-डॉ. विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)अगदी अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलणे झाले. मी त्यांना म्हणालो, नक्षलवादाच्या उच्चाटनाची आपली मोहीम एक सिद्ध करते, की ठाम नेतृत्व असेल तर काहीही अशक्य नाही. आता देशाला अमली पदार्थांच्या व्यापारापासून मुक्ती द्या! हे काम सोपे नाही; परंतु आपणच ते करू शकाल!'- प्रसन्न हसत ते मला म्हणाले, 'तुम्ही पाहाल, अमली पदार्थ विकणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही. या देशात त्यांच्यासाठी जागा नाही!'
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बाबतीत मला नेहमीच विश्वास वाटत आला आहे. मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद्यांना संपवण्याची घोषणा त्यांनी केली, तेव्हा सर्वांनाच शंका होती की राजकीय नेते, शेकडोने पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जीव घेणारा हा रक्तरंजित आजार इतक्या लवकर कसा नष्ट होईल? - परंतु, अमित शाह यांचा निर्धार पक्का होता.
प्रत्यक्षात घोषणा करण्याच्या कितीतरी आधीपासून त्यांनी व्यूहरचना करायला सुरुवात केली होती. संबंधित राज्यांना विश्वासात घेण्यात आले. नेमक्या जागी योग्य अधिकारी नेमले गेले. पुरेशी साधनसामग्री उपलब्ध करून दिली गेली. सन्मार्गावरून भरकटलेल्यांसाठी एका हाताने प्रेमाचा स्पर्श, तर दुसऱ्या हातात आग ओकणाऱ्या बंदुका होत्या. सक्षम नेतृत्वाची हीच लक्षणे असतात.
आता पाळी अमली पदार्थांच्या व्यापाऱ्यांची आहे. असे म्हणतात, की अमित शाह घोषणाबाजीपेक्षा प्रत्यक्ष परिणामांवर विश्वास असणारे नेते आहेत. थोडीशी माहिती समोर येते तेव्हा पुष्कळ सगळे काम झालेले असते. गेल्या आठवड्यात गोव्यात होतो.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या दोन्ही राज्यांतल्या ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करताना लक्षात आले, की अमली पदार्थ विकणाऱ्या टोळ्यांच्या मुसक्या आवळण्याच्या तयारीने बराच वेग घेतला आहे.
केंद्र सरकारने १५ ऑगस्ट २०२० रोजी 'नशामुक्त भारत अभियाना'ची घोषणा केली. २०१८ मध्ये देशव्यापी पाहणी झाली. या पाहणीचा अहवाल २०१९ मध्ये आला. १६ कोटी लोक मद्यसेवन करतात असे आढळून आले. त्यातील ५.७ कोटींपेक्षा जास्त गंभीर स्थितीत आहेत.
साधारणतः ३.१ कोटी लोक भांगेचे सेवन करतात. २५ लाख लोक या सवयीच्या आहारी गेलेले आहेत. सुमारे २ कोटी २६ लाख लोक अफू खातात. त्यातील ७७ लाखांची गंभीर स्थिती आहे. सुमारे ८.५ लाख लोक शिरेत इंजेक्शनच्या माध्यमातून अमली औषधे घेतात. उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यासारख्या राज्यांत नशाबाजांची संख्या जास्त आहे.
गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय अमली पदार्थ कृती गटाच्या दुसऱ्या राष्ट्रीय संमेलनात केंद्रीय गृहमंत्र्यांनी अत्यंत सुस्पष्ट असा तपशील दिला. भारतात अमली पदार्थाच्या जाळ्याचे तीन भाग आहेत.
पहिला परदेशात बसून सीमेवरून अमली पदार्थ इकडे पाठवतो. दुसरा देशात आहे, जो विभिन्न राज्यांत अमली पदार्थ पोहोचवतो; आणि तिसरा स्थानिक पातळीवर अमली पदार्थांच्या पुड्या चौकाचौकातं विकतो. या तिघांवरही एकाचवेळी पूर्ण ताकदीने आघात करण्याची व्यूहरचना आखली जात आहे.
