सगळे भोग अनुभवत हा कलाकार शहाणा झाला. ती शहाणीव पुढे त्यांच्या गाण्यात दिसत राहिली! वेदनांच्या आणि एकाकीपणाच्या मुशीतून घडत गेलेले हे गाणे त्या वेदनांच्या पलीकडे असलेल्या निर्मळ आनंदाचा शोध घेताना दिसते. या आनंदाचे अवचित तेजस्वी कवडसे म्हणजे त्या गाण्यातील नाजूक हरकती–मुरक्या. हा राशिद यांच्या मैफलीमधील एक प्रसन्न करणारा अनुभव असायचा.

कोलकात्याच्या वास्तव्यात राशिद यांना गुरू गिरिजादेवींचा खूप सहवास  मिळाला. वेळी-अवेळी त्यांच्या ठुमरी-झुला ऐकत असताना मैफल रसरशीत करण्याचे मंत्र त्यांनी सहज टिपले. वयाच्या २०व्या वर्षी जाहीर मैफली सुरू केल्यावर त्या ठुमरी-दादराच्या आठवणी जाग्या होत! कानावर पडलेले, उस्तादांकडून शिकायला मिळालेले सगळे काही रसिकांना ऐकविण्याची घाई त्यांना कधीच नसे. त्या गाण्यात एक सुरेल, सुकून देणारा ठहराव होता. असा अवकाश असायचा जिथे कलाकार आणि रसिक दोघांना अवसर मिळायचा, पुढे काय येते ते बघण्याचा! 

मैफलीत आलेला जाणकार आणि नवखे श्रोते यांचे भान असलेल्या या कलाकाराने दोन्ही प्रकारच्या श्रोत्यांसाठी गायन केले. जुगलबंदीवर मनापासून प्रेम करणाऱ्या या कलाकाराला पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबर जुगलबंदी करण्याचे भाग्य मिळाले. पंडितजींचा एव्हाना थकलेला पण सतेज स्वर आणि राशिद यांचा उमेदीचा तडफदार स्वर यातील आंतरिक नाते बघताना डोळे भरून येतात. शास्त्रीय मैफली ते कोक स्टुडिओ असा व्यापक संचार असणारा हा कलाकार! तो नसल्याचे रितेपण आता कसे सोसायचे? राशिदभाई, ये दुख सहा ना जाये... ऐकताय ना?

-vratre@gmail.com

टॅग्स :Indian Classical Musicहिंदुस्तानी शास्त्रीय संगीतmusicसंगीत