शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

काळरात्रीची माघार; अमेरिकेने अफगाणिस्तान आता त्याच्याच नशीबावर सोडून दिला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 08:52 IST

अफगाणिस्तानला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाल्याची घोषणा करण्यात आली. त्या आनंदात केलेल्या गोळीबाराने राजधानी काबूलचा आसमंत दणाणून गेला.

अफगाण वेळेनुसार सोमवारी मध्यरात्रीच्या ठोक्याला अखेरचा अमेरिकन सैनिक लष्करी विमानात चढला. अत्याधुनिक शस्त्रे, लढाऊ विमाने असा लवाजमा मागे ठेवून अमेरिकेने विमानतळावरील अखेरचे ठाणे सोडले. ओसामा बिन लादेनच्या अल-कायदाने केलेल्या ९/११च्या अमेरिकेतील हल्ल्यानंतर तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी पुकारलेले अफगाण युद्ध जवळपास वीस वर्षांनंतर संपुष्टात आले. अमेरिकेच्या विमानाने हवेत झेप घेताच काबूल विमानतळाच्या रिकाम्या धावपट्टीवर हवेत गोळीबार करीत तालिबान्यांनी जल्लोष केला.

अफगाणिस्तानला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाल्याची घोषणा करण्यात आली. त्या आनंदात केलेल्या गोळीबाराने राजधानी काबूलचा आसमंत दणाणून गेला. व्हिएतनाम, फिलिपाइन्स, पाकिस्तानचा वायव्य प्रांत किंवा इराक वगैरे देशांप्रमाणेच अफगाणिस्तानातही अमेरिकेच्या वाट्याला प्रचंड अपयश आले. नाटो फौजांच्या सोबतीने तालिबान्यांना हुसकावून लावताना अमेरिकेने या गरीब देशातील नागरिकांना दिलेली बहुतेक आश्वासने हवेत विरली. अफगाण सैन्याच्या प्रशिक्षणासाठी खर्च केलेले अब्जावधी डॉलर्स वाया गेले. रक्तपाताने विदीर्ण झालेला हा देश अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी त्याच्याच नशिबावर सोडून दिला. आता अमेरिकेने या संघर्षातून काय कमावले व काय गमावले याची मोजदाद संपूर्ण जग करीत राहील.

कदाचित अमेरिकेच्या सामरिक इतिहासात व्हिएतनामसारखाच हादेखील एक काळा अध्याय ठरू शकेल; कारण, अमेरिकेसारख्या महासत्तेला वीस वर्षांत तालिबान किंवा अल-कायदाचा संपूर्ण नायनाट करता आला नाही. उलट, निवडणुकीच्या तोंडावर सैन्यमाघारीचा करार तालिबान्यांसोबतच केला. ९/११ च्या हल्ल्यात तीन हजार अमेरिकन मरण पावले होते; तर गेल्या वीस वर्षांत अफगाणिस्तानात चोवीसशे सैनिकांचा जीव गेला. त्याशिवाय, नाटो व मित्रराष्ट्रांचे अकराशे जवान मरण पावले. एक लाख निरपराध अफगाण नागरिकांचा जीव गेला तो वेगळाच. त्यानंतर कुठे या महासत्तेला सैन्यमाघारीचे शहाणपण सुचले.

अमेरिकेने सैन्य परत बोलावले असले तरी अंतिमत: अफगाणिस्तानचे काय करायचे यावर जागतिक लष्करी महासत्तांचे एकमत नाही. इंग्लंडने अफगाण जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही, असे सूतोवाच केले आहे. गेल्या आठवड्यात काबूल विमानतळावर झालेल्या स्फोटांना अप्रत्यक्षरीत्या इंग्लंड जबाबदार असल्याचा अमेरिकेचा आरोप खोडून काढला जात आहे. जर्मनीने त्यांच्या नागरिकांसह अफगाणिस्तानातील महत्त्वाचे लोक, सामाजिक व मानवाधिकार कार्यकर्ते अशी हजारोंची यादी बनविली आहे आणि त्यांना उजबेकिस्तानच्या मदतीने ताश्कंदमार्गे जर्मनीत नेण्याची योजना आखली आहे. त्यासाठी जर्मनीचे परराष्ट्रमंत्री हैको मास हे तर्की, उजबेकिस्तान, ताजिकीस्तान, पाकिस्तान, कतारच्या दौऱ्यावर आहेत.

कॅनडा व जगातील अन्य देशदेखील गेल्या वीस वर्षांमध्ये आधुनिकतेचा वारा लागलेल्या अफगाण महिला, तरुण, मुलांना वाऱ्यावर सोडायला तयार नाहीत. अफगाणिस्तानात आणखी अमेरिकन सैनिक बळी जायला नकोत, या मुद्द्यावर मोठा दबाव गेल्या निवडणुकीवेळी डोनाल्ड ट्रम्प व जो बायडेन यांच्यावर होता. म्हणूनच ट्रम्प यांनी अनेक तालिबानी कमांडरना तुरुंगातून सोडण्याचा व सैन्यमाघारीचा करार केला आणि बायडेन यांनी तो करार पूर्ण केला. अशा रीतीने निवडणुकीतील आश्वासन या दोन्ही नेत्यांनी पूर्ण केले असले तरी अफगाणिस्तानच्या अंधाऱ्या भविष्याला, अस्थिर परिस्थितीला अमेरिकाच जबाबदार असेल. दहा वर्षांपूर्वी ओसामा बिन लादेन पाकिस्तानमधील अबोटाबाद येथे मारला गेला, तेव्हाच अमेरिकनांना अफगाण युद्ध थांबविण्याची संधी होती.

बराक ओबामा यांनी ती दवडली. नंतरच्या काळात अल-कायदा व आयसिसविरोधात लढाईसाठी तालिबान्यांना जवळ करण्यात आले. आज त्याचे परिणाम अफगाणिस्तान, तसेच संपूर्ण जग पाहतही आहे व भोगतही आहे. गेल्या आठवड्यात तेरा अमेरिकन कमांडोंसह जवळपास दोनशे जणांचा बळी घेणाऱ्या काबूल विमानतळावरील स्फोटांमागे आयसिस असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर स्थिती अक्षरश: अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडली आहे.

तालिबान्यांनी अमेरिकेशी आगळीक करणार नाही, असा शब्द दिला असला तरी पाकिस्तानच्या मदतीने अल-कायदा किंवा आयसिसकडून असे हल्ले होणार नाहीत किंवा अमेरिकेला डिवचले जाणार नाही, याची खात्री नाही. त्यामुळे सैन्यमाघारीचा साेमवारी मध्यरात्रीचा एपिसोड हा अफगाण समस्येचा शेवट नाही. किंबहुना ती सुरुवात ठरेल. तालिबान आता त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात करील. रक्तपात वाढेल, निरपराधांचे जीव जात राहतील. अख्खा देश अंधाऱ्या खाईत लोटून परत गेलेली अमेरिका किती दिवस डोळ्यांवर कातडे ओढून शांत राहील?

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानAmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडन