शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांसाठी महायुतीचा 'वचननामा' जाहीर; ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत, महिलांसाठी BESTचे अर्धे तिकीट अन् बरंच काही!
2
इंडियन आयडल-3 चा विजेता प्रशांत तमांग काळाच्या पडद्याआड; वयाच्या 43व्या घेतला अखेरचा श्वास
3
"एक मंत्री आहे, नेपाळ्यासारखा...", नितेश राणेंवर टीका करताना अबू आझमींची जीभ घसरली
4
महायुतीचा वचननामा: मुंबई लोकल अन् मेट्रोचा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी जाहीरनाम्यात काय?
5
“काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवू शकत नाहीत”: CM फडणवीस
6
“भारत देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा, आपल्या इतिहासाचा प्रतिशोध घ्यायचा आहे”: अजित डोवाल
7
बनावट कोर्ट, खोटे न्यायाधीश आणि १५ कोटींचा गंडा; निवृत्त डॉक्टर दाम्पत्यासोबत मोठा फ्रॉड!
8
‘गझनीपासून औरंगजेबापर्यंत इतिहासात गडप झाले, पण सोमनाथ…’, मोदींचं मोठं विधान
9
BMC Election 2026: ...तर १६ तारखेनंतर 'जय श्रीराम' म्हणता येणार नाही; नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल!
10
"उगाच अभिषेकचं नाव कशाला घेता?"; तेजस्वी घोसाळकरांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
11
११ लाखांची पैज! संजय राऊतांचे CM फडणवीसांना ओपन चॅलेंज; म्हणाले, “हिंमत दाखवा अन्...”
12
Exclusive: महेश मांजरेकरांकडून अमित ठाकरेंना होती 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाची ऑफर, स्वत:च केला खुलासा
13
इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; आंदोलकांना थेट मृत्युदंडाचा इशारा
14
महिलांना आत्मनिर्भर करणारी योजना! ४,४५० रुपयांच्या योजनेवर मिळवा १६ लाखांचा निधी
15
IND vs NZ 1st ODI Live Streaming : रोहित-विराट पुन्हा मैदानात उतरणार; कोण ठरणार सगळ्यात भारी?
16
“काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत परिवर्तन घडवा”: एकनाथ शिंदे
17
चक्क साडी नेसून मैदानात उतरल्या महिला; फुटबॉल सामन्याचा व्हिडिओ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ!
18
SBI एटीएम व्यवहारांच्या शुल्कात वाढ; सॅलरी अकाउंटसाठी 'अनलिमिटेड' फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा बंद
19
पूजा खेडेकरला बांधून ठेवलं, आई-वडिलांना गुंगीचं औषध दिलं, अन…, नोकरानेच केली घरात चोरी
20
IND vs NZ 1st ODI : नव्या वर्षात टीम इंडियासाठी 'शुभ' संकेत! डावखुऱ्या हाताने नाणे उंचावत गिल ठरला 'उजवा' अन्...
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: दादाजी, तुम्ही आम्हाला पाय दिले आणि पंखही!

By devendra darda | Updated: November 25, 2025 10:22 IST

Jawaharlal Darda: जमिनीत घट्ट रुजलेल्या आपल्या मुळांची कास दादाजींनी कधीही सोडली नाही. आभाळाएवढ्या उंचीची अशी माणसं कुठे आणि किती भेटतात आता?

- देवेंद्र दर्डा(व्यवस्थापकीय संचालकलोकमत समूह)

बाबूजी या नावाने ओळखले जाणारे जवाहरलालजी दर्डा हे माझे दादाजी! एक आदर्श आणि परिपूर्ण माणूस कसा असावा याचा माझ्यासाठीचा एक वस्तुपाठ म्हणजे आमचे दादाजी! मी अगदी लहान असतानाच्या माझ्या आठवणींपासून ते दादाजींनी अखेरचा श्वास घेईपर्यंत मी त्यांना सर्वार्थाने उत्तुंग होत जाताना पाहिलं. त्यांना अधिकाधिक वरची पदं मिळत गेली, जबाबदाऱ्या वाढल्या तसा त्यांचा लौकिक आणि प्रभावही निरंतर वाढतच गेला... आणि तरीही, आकाशाएवढी उंची गाठत गेलेले दादाजी अधिकच मऊ, अधिकच प्रेमळ आणि अधिकच विनम्र होत जाताना मी पाहिले. जमिनीत घट्ट रुजलेल्या आपल्या मुळांची कास त्यांनी कधीही सोडली नाही. दादाजींसारखी आभाळाएवढ्या उंचीची माणसं कुठे आणि किती भेटतात आता? 