भारताच्या कारागृहांत फिलिपाइन्स, घाना, म्यानमार, मलेशिया आणि नायजेरिया या देशांतले अमली पदार्थाचे सुमारे १६ हजार तस्कर कैद आहेत. त्यांना देशाबाहेर काढण्याचे काम सुरू झाले आहे. परदेशात बसलेल्या तस्करांना ताब्यात घेण्याची प्रक्रियाही सुरू आहे.
बांगलादेश सीमेवरून भारतात अमली पदार्थाची तस्करी होऊ नये यासाठी मोठी मोहीम राबवली जात आहे. या धंद्यात प्रचंड पैसा असून, त्याचा उपयोग प्रलोभन दाखवण्यापासून धमकी देण्यापर्यंत किंवा जीव घेण्यापर्यंत केला जातो. पंजाब आणि राजस्थानच्या सीमेपासून गजरातमध्ये समदी सीमेपर्यंत पाकिस्तानचे लष्कर आणि त्या देशाची गुप्तचर संस्था आयएसआय अमली पदार्थांच्या तस्करांना मदत करते.
दुसरा मोठा रस्ता म्हणजे गुजरातचा समुद्रकिनारा. हेरॉइन नावाचा अमली पदार्थ कंटेनरमध्ये लपवून तस्करी करण्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. पाच वर्षांपूर्वी गुजरातच्या मुंद्रा बंदरावर अशाच एका कंटेनरमध्ये लपवून आणलेले २१ हजार कोटींचे हेरॉइन पकडले होते.
याशिवाय बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये नेपाळमार्गे, तर पूर्वोत्तर भारतातील राज्यांत म्यानमार आणि बांगलादेश मार्गे अमली पदार्थांची तस्करी होत असते. हे सगळे तस्कर एकमेकांशी जोडलेले आहेत. मेक्सिको, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, थायलंड, म्यानमारपासून नायजेरिया आणि घानापर्यंत सगळे व्यापारी एकाच माळेचे मणी आहेत.
या लढ्यात देशातले युवक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठी भूमिका बजावू शकतात. कारवाई तर पोलिसच करतील, पण हे सर्वजण गुप्त माहितीचे महत्त्वाचे स्रोत नक्कीच ठरू शकतात. अमली पदार्थाच्या सौदागरांचे जाळे गावोगावी पसरलेले आहे आणि त्यांचे मुख्य लक्ष्य आपले युवकच आहेत.
ही लढाई सोपी नाही; परंतु नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि अमित शाह यांचा निर्धार यावर विश्वास ठेवला पाहिजे. भारताने ज्याप्रकारे नक्षलवादाची लढाई जिंकली, त्याचप्रकारे अमली पदार्थाच्या विक्रीचे जाळे नेस्तनाबूत करण्यातही आपण यशस्वी होऊ.
Web Summary : Home Minister Amit Shah is determined to eradicate drug trafficking. A nationwide campaign is underway, targeting suppliers at all levels from international networks to local dealers. Focus is on disrupting supply routes and prosecuting offenders aggressively, signaling a zero-tolerance approach.
Web Summary : गृह मंत्री अमित शाह ड्रग तस्करी को खत्म करने के लिए दृढ़ संकल्पित हैं। एक राष्ट्रव्यापी अभियान चल रहा है, जो अंतरराष्ट्रीय नेटवर्क से लेकर स्थानीय डीलरों तक सभी स्तरों पर आपूर्तिकर्ताओं को लक्षित कर रहा है। आपूर्ति मार्गों को बाधित करने और अपराधियों पर आक्रामक रूप से मुकदमा चलाने पर ध्यान केंद्रित किया जा रहा है, जो शून्य-सहिष्णुता दृष्टिकोण का संकेत देता है।