शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

वाचनीय लेख - स्मार्टफोन-टॅब आणि ‘स्मार्ट’ आजी-आजोबा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 10:04 IST

साठी-पासष्टी-सत्तरीत असलेल्या आजी-आजोबांच्या अंगावरूनच डिजिटल क्रांती गेली आहे. डिजिटल साक्षरतेचे धडे शिकण्यावाचून त्यांना पर्याय नाही!

मेधा कुलकर्णी

निशाताई दररोज अमेरिकेतल्या लाडक्या नातीला व्हॉट्सॲपवरून दिवसभराचा वृत्तांत बोलून, रेकॉर्ड करून कळवतात. आधी त्या बोटांनी टुकुटुकु टाइप करून लेखीच कळवत असत. अलीकडे त्यांची बोटं दुखतात, कापतात. म्हणून नातीनेच त्यांना ‘व्हॉइस नोट’ पाठवायला सुचवलं. ते तंत्रही तिनेच शिकवलं. स्मार्टफोनही नातीनेच भेट दिलेला.

झुबेरच्या दादीजान सत्तरीत आहेत. त्यांनी साठीत प्रवेश केला, तेव्हाच सगळं नवतंत्रज्ञान शिकून घ्यायचं ठरवलं. मोबाइल बॅंकिंग, अन्य ॲप्स वापरत असल्याने त्यांची रोजची कामं वेगाने होतात. बराचसा वेळ वाचतो. ट्रॅफिकमुळे शहरात फार हिंडाफिरायला जाता येत नाही. पण सोशल मीडियातून त्या जगाशी जोडलेल्या राहतात. लॅपटॉपवर वेगवेगळी वृत्तपत्रं वाचतात. ओटीटीवर चित्रपट बघतात. युट्यूबवर बघून व्यायामदेखील करतात.डिजिटल क्रांतीमुळे जगणं सुकर झाल्याचा सार्वत्रिक अनुभव आहे. सुरुवातीला दिलेली उदाहरणं सोडली, तर पासष्टी-सत्तरीतला आणि त्यापेक्षा वयस्कर एक मोठा समाजगट, अगदी महानगरात राहत असूनही डिजिटल क्रांतीच्या लाभाला पारखा राहिलेला दिसतो. त्यांना बॅंकेत ये-जा करावी लागते, रोख पैसे बाळगत बसावे, सांभाळावे लागतात. मदत मिळण्यावर अवलंबून राहावं लागतं. अनेकदा घरात फक्त आजी-आजोबा असतात.  एकएकट्या आजी, एकएकटे आजोबा असेही राहतात. आणि शहरांत तर अवतीभोवतीच्या लोकांना मदत करण्याची इच्छा असूनही वेळच नसतो. साठी-पासष्टीच्या शाळामैत्रिणी त्यांच्यातल्याच एकीच्या घरी जमल्या होत्या. जेवणं आटोपल्यावर आईस्क्रीम खायची इच्छा झाली. खाली उतरून दहा मिनिटं चालल्यावर आईस्क्रीमचं दुकान होतं. पण जेवण झाल्या झाल्या भर दुपारी घराबाहेर पडायचा सगळ्यांनाच कंटाळा आलेला. यावरचा उपाय अगदी साधा होता. स्विगी, झोमॅटो असं ॲप वापरून आइस्क्रीम मागवणं. दहा-बारा जणींपैकी फक्त एकीलाच ते वापरता येत होतं. बाकी साऱ्याजणी म्हणत राहिल्या, की त्यांच्याकडे हे पदार्थ मागवण्याचं काम त्यांची मुलंच करतात.

डिजिटल उपकरणं वापरण्याबाबत ७७% ज्येष्ठ नागरिक त्यांच्या कुटुंबावर अवलंबून असल्याचा निष्कर्ष पुण्यातल्या सिम्बायोसिस कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सर्वेक्षणातून नुकताच काढण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या डिजिटल साक्षरतेसाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज हे सर्वेक्षण आग्रहाने मांडते. अलीकडच्या काळात सायबर गुन्हेगारांचे पहिले आणि मोठे लक्ष्य ज्येष्ठ नागरिक असल्याचे बातम्यांमधून दिसते. कुणीतरी ओटीपी द्यायला सांगून खात्यातले पैसे परस्पर काढून घेतले, कुणा सायबर भामट्याने कर्जाच्या विळख्यात अडकवले अशा बातम्या वाचून धास्तावलेले ज्येष्ठ मग डिजिटल व्यवहारांपासून दूरच राहतात आणि त्यामुळे फसवणुकीच्या शक्यता उलट वाढवून बसतात. दिवसागणिक हा प्रश्न मोठा जटिल होत जाणार आहे.