नवीन पिढीला दादाजींबद्दल फारसं माहिती नसेल त्यांना सांगायला हवं. त्यांचा जन्म २ जुलै १९२३ रोजी यवतमाळमध्ये झाला. कापसाच्या व्यापारात मोठा नावलौकिक असलेलं संपन्न कुटुंब. पण दोन वर्षांचे असताना त्यांच्या डोक्यावरचं पितृछत्र हरपलं आणि सगळे फासेच उलटे पडले. मागोमाग आर्थिक चणचण नशिबी आली. कुटुंबाच्या संपत्तीला वाटा फुटल्या आणि घरी कमावणारं कुणीच नाही अशी दैन्यावस्था ओढवली. तशा प्रतिकूल परिस्थितीतही दादाजींच्या व्यक्तिमत्त्वाने आकार घेतला. किशोरवयातच ते स्वातंत्र्यलढ्यात ओढले गेले. तब्बल २१ महिने त्यांनी जबलपूरच्या कारागृहात घालवले. ब्रिटिशांच्या जुलमाविरुद्ध आवाज उठवणारी अनेक नियतकालिकं त्यांनी या काळात सुरू केली, साहजिकच ब्रिटिश सरकारने वारंवार ती बंदही पाडली. अखेर लोकमान्य टिळकांनी नाव दिलेल्या ‘लोकमत’चं त्यांनी पुनरुज्जीवन केलं आणि पाहता पाहता ‘लोकमत’ हा महाराष्ट्राचा आवाज झाला.  तरुण वयापासूनच दादाजी काँग्रेसचे कार्यकर्ते होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसमधल्या त्यांच्या प्रवासाचा आलेखही सातत्याने चढता राहिला. सलग २२ वर्षांपेक्षा जास्त काळ ते  महाराष्ट्र सरकारमध्ये विविध खात्यांचे मंत्री म्हणून कार्यरत होते. एका आयुष्यात त्यांनी इतकं सगळं केलं आणि तरीही ते नेहमी सर्वांसाठी उपलब्ध असत, म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर ॲक्सेसेबल! अखेरपर्यंत ते अत्यंत साधे आणि मनाने कोमल राहिले.

आम्ही आठ नातवंडं कायम दादाजींच्या वाटेकडे डोळे लावून बसलेलो असायचो. ते घरी आले की आम्ही धावत जाऊन त्यांना बिलगायचो. त्यांच्या अंगाखांद्यावर खेळल्याच्या कितीतरी आठवणी ही आम्हा सर्वांचीच मोठी संपत्ती आहे.. दादाजी नातवंडांना लाडाने ‘पिल्लू’ म्हणायचे. आमच्या वाढीच्या वयात ते मंत्री होते. त्यामुळे नेहमी त्यांच्याबरोबर ‘सिक्युरिटी’चा ताफा असायचाच.  पण दादाजींना एवढी काळजी, की घरातल्या मुलांनी घाबरून जाऊ नये म्हणून त्यांच्या ‘पोलिस एस्कॉर्ट’ला घरात शिरताना सायरन आणि लाल दिवा बंद करायच्या सूचना असत. आमच्या नागपूरच्या घराच्या दरवाजात उभा राहून मी दादाजींची वाट पाहत असायचो. लहानपणी मी फार मस्तीखोर होतो, त्यामुळे मम्मीचा ओरडा पडायचा. दादाजी आले रे आले की कधी एकदा मी त्यांच्या गळ्यात पडून मम्मीची तक्रार करतो असं मला झालेलं असे. गंमत म्हणजे मी तक्रारी केल्या की दादाजीही तिला खोटं खोटं रागे भरत... दादाजी मम्मीला रागावले की मला आनंद व्हायचा आणि मी हसून त्यांना घट्ट बिलगायचो.

