नाद घुमू दे समाजबांधिलकीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2016 06:36 AM2016-08-25T06:36:05+5:302016-08-25T06:36:05+5:30

ढोलताशांचा गजर आसमंतात जोश निर्माण करीत असतोच. खरी गरज आहे, ती या निमित्ताने एकवटणाऱ्या तरुणाईला सामाजिक बांधिलकीची दिशा देण्याची..

Sounds of social media | नाद घुमू दे समाजबांधिलकीचा

नाद घुमू दे समाजबांधिलकीचा

Next


ढोलताशांचा गजर आसमंतात जोश निर्माण करीत असतोच. खरी गरज आहे, ती या निमित्ताने एकवटणाऱ्या तरुणाईला सामाजिक बांधिलकीची दिशा देण्याची...
गणरायाच्या आगमनाची चाहूल लागते, ती ढोलताशांच्या सरावामुळेच. ढोलताशा हे गणेशोत्सवाच्या उत्साहपर्वातील एक अविभाज्य अंग बनले आहे. ढोल हे मुळातच रणवाद्य. ढोल, ताशा, दिमडी, झांजा यांचा नादमय ठेका ताल धरायलाच लावतो. तल्लीन करणाऱ्या या सोहळ्याला तयारीही तशी घाम गाळूनच करावी लागते. महाराष्ट्रातील आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांचेही पुण्याशी संगीतापलीकडचे नाते असल्याने त्यांनी ‘ढोल जनरेशन’ची स्थापना केली आहे. अशा या पुण्यातील ढोलताशांचा गजर हा केवळ महाराष्ट्रात व देशातच नव्हे, तर जगभरात घुमतो आहे. गणेशोत्सव म्हणूनच महा-उत्सव आहे.
मात्र, या आनंदोत्सवाला कोंदण हवे ते सामाजिक भानाचे. ज्या लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली, त्यांची भूमिकाच मुळी ती होती. आजच्या उत्सवाला जे केवळ ‘उत्सवी’ स्वरूप येत आहे त्यात ती आहे का, हे तपासून पाहाण्याची वेळ येऊन ठेपली आहे. लोकमान्यांनी म्हटले होते, ‘राष्ट्राच्या अभ्युदयासाठी गणेशोत्सवासारखे उत्सव असणे जरूर आहे. कोणत्याही लोकांत ऐक्याची वृद्धी होण्यास जी अनेक साधने असतात त्यांपैकी एक उपास्यदैवत असणे हे एक कारण आहे... एका प्रांतातच का होईना; पण वर्षातून दहा दिवस तरी एकाच देवतेच्या भजन-पूजनांत लोक निमग्न झाल्याने त्यांच्यात ऐक्याची वृद्धी होणार नाही असे कोण म्हणेल?’ लोकमान्यांची उत्सव साजरा करण्यामागची भूमिका यातून अधोरेखित होते.
आज गणेशोत्सवाला शतकोत्तर वीस वर्षांहूनही अधिक काळ लोटला आहे. या काळात गणेशोत्सव कमालीचा बदलला. पूर्वी उत्सवात होणाऱ्या मेळ्यांची जागा आता पंचतारांकित सिने नट-नट्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या निव्वळ रंजनात्मक कार्यक्रमांनी घेतली. उत्साहाचे रूपांतर अनेकदा उन्मादात होऊ लागले आहे. पूर्वी लोकांची आवड लक्षात घेऊन व सामाजिकतेचे भान राखून उपक्रम राबवणारी सार्वजनिक मंडळे आता मनोरंजनाच्या नावाखाली ‘इव्हेंट’ करू लागली आहेत. सार्वजनिक उत्सवांमधील मिरवणुकांना तर कशाचाच धरबंध राहिलेला नाही, असे वाटते. डीजेच्या तालावर, वेगळ्याच धुंदीत बेभान होऊन तरुणाईला नाचताना पाहिले, की उत्सवात काही तरी बिनसते आहे, याची जाणीव तीव्र होत जाते. या सर्व पार्श्वभूमीवर ढोलताशा पथकांनी मात्र अद्याप ताल बिघडू दिलेला नाही व तोल जाऊ दिलेला नाही, हे निश्चितच कौतुकास्पद आणि दिलासादायक आहे. कारण, दोन्ही बाजूंना आहे तो तरुणच.
सध्याच्या सार्वजनिक उत्सवांमध्ये वाद्य वादनासाठी मोठमोठ्या पथकांनाच संधी दिली जाते. या पथकांमधील तरुणाईचा अभूतपूर्व सहभाग थक्क करणारा आहे. तरुणाईचा ‘जोश’ आणि सामाजिकतेच्या कामासाठी आवश्यक असणारा ‘होश’ हे जर जुळून येऊ शकले, तर गणेशोत्सवाला खऱ्या अर्थाने सामाजिक विधायकता प्राप्त होऊ शकेल. याच तरुणाईच्या उत्साही सहभागाला एकसंधतेची, विधायक स्वरूपातील कामाची जोड देणे गरजेचे आहे. तरुणांमधल्या ऊर्जेचा वापर केवळ ठिणगीसारखा होऊ न देता खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये उत्साह, चैतन्य निर्माण करणारा असायला हवा. पथकांमध्ये एकवटणारी ही तरुणाई एकदिलाने एकत्र येत असते. तिलाच योग्य दिशा लाभल्यास समाजातील अनेक रचनात्मक प्रकल्प तडीस जाऊ शकतात. या तरुणांना केवळ ढोलताशांच्या गजरापुरते एकत्र आणण्यापेक्षा सामाजिक बांधिलकीचा गजर करण्यासाठी एकत्र बांधून ठेवता येऊ शकले, तर ते फार मोठे काम ठरेल. पथकांमध्ये जोश, चैतन्य, सलोखा, एकी असे गुण एकवटलेले असतातच; त्यांना अधिक व्यापक व समाजाभिमुख करण्यासाठी पावले उचलण्यासाठी कृती व्हायला हवी. अनेक पथके नदीकाठच्या परिसरात तालीम करतात. हा परिसर किमान स्वच्छ असावा, याबाबत कृतिकार्यक्रम आखता येऊ शकेल. पथकांनी आनंद, उत्साह याबरोबरीने सामाजिक भान राखले पाहिजे. आजची ढोल पथके ही समाजाची आशास्थाने बनू शकतात, त्या दिशेने या तरुणाईची पावले पडायला हवीत...
- विजय बाविस्कर

Web Title: Sounds of social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.