लॅन्डलाईन फोन ते स्मार्टफोन, टेबलावर बसून राहणारा कॉम्प्युटर ते लॅपटॉप ते टॅब, पत्रापत्री ते सोशल मीडिया, पासबुक ते मोबाइल बँकिंग, गरजेच्या वस्तू मागवण्यासाठी फोन ते ॲप अशी तंत्रज्ञानातली क्रांती आता साठी-पासष्टी-सत्तरीत असलेल्या पिढीच्या अंगावरूनच गेली आहे. तरीही, नव्याचं भय, जुन्या सवयीत वाटणारी सुरक्षितता, नवं शिकण्याचा कंटाळा अशा कारणांनी ज्येष्ठ नागरिक या बदलांपासून दूरच राहिले आहेत. या बदलांमुळे डिजिटल उपकरणांनीच जगणं व्यापत गेलं. आणि वापरण्याची कौशल्यं अवगत नसण्याने नुकसान व्हायला सुरुवात झाली. खरं तर, तंत्रज्ञान विकसित होत जातं, तितकं ते वापरायला सोपं होत जातं. पण मुळात नव्याची सवयच करून न घेणाऱ्यांना तो सोपेपणादेखील समजत नाही. त्यातल्या त्यात व्हॉट्सॲप हे सोसायट्यांमधल्या अंकल आणि आंटी यांचं आवडीचं माध्यम असावं. त्यातही एकीकडून आलेला मजकूर अथवा व्हिडीओ दुसरीकडे पाठवून देण्याचं कौशल्य ज्येष्ठांना चांगलं अवगत झालं असल्याचं दिसतं. पण या पलीकडे रोजच्या जगण्याला सोपं करणारं, वेळेची, कष्टांची बचत करणारं, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष ठेवणारं, भोवतालच्या जगाशी संवाद साधणारं आणि मनोरंजनदेखील करणारं डिजिटल तंत्रज्ञान त्यांनी शिकून घेण्याची गरज आहे.

वृद्धापकाळी परावलंबित्व नको, असं आग्रहाने वाटत असतं. या डिजिटल तंत्रज्ञानामुळे जगणं बरंचसं स्वावलंबी होऊन जातं. घरात लागणारं सामान बाहेर न जाता घरपोच मागवता येऊ शकतं. रक्तदाब, रक्तातली साखर, प्राणवायूची पातळी अशा साध्या तपासण्या आपल्या आपण करता येतात. जगभराच्या घडामोडी ऑनलाइन वाचता येतात. सोशल मीडियामुळे नवे मित्र-मैत्रिणी मिळू शकतात. तिथली अनुभवांची देवाण-घेवाण जगायला बळ देते. डिजिटल उपकरणांच्या हाताळणीमुळे आपण नव्या पिढीशीही जोडलेले राहतो. स्मार्टफोन वापरणारे वृद्धही स्मार्ट होतात. भोवतालच्या तरुणांना असे वृद्ध जुने, जुनाट वाटत नाहीत.

डिजिटल तंत्रज्ञान वापरून आर्थिक व्यवहार करण्यात काही धोके जरूर असतात. पण ते टाळायचे कसे, हे समजून घेणंही सोपं आहे. याबद्दलची माहिती जागोजागी प्रसिद्ध होत असते. जाणकारांकडून ती समजून घेता येते. जोखीम आहे, म्हणून त्या तंत्रज्ञानाच्या वाटेलाच न जाणं मात्र चुकीचं आहे. वय वाढत जातं, तसं हालचालींचा वेग मंदावतो. वर्षानुवर्षे काम केलेलं शरीर थकलेलं असतं. मनाची उभारीही अनेकदा कमी पडते. अशा वेळी दिनक्रम सुरळीत ठेवण्यासाठी आधार देणारी यंत्रणा उभारावी लागते. डिजिटल तंत्रज्ञान ही तशी ‘सपोर्ट सिस्टिम’च आहे. “वय झालं, आता कशाला?” असं म्हणून डिजिटल जगाच्या खिडक्या बंद करणाऱ्यांना “वय झालं, म्हणूनच” असं सांगत या खिडक्या सताड उघड्या ठेवायला मदत करण्याची गरज आहे.

संस्थापक, ‘संपर्क’धोरण अभ्यास संस्था - medha@sampark.net.in

टॅग्स :MobileमोबाइलSmartphoneस्मार्टफोन