एक प्रसंग फार मजेचा आहे. महाराष्ट्राचे दोन दिग्गज नेते वसंतदादा पाटील आणि वसंतराव नाईक हे कुठल्यातरी महत्त्वाच्या कामासाठी आमच्या यवतमाळच्या घरी आले होते. दादाजींबरोबर त्यांची चर्चा सुरू होती. ही चर्चा सुरू असताना मध्येच माझी बहीण पूर्वा त्या खोलीत गेली... ती तेव्हा पाच-सहा वर्षांची असेल. त्या खोलीत सुरू असलेली चर्चा किती महत्त्वाची आहे, आपण मध्ये जाऊ नये वगैरे कळायचं तिचं वय नव्हतं. पूर्वा त्या खोलीत जमिनीवर बसून  नेलपेंट लावण्यात रंगून गेली. दुसरं कुणी असतं, तर या लहान मुलीला बाहेर पिटाळलं असतं. पण दादाजींनी चर्चा थांबवली आणि आपल्या दोन मित्रांना म्हणाले, ‘थांबा थांबा, माझी नात बिझी आहे...’ - तिघेही खळखळून हसले. एका लहान मुलीच्या निरागस कृतीमुळे त्या खोलीतलं धीरगंभीर  वातावरण क्षणात बदलून गेलं.दादाजींनी त्यांच्या सुनांनाही खूप जीव लावला. त्या सुना नाही, जणू त्यांच्या मुलीच होत्या. घरात त्यांनी कधीच कुठले नियम कुणावरही लादले नाहीत. फक्त एक नियम होता आणि त्याबाबत ते अत्यंत आग्रही होते. तो नियम म्हणजे घरी आलेला कोणीही पाहुणा कधीही रिकाम्या पोटी परत जाता कामा नये… त्याला घरचं ताजं, सुग्रास जेवण मिळायलाच हवं. तेव्हा पाहुणेही भरपूर यायचे. आलेल्या एखाद्या पाहुण्याकडे त्याच्या परतीच्या प्रवासापुरते पैसे आहेत का, हे ते आवर्जून बघत असत. एखाद्याकडे ते नसतील तर  त्या पाहुण्याच्या बस किंवा रेल्वेच्या तिकिटाची व्यवस्था लावायचे निर्देश त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना देऊनच ठेवलेले असत.

‘महिला सक्षमीकरण’ ही संकल्पना तशी अलीकडची. दादाजींच्या रक्तातच स्त्रियांबद्दलचा आटोकाट आदर होता. आईच्या कृपाछत्राखाली ते लहानाचे मोठे झाल्यामुळे असेल कदाचित… त्यांनी आमच्या घरातील स्त्रियांना स्वावलंबी, सक्षम व्हायला नेहमी प्रोत्साहन दिलं. गरज पडेल तेव्हा ते माझ्या दोन्ही आज्ज्यांचा सल्ला घ्यायचे, त्यांच्या मताला दादाजींच्या लेखी महत्त्व होतं.

‘माझं एका मुलीवर प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे’ हेही मी सगळ्यात आधी दादाजींनाच सांगितलं होतं. त्यांना हे सांगताच एकदम खुश झालेल्या दादाजींनी लगेच रचनाला भेटायला बोलावलं. रचना तेव्हा बाहेर होती आणि तिने जीन्स घातली होती. ‘दादाजींना भेटायला मी जीन्स घालून कशी येऊ,’ असा प्रश्न तिला पडला होता. हे दादाजींना कळलं तेव्हा त्यांनी रचनाला निरोप दिला, ‘माझ्या घरात माझ्या मुलींनी जीन्स घातलेली मला चालते, तर तू घातलेली का नाही चालणार?’ रचना लगोलग घरी आली. त्या एका प्रसंगाने दादाजींनी रचनाचं मन जिंकलं आणि रचनाही त्यांची लाडकी झाली.

दादाजींचं नेतृत्व आणि व्यवस्थापन कौशल्यही अफलातून होतं. त्यांनी फारसं औपचारिक शिक्षण घेतलेलं नसूनही त्यांनी आयुष्यात जी मूल्यं मानली, व्यवस्थापनाच्या ज्या पद्धती आपल्या व्यवसायात अवलंबल्या, ती सूत्रं आज मोठमोठ्या मॅनेजमेंट स्कूल्समध्ये शिकविली जातात, हे विशेष! ‘लोकमत’ समूहातील संपादक आणि वरिष्ठ व्यवस्थापकांशी ते कसे संवाद साधत हे मी नेहमी पाहत आलो. दादाजी त्यांना फक्त पाच-सहा नेमके प्रश्न विचारायचे. तेवढ्या प्रश्नांतून त्यांना हवी असलेली सगळी महत्त्वाची माहिती मिळायची. सहकाऱ्यांसोबत ते घेत त्या कामाच्या बैठकाही नेमक्या असत. अत्यंत कमी वेळाच्या तरी अर्थपूर्ण. आजच्या भाषेत सांगायचं तर क्रिस्प, टू द पॉइंट! दादाजींबरोबरची मिटिंग संपवून बाहेर पडताना प्रत्येकालाच ‘आपल्याला काहीतरी मिळालंय’ असं वाटत असे. एखादी आणीबाणीची परिस्थिती आली तरी दादाजी नेहमी शांत असत. त्यांचा आवाज चढलेला कधीही कुणी ऐकला नसेल.

दादाजींनी रचलेल्या मूल्य आणि संस्कारांच्या पायावर आजही आमचं कुटुंब आणि आमचं काम उभं आहे. त्यांनी कधीही कुणाला कसल्याही बोजड उपदेशांचे डोस पाजले नाहीत. त्यांनी संस्कार दिले ते ‘सांगून’ नाही, स्वत: तसं प्रत्यक्ष जगून!  प्रेम, आदर सन्मान, परस्पर विश्वास या गोष्टी पैसा, पद आणि सत्ता, संपत्तीपेक्षा महत्त्वाच्या असतात हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो. त्यांच्या मुलांनी हे संस्कार पुढे नेऊन कुटुंब घट्ट जोडून ठेवलं. या दोन्ही भावांचं  लहानपणी एकमेकांशी जसं आणि जेवढं गुळपीठ होतं, तेवढंच आजही आहे. आम्ही आणि आमच्या मुलांमध्येही तोच स्नेहाचा, विश्वासाचा घट्ट धागा  अखंड अबाधित आहे.

‘लोकमत’ हा दादाजींचा श्वास होता.  ते आपल्या दोन्ही मुलांना नेहमी सांगत, ‘हा फक्त व्यवसाय नाही, ती एक जबाबदारी आहे!’ वाचकांच्या विश्वासाचा मान राखणं हे आपलं कर्तव्य आहे, ही त्यांची शिकवण होती. ‘लोकमत’चे कर्मचारी हे आपल्या कुटुंबाचाच भाग आहेत, असं दादाजी मानत असत. कर्मचाऱ्यांचा पगार ठरल्या दिवशी, त्याच्या आधीच झाला पाहिजे, ही त्यांनी घालून दिलेली शिस्त आजही कटाक्षाने पाळली जाते. व्यवसायासाठीच्या कर्जाचे हप्ते एक दिवसही उशिरा जाता नयेत आणि कोणत्याही पुरवठादाराला बिलाचे पैसे घेण्यासाठी फोन करावा लागता कामा नये, एकाही घेणेकऱ्याला कधी ‘लोकमत’च्या कार्यालयाची पायरी चढावी लागता कामा नये, यावर त्यांचा कटाक्ष होता. 

आज तिसरी पिढीही त्यांची ही शिकवण विसरलेली नाही. दादाजींनी घालून दिलेले मानदंड ‘लोकमत’ समूहाने कधीही चुकविलेले नाहीत आणि आम्हाला याचा अभिमान आहे. दादाजींचा ‘ॲस्थेटिक सेन्स’ विलक्षण होता. निसर्ग, वास्तुकला आणि सगळ्या सुंदर गोष्टींवर त्यांचा जीव होता. आज दादाजींची पुण्यतिथी. एक संस्था उभी करणारा द्रष्टा म्हणूनच नव्हे, तर मानवता, नेतृत्व आणि प्रेम यांचा संस्कार आमच्यामध्ये खोल रुजवणारं एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून आम्ही अत्यंत आदराने त्यांचं स्मरण करतो. दादाजी, तुम्ही आम्हाला जमिनीत घट्ट रुजलेले खंबीर पाय दिले आणि आकाशात उडण्याची हिंमत भरलेले पंखही! 

English
हिंदी सारांश
Web Title : Remembering Dadaji: A Legacy of Grounded Roots and Soaring Wings

Web Summary : Devendra Darda fondly remembers his grandfather, Jawaharlal Darda (Babuji), as an inspiring figure. He highlights his simple nature, leadership, and values instilled in the family and Lokmat, emphasizing his commitment to social responsibility, ethical business practices, and women's empowerment. He gave roots and wings.
टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाLokmatलोकमत